१. आवेग शांत होण्यासाठीच कालावधी दीर्घ हवा.  सामान्य प्रणयात कालावधी अल्प असतो आणि साधना म्हणून केलेल्या प्रणयात त्या क्रियेचा उपयोग वर्तमानात राहण्यासाठी ( किंवा स्वतःप्रत येण्यासाठी) केला जातो. कालावधीची दीर्घता साधकच ठरवणार. 

२. स्त्रीची चित्तदशा निरभ्रांत होणं अवघड आहे कारण स्त्री सांसारिक विवंचनांनी ग्रस्त असते.  दोघेही एकाच वेळी वर्तमानात येतात कारण सर्वांची जाणीव आणि स्वरूप  एकच आहे. किमान एकाची तरी चित्तदशा निरभ्रांत हवी असं म्हटलंय आणि ते पुरुषाच्याबाबतीत शक्य होण्याची शक्यता जास्त आहे. पहिल्या  प्रतिसादात असंही म्हटलंय की ती निरभ्रांतता किंवा तो निवांतपणा स्त्रीच्या चित्तदशेत परावर्तित होतो; तस्मात देण्या-घेण्याचा भाव निर्माण होत नाही. 

३.  विवाह बंधन भासतो म्हणून तर विवाहेतर संबंधाचं आकर्षण आहे आणि त्या  आकर्षणामुळे प्रणयाचा उपयोग आध्यात्मिक साधनेऐवजी एक नवा किंवा वेगळा  अनुभव म्हणून केला जातो. अशा संबंधात (दोघांपैकी कुणीही विवाहित असेल तर) अपराधभाव हमखास येतोच ! ज्याला प्रणयाचा उपयोग साधना म्हणून करायचा आहे त्याला एकमेकांच्या सहवासात, उत्तेजनारहित अवस्थेत दीर्घ काल वर्तमानात राहणं अभिप्रेत असतं. अशा साधनेसाठी पती-पत्नी हे नातंच सार्थ ठरतं. 

४. ओशोंचं संभोगसे समाधीतक  पुस्तक निव्वळ शीर्षकामुळे  विकलं जातं. त्यात ओशो प्रणयाचा समाधीसाठी कसा उपयोग होऊ शकतो यावर काहीही बोललेले नाहीत. त्याबाबतीत त्यांनी विग्यान भैरव तंत्र या पुस्तकात यथासांग विचार मांडले आहेत.  सदर विवेचनात त्यांनी प्रणयाचा उपयोग समाधीसाठी करण्यासाठी दीर्घ कालावधी आणि उत्तेजनारहित चित्तदशा यांचा उल्लेख केला आहे.  त्यांचे याबाबतीतले एकूण चिंतन तुम्हाला मेडिटेशन द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम (पाने १९३ ते २०२) मध्ये वाचता येईल. 

ओशोंच्या विचारांबद्दल  माझं म्हणणं त्यांच्यावर टिप्पणी केल्याशिवाय कसं मांडणार ? त्यांनी एक मुक्त व्यवस्था म्हणून निर्माण केलेला दृष्ट लागण्या जोगा आश्रम एकाही साधकाला समाधीप्रत नेऊ शकला नाही याचा अर्थच त्यांची संभोगातून समाधीकडे नेणारी विचारप्रणाली व्यर्थ ठरली असा होतो. 

शिवाय ओशोंनी अष्टावके संहितेवर सहा भागात यथासांग निरुपण केलं आहे (अष्टावक्र महागीता) त्यात याच श्लोकावर ओशोंचं भाष्य तुम्ही वाचू शकता. ते वाचल्यावर तुम्हाला कल्पना येईल की संभोगसे समाधीतक लिहीणारे ओशो फक्त अष्टावक्राची री ओढतायंत !  माझा हा लेख मूळ संहिता आणि ओशोंचं निरुपण यापेक्षा वेगळा आणि कमालीचा आध्यात्मिक आहे. 

४. कामेच्छा संपली की  जीवनातला उत्साह संपतो ही उघड शारीरिक गोष्ट आहे कारण कामेच्छा आणि अंतस्त्रावी ग्रंथी एकमेकांबरोबर काम करतात. काम ही उत्तेजना असेल तर ती मनाचं संतुलन बिघडवते पण काम ही साधना असेल तर ती युगुलाला हमखास स्वास्थ्याप्रत आणते. मूळ प्रश्न ऊर्जेचा आहे. कामेच्छा हा ऊर्जा निर्मितीचा स्रोत आहे. कामाचा साधना म्हणून उपयोग करणाऱ्या  युगुलात कमालीचा अनुबंध आणि पारस्परिक सामंजस्य असतं त्यामुळे एकमेकांच्या इच्छेविरुद्ध काही करण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही.