मनावर तरंग उठणं बंद होणं नाही ! कारण मनावर तरंग उठणं बंद होणं अशी शारीरिक स्थिती जीवंतपणी येऊ शकत नाही. साधी गोष्ट आहे, समोर पत्नी आली आणि मन सक्रीय झालं नाही तर ती पत्नी आहे हेच कळणार नाही !  पूर्वीच्या आध्यात्मिक लोकांनी काय वाट्टेल ती ठोकाठोकी केली आहे. 

मन याचा अर्थ विचार; विचाराचे तीन पैलू आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. पत्नी समोर आली तर प्रथम तीचा चेहरा मेंदूतल्या स्मृतीशी पडताळला जातो (दृक), मग तीचं नांव मेंदूत उमटतं आणि ते ऐकू येतं (वाक आणि श्राव्य);  नंतर ओळख पटते; ही आपली पत्नी ! स्मृतीभ्रंश झाल्यावर हाच मेळ बसत नाही कारण मन योग्य प्रकारे सक्रीय होत नाही. 

तस्मात, जनक स्वतःला अज्ञानी किंवा मूर्ख समजत नाही ! कारण काय ? आता प्रत्येक घटना ही केवळ वास्तविकता आहे, त्यातून व्यक्तिमत्त्व निर्मिती होत नाही कारण  सर्वदा निष्क्रियस्य मे !  अत्यंत महत्त्वाचा फरक आहे;  मी कायम क्रियारहित आहे (मन क्रियारहित नाही) . जे घडतंय ते शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडतंय पण त्याचा मला स्पर्श होत नाही. मी क्रियारहित असल्यानं माझ्यात घटनेचे पडसाद उमटत नाहीत.  

२) अध्यात्माचा शब्दशः अर्थ अध्य + आत्म म्हणजे स्वतःचं अध्ययन असा आहे.  पण व्यावहारिक दृष्ट्या अध्यात्म ही चिंतामुक्त जीवन जगण्याची कला आहे. याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे ती व्यक्तीमत्त्वातून मोकळीक आहे आणि दुसरं म्हणजे ती घटनांनी अबाधित अवस्था आहे.  तुम्ही म्हणता तसा तो स्वतःकडे पाहण्याचा प्रयोग नाही, ती जाणीवेचा संपूर्ण  रोख स्वतःकडे वळवण्याची प्रक्रिया आहे.