स्वतःची पत्नी समोर आल्यावर जनकाचं मन सक्रिय होत नाही असं नाही. ते व्यवस्थित सक्रिय होऊन ती पत्नी आहे हा बोध होतो, पण जनक अशी व्यक्ती न उरल्यानं तदनुषंगिक स्मृतींचा कल्लोळ, सदर बोधामागे उठत नाही.
आता तुम्हाला फरक लक्षात येईल. पत्नीसमोर आल्या क्षणी आपल्यातला पती सक्रिय होतो; ती घटना वस्तुनिष्ठ राहत नाही. क्षणार्धात परिस्थिती त्याही पुढे जाते आणि आपल्या पत्नीच्या मनात आपली प्रतिमा काय आहे या दृष्टीनं आपण सर्व प्रसंगाकडे पाहायला लागतो, तसे वागायला लागतो. तीच्या दृष्टीनं आपण वेंधळे असू तर तो वेंधळेपणा कसा होणार नाही यासाठी प्रयत्नशील होतो. एखाद्याची पत्नी (दुर्मिळ असली तरी) स्वतःच्या पतीला बाजीराव समजत असेल तर त्याचा श्वास दीर्घ घेतला जाईल आणि तो एरवी जे करायला कचरला असता ते करायला पुढे होईल !
जनकावर मात्र त्या घटनेचा बरा किंवा वाईट काही परिणाम होणार नाही; तो प्रसंग काय आहे ते पाहील आणि त्या प्रसंगात उत्स्फूर्तपणे काय सुचेल आणि सहज होईल तसं वागेल. कारण आता जनक स्वतः एक निष्क्रिय स्थिती झाला आहे (सर्वदा निष्क्रियस्य मे); देहात आणि मनात जनक नांवाची कुणीही व्यक्ती उरलेली नाही .