१) आपण म्हणजे जाणीव नाही; आपण जाणीवेच्यापूर्वीची स्थिती आहोत. ही स्थिती अदिशा आहे; तीचा रोख कुठेही नाही. जगतांना मात्र बोध होण्यासाठी आपल्याला शरीरातून ठराविक ठिकाणी रोख वळवावा लागतो; हे अदिशा अवस्थेचं शरीरातून ठराविक दिशेनं उन्मुख होणं म्हणजे जाणीव.
२) क्रियारहितता आणि मनावर तरंग न उठणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. क्रियारहितता ही कायम स्थिती आहे, काय वाट्टेल ते झालं तरी तिथे क्रिया होऊ शकत नाही. मन निश्चल होणं म्हणजे मेंदूतले विचार (काही काळ) थांबणं, ती बुद्धावस्था नाही. नायगारा धबधब्यासमोर उभं राहिलं तर सर्वांचं विचारचक्र काही क्षण थांबतं, पण ती बुद्धावस्था नाही किंवा त्यांना स्वरूपाचा उलगडा झाला असं होत नाही.
३) सर्वांना बुद्धावस्था कळावी म्हणून हे लेखन आहे; ते होईल तितकं सोपं केलं आहे. इतक्या सोप्या शब्दात जगात अजून कुणीही अध्यात्म मांडलेलं नाही. तस्मात, "स्वतःकडे पाहणे म्हणजे स्थूलावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतून जाणीव (consciousness) अनुभवणे. तीजाणीव स्वानुभवल्यावरच त्या जाणिवेत राहता येणे शक्य होते आणि त्यावेळी आपण म्हणजेच जाणीव ह्याचे आकलन होते. जाणिवेचा रोख स्वतःकडे वळविण्याची गरज नाही कारण आपण म्हणजेच जाणीव (consciousness) " वगैरे दिशाभूल होईल अशी विधानं करण्याऐवजी तुमचे प्रश्न विचारा.
आपण म्हणजे जाणीव नाही हे (१) वरून तुमच्या लक्षात आलं असेल. सूक्ष्म, स्थूल अलीकडे, पलीकडे हे सर्व अज्ञानमूलक शब्दप्रयोग आहेत. सिद्धावस्था समजण्यासाठी ध्यानाची प्रक्रिया आहे ज्याची जगातली सर्वोच्च व्याख्या अष्टावक्रानं केली आहे, ती अशी अनावधानस्य सर्वत्र !
आता ही सर्वात मोठी कृल्प्ती आहे ! आपल्या जाणीवेचा रोख कायम शरीरातून (म्हणजे ज्ञानेंद्रियांतर्फे) जगाकडे आहे; तो स्वतःकडे वळला तर स्वरूपाचा उलगडा होते. तो उलगडा आहे; स्वतःला स्वतःची जाणीव होऊ शकत नाही कारण जाणीव हा रोख आहे. त्यामुळेच अनावधानस्य सर्वत्र ! अशी ध्यानाची परमोच्च व्याख्या किंवा तेच स्वरूपाचं यथार्थ वर्णन आहे. ओशो याला १८० अंशात रोख वळवणं ( Hundred And Eighty Degree Turn) असं म्हणतात. तस्मात, जाणीवेचा रोख, जगाकडून स्वतःकडे वळवणं हीच साधना आहे.