पण लेख आध्यात्मिक नसून माहितीपर असल्यानं त्या क्षम्य आहेत. तरीही झेन माझा सर्वात आवडता  पंथ असल्यानं नेमकं  स्पष्टीकरण देतो.

  लेखात म्हटलंय " समाधी, मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे." 

झेनची ध्यानप्रणाली मनाचं कोणत्याही प्रकारे केंद्रीकरण करायला शिकवत नाही.  भिंतीसमोर बसून शांतपणे भितं पाहणे ही झेन साधना आहे.  वर्षानुवर्ष झेन साधक भिंतीसमोर बसून कोरी भितं पाहतात ! कोणताही देव नाही, काहीही मंत्र नाही आणि  कोणतीही प्रश्नोत्तरं नाहीत ! झेन हा जगातला एकमेव पंथ आहे ज्यात आराध्य नाही, त्यांचा कोणताही ग्रंथ नाही आणि कोणतीही जटिल साधना नाही. कुंडलिनी नाही, ऊर्जेचं ऊर्ध्व गमन नाही, चक्र नाहीत की  कोणतेही यमनियम नाहीत; फक्त समोरच्या कोऱ्या भिंतीकडे शांतपणे पाहणं ! 

अशा प्रकारे  कोऱ्या भिंतीकडे  शांतपणे पाहताना, एका क्षणी साधकाच्या मनाचे तीनही पैलू आपोआप नाहीसे होतात.  ज्या क्षणी त्याला समोरची कोरी भितं स्पष्ट दिसते त्या क्षणी त्याच्या मनाचं  दृश्य प्रक्षेपित करणं थांबलेलं असतं; ज्या क्षणी त्याला आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू यायला लागतं त्या क्षणी मनाचा वाक हा पैलू निस्सरित झालेला असतो आणि मनाची  अविरत बडबड आणि प्रश्न ऐकण्यात कायमचा गुंतलेला श्राव्य, मोकळा झालेला असतो ! 

ही त्याला समाधीची पहिली झलक मिळते, तिला सटोरी म्हटलंय. काही काळ त्याचं मन पूर्णपणे थांबतं !

साधकाला पहिल्यांदा इतक्या व्यर्थ वाटणाऱ्या साधनेची महती कळते. मग साधक ती साधना तशीच पुढे चालू ठेवतो. 

एका धन्य क्षणी; साधकाच्या जाणिवेचा भिंतीकडे असलेला रोख आणि आजूबाजूचे आवाज ऐकण्यात गुंतलेली जाणीव; स्वतःकडे येते !       ( याला ओशो जाणिवेचा रोख १८० अंशात वळणं म्हणतात) . मग तिथे साधक उरत नाही कारण पाहण्याची क्रियाच साधक; साध्य आणि त्या दोहोतलं अंतर म्हणजे ज्ञान (किंवा जाणीव) असं विभाजन करत होती.  मग उरते ती केवळ शांतता !  याला समाधी किंवा साक्षात्कार असं म्हटलंय पण झेन त्या स्थितीला काहीही नांव देत नाही !