ओशोंची या विषयावर अनेक उत्तम पुस्तकं आहेत जी ओशो वर्ल्ड या वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहेत. ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ; एंप्टी बोट, वेन द शू फिटस ही मला आवडलेली आणि साधनाकालात उपयोगी ठरलेली पुस्तकं आहेत; नक्की वाचा.
पहिल्या पुस्तकात साधक गुरुला विचारतो
" आम्ही रोज उठतो, वस्त्र परिधान करतो, जेवतो, यातून बाहेर कसं पडायचं ? "
गुरू म्हणतो " वस्त्र परिधान करायची आणि जेवायचं ! "
शिष्य म्हणतो "मला समजलं नाही "
यावर गुरू म्हणतो " तुझी वस्त्र परिधान कर आणि भोजन कर! "
वरकरणी अत्यंत सोपा पण शांतपणे वाचल्यावर असंभव वाटणारा, रोजच्या जगण्यातला, हा आदिम अध्यात्मिक प्रश्न आहे.
आपल्याकडे हा प्रश्न अत्यंत क्लिष्ट करतात
" या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका कशी व्हावी ? "
वाचणारा मनात म्हणतो झक मारली आणि प्रश्न वाचला !
उत्तर देणारा पण इतका भंपक असतो की तो मागचे जन्म, पुढचे जन्म, कर्मसिद्धांत, अमक्यानं काय सांगितलंय, तमका काय म्हणाला अशी वाट्टेल ती फेकाफेक सुरू करतो ! अशाप्रकारे अध्यात्माची पूर्णपणे वाट लावली जाते.
झेन संप्रदायत किती सहज विचारणा आहे; " या रोजच्या त्याच त्या दैनंदिनीतून बाहेर पडायचा मार्ग काय ? "
आणि उत्तर ही किती सहज पण प्रगल्भ आहे " दैनंदिनी अनुसरा ! "
शिष्य म्हणतो " मला समजलं नाही ! "
आणि गुरू म्हणतो " तू वस्त्र परिधान कर आणि जेवण कर ! "
काय अर्थ आहे या संवादाचा ? ज्या वेळी साधक शांतपणे आणि समरसून वस्त्र परिधान करेल आणि भोजन करेल त्या वेळी त्याच्या लक्षात येईल या दैनंदिनीत आपण अडकलेलो नाही, शरीरात कुणीही नाही, शरीरात आपण बद्ध आहोत असं वाटणं हा शरीराशी तादात्म्य झाल्यामुळे होणारा निव्वळ भास आहे. आपण शरीराच्या आत-बाहेर असलेली मोकळी जागा आहोत. देह धारण केलेली व्यक्ती नाही ! आपली दैनंदिनीतून सुटका होण्याचा प्रश्नच नाही कारण आपण देहात बंदी झालेलोच नाही !