विपश्यनेचा काहीही उपयोग नाही.  

लेखाचा थोडक्यात सारांश असा आहे : 

मनाची एकाग्रता आणि संवेदनांचे तटस्थ निरीक्षण हाच विपश्यना ध्यानप्रक्रियेचा गाभा आहे. विपश्यना शब्दाची फोड वि + पश्यना अशी आहे. पश्यना म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. थोडक्यात स्वतःच्या आत डोकावणे! पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!त्या संवेदनांवर रीअ‍ॅक्ट झाले नाही तर त्या संवेदना क्षीण होऊन विरून जातात आणि मनाची त्या विकारांपासून मुक्तता होते.

हा उद्योग अनंतकाल करावा लागतो, दरम्यान नवे उद्वेगक तयार होतात; त्यांचं निस्सरण करणं पुन्हा क्रमप्राप्त होतं, अशाप्रकारे ही न संपणारी आणि अत्यंत कंटाळवाणी साधना आहे.  सद्यकालात बाह्यसंप्रेरकांचा चित्तदशेवर होणारा परिणाम  बुद्धाच्या कालापेक्षा कैक पटीनी  आहे. संवाद, संपर्क, मनोरंजन आणि माहितीचा प्रचंड ओघ सतत मनावर येत राहतो (सेल फोन हा सर्वात महत्त्वाचा पण अनिवार्य विक्षेप निर्माण झाला आहे); शिवाय नात्यातली गुंतागुंत कमालीची वाढली आहे (उदाहरणार्थ घटस्फोट, मुलांचं परदेशात स्थायिक होणं, मुलांच्या वैवाहिक समस्यातले पेच). तस्मात, विपश्यना सद्यकालात एक निरुपयोगी साधना आहे.  कालापव्यय आणि या साधनेची फलश्रुतीच होत नसल्यानं येणारं नैराश्य हा एक नवा ताप होऊन बसतो.