(तत्वज्ञानाने ) दाढदुखी थांबणार नाहीच कारण त्यात दाढदुखीची उपाय नाही  किंवा दाढदुखी कशी थांबवावी ह्याचा मार्ग नाही. 

प्रोफेसर महाशयांना "तत्वज्ञानाने दाढ-दुखी थांबत नाही" यात काय अभिप्रेत होते, ते बहुतेक तुमच्या पर्यंत पोहोचले नाही. तत्वज्ञानात दाढदुखीचा उपाय नाही  किंवा दाढदुखी कशी थांबवावी ह्याचा मार्ग नाही, हा मुद्दा नव्हता. तसे म्हंटले तर गणित, फिजिक्स, भूगोल, साहित्य, . . . कार्डियोलोजी यात पण दाढदुखी कशी थांबवावी ह्याचा मार्ग नसतो. पण, तत्वज्ञान म्हणजे सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाणारे एक श्रेष्ठ ज्ञान असा एक समज सामान्य लोकांचा असतो. तो समज चुकीचा असेल, पण असतो. म्हणून कोणी जास्त शहाणपणा दाखवू लागला की "उगाच जास्त तत्वज्ञान पाजळू नकोस"; असा वाक्य प्रयोग आहे. "उगाच जास्त गणित, फिजिक्स, भूगोल, साहित्य . . . कार्डियोलोजी पाजळू नकोस" असा वाक्य प्रयोग नाही. त्या अर्थाने त्यांना म्हणायचे होते (असणार) की तत्वज्ञान हे कितीही सखोल वगैरे ज्ञान असले, तरी त्यात भौतिक जगातील समस्यांची उत्तरे नसतात.

आता अध्यात्म, विपश्यना, वगैरे यात पण भौतिक जगातील समस्यांची उत्तरे नसतात, हे दाखवून देणे हा चर्चेचा विषय नाही. कारण अध्यात्माने किंवा विपश्यनेने भौतिक जगातील प्रश्न सुटतात असा क्लेम तुम्ही किंवा संजय क्षीरसागर यांनी केलेलाच नाही. तर, जो क्लेम केलेलाच नाही त्यावर वाद घालण्याचे कारण नाही. मग मला काय खुपते आहे? तीन प्रॉब्लेम्स आहेत.

प्रॉब्लेम एक : या विषयावर मनोगत येथे जेवढे लेख प्रकाशित होतात ते वाचताना असे जाणवते कि अध्यात्म, ब्रम्ह / परब्रम्ह समजणे, विपश्यना, ध्यान-धारणा, व तत्सम परिसरात वावरणाऱ्या तुम्हा लोकांचा एक एटीट्यूड असतो - कि जणू मानव जमात ही दोन गटात विभागलेली आहे. एक, आम्ही साधारण मानव, म्हणजे अगदी काही मोजके लोक वगळता जवळ पास अख्खी मानव जमात. आमचे ज्ञान रोजच्या जगात तग धरून राहण्या पुरतेच मर्यादित असते; जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन आम्ही एका कैफात जगत असतो; आम्ही अज्ञानामुळे इंद्रियसुखांच्या मागे लागलेले आहोत व ‘इंद्रियसुख’ हेच अंतिम सत्य मानून बसलो आहोत; भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून सुखलोलुप होण्यात धन्यता मानत आहोत. आम्हाला हे कळतच नाही कि अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही आमच्या आयुष्यातले दु:ख संपले नाही, आम्ही समाधानी झालो नाही, आमचे विकार संपले नाहीत. उलटपक्षी आम्ही अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झालो आहोत आणि नेणिवेत जगू लागलो आहोत. 

आणि दुसरा गट म्हणजे तुम्ही. काही अगदी मोजके लोक, जे एका वेगळ्याच पातळी वर आहात. तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्ती झाली आहे. खरे विज्ञान, जाणिवेचे आकलन, जडावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली अनुभूती घेत जाणिवेचे ज्ञान झालेले आहे. आपण म्हणजे नेमके कोण; आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय; आणि अंतिम सत्य काय; हे सर्व तुम्ही जाणिवेच्या सूक्ष्म विज्ञान पातळीवरून समजून घेतले आहे. आपण सत्य आहोत हा उलगडा तुम्हाला झालेला आहे. तुम्हाला हे पण समजलेले आहे कि माया भासमान आणि अशाश्वत आहे, तिच्यामुळेच दुःख उपजते. पण तुम्ही विवेक बुद्धीने पाहिले असल्याने तिचे सत्यस्वरूप तुमच्या लक्षात आलेले आहे; शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती तुम्हाला कळली आहे; व ते माया पाश सोडवून, परब्रम्हाची तुम्ही उपासना करीत आहेत, वगैरे, वगैरे, वगैरे . . . 

(हे सर्व तुमचे शब्द आहेत. असले शब्द लिहिण्या इतकी माझी प्रतिभा नाही. इतर लेखक वेगळे शब्द वापरतील. पण आशय तोच) 

हा एटीट्यूड संपूर्ण लेखात भरलेला असतो, व तो अत्यंत पुट-ऑफ करणारा आहे. तुम्हाला विपश्यना वा संजय क्षीरसागर यांना ब्रम्ह साधना (or whatever), . . जे करायचे असेल ते करा. त्यातून तुम्हाला काय मिळाले हे सांगायचे असेल, तर ते सांगा. आम्हाला पटले तर आम्ही पण करू. पण ते सांगताना इतरांना तुच्छ लेखण्याचे कारण नाही. आम्ही जडसृष्टीच्या ज्ञानाने धुंद होऊन एका कैफात जगत आहोत, अज्ञानी आहोत, इंद्रियसुखांच्या मागे लागलेले आहोत; . . . . वगैरेत शिरण्याची गरज नाही. 

आम्ही पण उलट आरोप करू शकतो - असे म्हणू शकतो कि तुमच्यात भौतिक विश्वातील प्रश्न सोडविण्याची हिम्मत नाही म्हणून तुम्ही अध्यात्मात पळवाट शोधत आहात. पण मी तसे म्हणणार नाही. ही आपले विचार मांडण्याची सुसंस्कृत पद्धत नव्हे. मला वांग्याची भाजी आवडत असेल, तर वांग्याची भाजी चांगली कशी हे सांगावे. ते सांगताना तुमच्या आवडत्या भाजी वर टीका करण्याचे कारण नाही. 

प्रॉब्लेम दोन : पार्सल मधून अपेक्षित मोबाईलच्या ऐवजी दगड निघाला, तर तुम्ही काय करता ? जाणिवेच्या सूक्ष्म विज्ञान पातळीवरून आपण सत्य आहोत हा उलगडा, शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती कळली असल्याने तुम्ही असे तर म्हणत नाही कि "अरे, मोबाइल काय आणि दगड काय. सर्व माया आहे. भासमान आणि अशाश्वत आहे. तिच्यामुळेच दुःख उपजते. पण मी विवेक बुद्धीने पाहिले असल्याने तिचे सत्यस्वरूप मला उमजलेले आहे." तुम्ही पण ऍमेझॉनकडे तक्रारच करता, व मोबाईल मिळवता. आम्ही पण तेच करतो. मग तुमच्यात आणि माझ्यात फरक तो काय? 

फरक काहीही नाही. तुम्हाला असे वाटते कि मी जी तक्रार करतो ती ऍमेझॉनला धडा शिकविण्याच्या उद्देशाने करतो, म्हणजे मी "विचारांच्या गर्तेत" अडकलेला असतो, आणि परिस्थितीचे माझ्या वर नियंत्रण असते. (सगळे तुमचेच शब्द)  कसे काय तुम्ही या निष्कर्षावर पोहोचलात? उलट, माझे परिस्थिती वर पूर्ण नियंत्रण असते, मी तक्रार करतो, ऍमेझॉनला लीगल नोटिस पाठवितो, ग्राहक मंचा कडे पण फिर्याद दाखल करतो, सोशल मिडीया वर रान उठवितो, ऍमेझॉनला एक सुद्धा पळवाट ठेवीत नाही. तुम्हाला असे वाटते कि परिस्थितीचे माझ्या वर नियंत्रण आहे. तर मला असे वाटते कि तुमच्यात ऍमेझॉनला धडा शिकविण्याची धमक नाही. आणि वास्तव काय आहे ? वास्तव फक्त येवढेच आहे, आपण दोघेही ऍमेझॉनकडे तक्रार करतो. बास्स. बाकी सर्व परसेप्शन्स आहेत, आणि त्या पलीकडे काहीही नाही.

प्रॉब्लेम तीन : या बद्दल पूर्वी बरेच लिहून झालेले आहे, म्हणून थोडक्यात लिहितो. आपल्याला जडावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतले जाणिवेचे ज्ञान झालेले आहे; आपण म्हणजे नेमके कोण; आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय; आणि अंतिम सत्य काय; हे समजलेले आहे; शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती कळली आहे; . . . . . वगैरे जे तुम्हाला वाटते ना, ते फक्त "वाटणे" आहे. तुम्हाला असे काहीही कळले नाही, असे जर कोणी आव्हान  दिले, तर तुम्ही त्या आव्हानाला उत्तर देऊ शकत नाही. जसे, मला quadratic equations समजलेल्या आहेत याला कोणी आव्हान दिले, तर मी माझे quadratic equations चे ज्ञान सिद्ध करू शकतो. quadratic equations चे सोल्यूशन डिराईव्ह करून दाखवू  शकतो, quadratic equations सोडवून दाखवू शकतो. त्या तुलनेत, तुम्हाला शाश्वत अशा पूर्णब्रम्हाची महती कळली आहे या आव्हानाला तुम्ही कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही म्हणता तुम्हाला हे सगळे कळले. ज्याला विश्वास ठेवायचा असेल त्याने ठेवावा. (झाकल्या मुठीत सव्वा लाखच नव्हेत, तर अख्खे परब्रम्ह :-) मागे एकदा संजय क्षीरसागर यांना उत्तर देताना मी लिहिले होते, कि तुम्हाला रब्रम्ह कळले आहे, तर मला रब्रम्ह कळले आहे.

असे काहीही खरब्रम्ह नसते, व जे नसतेच ते मला समजण्याचा प्रश्नच येत नाही. हे केवळ एक तर्क समोर ठेवण्या पुरतेच जन्माला घातले होते. तर्क असा, कि तुम्ही मला खरब्रम्ह असणे, व ते मला समजणे यातील काहीही सिद्ध करायला सांगू शकत नाही. कारण मग तुम्हाला पण परब्रम्ह असणे व ते तुम्हाला कळले असणे सिद्ध करावे लागेल. पण खरब्रम्ह असणे, व ते मला समजणे हे तुम्ही मान्य पण करू शकत नाही. कारण मी स्वता:च सांगतो आहे कि ती निव्वळ थाप होती. 

अध्यात्माचा हाच प्रॉब्लेम आहे. जड जड असे शब्द, नेमके काहीच नाही, ना कोणत्याही संकल्पनेचे प्रूफ, व ना ती समजली असल्याचे प्रूफ. डायरेक्ट तर नाहीच पण इन-डायरेक्ट पण नाही. फक्त शब्दांचा खेळ.