अध्यात्मिक व्यक्तिला मृत्यूची अनिवार्यता कळली आहे आणि बाकीच्यांना त्याचं भान नाही. अध्यात्मिक व्यक्ति अमृताच्या शोधात आहे आणि बाकीचे किरकोळ प्रश्न सोडवण्यात गुंतले आहेत. खरी गंम्मत पुढे आहे, ज्याला अमृत गवसलंय तो इतरांना ते सांगायचा प्रयत्न करतोयं पण बाकीच्यांना एकतर त्यात रस नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना तो शब्दांचा खेळ वाटतोयं !

ब्रह्मज्ञानावर माझा कुणीही प्रतिवाद करू शकलं नाही. गेली अकरा वर्ष मी इथे इतक्या असंख्य प्रकारे अध्यात्मिक लेखन केलं आहे, मला एकदा ही माघार घ्यावी लागली नाही. माझ्या लेखांचा असंख्य लोकांना इतका उपयोग झाला आहे की मला  सुद्धा आश्चर्य आहे.  आणि मी सांगतो तरी काय आहे ? आपणच सत्य आहोत ! पण तुमचा सदोदित एकच उद्योग चालू आहे; माझं भाषेवर प्रभुत्व आहे आणि त्यापालिकडे लेखनाला काही अर्थ नाही.

ब्रह्म नाकारणारा स्वतःलाच नाकारत असतो कारण तो स्वतःच ब्रह्म आहे; स्वतःला व्यक्ति समजणं हेच सर्व समस्यांचं मूळ कारण आहे. आणि एकदा स्वतःला व्यक्ति समजलं की स्वतःला तुच्छ समजणं त्यात अंतर्भूत आहे ! व्यक्तिमत्व आणि न्यूनगंड ही एकाच गोष्टीची दोन नांवं आहेत.