तुम्ही कोणीही जर फक्त असे म्हंटले, 

हे बघा - आयुष्यात चढ-उतार असतातच. सगळच आपल्या मना सारख होत नाही. प्रतिकूल परिस्थिती मुळे येणारे ताण आपल्या मनाला व शरीराला इमपेक्ट करतातच. त्याने साधे हायपर टेंशन पासून ते नैराश्य पर्यंत अनेक व्याधी होऊ शकतात. मग डॉक्टर बीपी कमी करणा-रा, ट्रन्किवीलाईझर किंवा अन्टी-डिप्रेसण्ट वगैरे गोळ्या देतात. पण त्यांचे इतर अवांछित साईड इफेक्ट असतात. त्या ऐवजी  . . . 

आणि मग काहीही उपाय सांगा. विपश्यना / सत्संग / अमक्या-तमक्या गुरुची दीक्षा/ योग / ध्यान धारणा / अध्यात्मावरची प्रवचने / भक्तीवेदांतम / . . . . . काहीही सांगा. त्यात कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही.  

आक्षेप तेव्हां येतो जेव्हां तुम्ही लेक्चर देता - 

तुम्ही ज्या भौतिक जगात वावरता त्याबद्दलचे भौतिक ज्ञान रोजच्या जगात तग धरून राहण्यासाठी तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन तुम्ही सगळे एका कैफात जगत आहात. . . . अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही तुमच्या आयुष्यातले दु:ख संपले का? तुम्ही समाधानी झालात का? तुमचे विकार संपले का? तर नाही, उलटपक्षी तुम्ही अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झालात आणि नेणिवेत जगू लागले आहत. अज्ञानामुळे इंद्रियसुखांच्या मागे लागून, ‘इंद्रियसुख हेच अंतिम सत्य मानून बसले आहात, त्यासाठी भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून सुखलोलुप होण्यात धन्यता मानत आहात. 

ब्रम्हच एक काय ते सत्य आहे. आणि ते अंतिम सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. ब्रह्म हा आकार नाही त्यामुळे ते नक्की कुठे आहे ते दर्शवता येत नाही. तसेच ते इतकं सार्वभौम आणि अखंड आहे की ते नाही अशी कोणतिही जागा नाही. ब्रह्म नाही  असे म्हणणे, किंवा ते सिद्ध करा अस म्हणणं निर्बुद्धपणाचं  आहे.  मी येवढा ज्ञानी, मी सांगतोय ना, की ब्रम्ह आहे. म्हणजे आहे. विषय संपला. अजून तुम्हाला ब्रम्ह कळल नाही?  काय आहे - ब्रम्ह ही उघड गोष्ट आहे, पण ती कळणारा भाग्यवंत कोट्यवधीमध्ये एखादाच ! एखादा बुद्ध, कृष्ण,  अष्टावक्र, जनक, ओशो, निसर्गदत्त, एकहार्ट, ........ किंवा मी !  [ होय, इथे  मनोगत वर एकाने असे म्हंटले ] ब्रह्म कळायला दोन गोष्टी हव्यात, संपन्नता आणि कमालीची आकलनक्षमता. संपन्नता अनेकांकडे असू शकते पण ब्रह्माचा उलगडा होण्यासाठी लागणारी आकलन क्षमता अत्यंत दुर्लभ. ती माझे कडे आहे. आणि तुमच्या कडे नाही, 

ज्यांना हे समजल नाही ते कायम अस्वस्थतेत जगतील कारण त्यांच्यासाठी देह हेच सर्वस्व आहे आणि देह नाशवंत आहे त्यामुळे देह जगवण्यात ते कायम एक व्यर्थ खटाटोप करत राहतील. त्यांना विदेहत्वाचं स्वास्थ्य त्यांना लाभणं शक्य नाही. ते कायम शब्दद्वंद्वातच अडकून राहतील, त्यांना शांतता लाभणं असंभव आहे. 

. . .  वगैरे. 

हे असले स्वर जेव्हां तुम्ही लोक लावता तेव्हा सगळच बेसूर होत. 

टीप : इथे "तुम्ही" या शब्दाचा अर्थ व्यतिश: तुम्ही "सोकाजी त्रिलोकेकर" असा नसून जगाला अ-भौतिक पातळी वरचे पांडित्य शिकविणारे तुम्ही सगळे, असा आहे.