संक्षी,
एखाद्या गंतव्य ठिकाणी जाण्याचे अनेक मार्ग असतात. काही मार्ग लांबचे असतात काही जवळचे. काही कष्टप्रद असतात तर काही एकदम सोपे. जो मार्ग ज्याला परवडतो / भावतो तो त्या मार्गाने जातो आणि गंतव्य ठिकाणी पोहोचतो. कधी आणि कसा पोहोचणार हे त्या मार्गावर आणि त्या व्यक्तीच्या त्या मार्गाच्या अनुभूतीवर अवलंबून असतं. पण मार्ग किंवा 'कधी आणि कसं' हे अजिबात महत्त्वाचं नाही, पोहोचणं हे महत्त्वाचं.
त्यामुळे आपण ज्या मार्गाने जातोय तोच सर्वात जवळचा आणि योग्य आहे असं वाटणं हे स्वाभाविक आहे कारण ती वैयक्तिक अनुभूती असते. पण तीच अनुभूती दुसर्याचीही असावी असं वाटलं तरी ते आपण शक्य करू शकत नाही. कारण अध्यात्म (अधि + आत्म) हे नेहमी 'स्वतःसंबंधी' असत, वैयक्तिक असतं.
तुमच्या अनुभूतीचा आणि ज्ञानाचा पूर्ण आदर आहेच. पण उलगडा होणं, स्व गवसणं , समोर निराकार दिसणं ही अशी वाक्य काहीच सिद्घ करू शकणार नाहीत कारण ही वाक्य अनुभूती देत नाहीत. त्यासाठी मार्ग महत्त्वाचा. कारण मार्ग आणि मार्गक्रमणं ही कृती आहे आणि कृतीच अनुभूती देऊ शकते.
गंतव्य ठिकाण किती सुंदर आहे, तिथे कशी शांतता आहे, तिथे XXXXXXXXX हे एखाद्याला रोज रोज सांगून त्याला त्या गंतव्य ठिकाणी काय आहे ह्याचे ऐकीव आणि चिंतनमय ज्ञान होईल; पण अनुभव येणार का तिथे गेल्याशिवाय? त्यामुळे तिथे कसे पोहोचायचे हे सांगणं महत्त्वाच, मार्ग महत्त्वाचा. हे काम गुरुचं असतं, पण फक्त रस्ता दाखवणं. गंतव्य ठिकाणी पोहोचणं, न पोहोचणं ही मार्गक्रमण करनार्याची अनुभूती असते जी गुरू (किंवा दुसरा कोणीही) देऊ शकत नाही, तो फक्त मार्ग दाखवू शकतो.
ता.क.:
१. तुम्ही विपश्यना कुठे आणि कशी केलीत हे मला माहिती नाही. पण 'महासतिपठ्ठाण' शिबीरात दोन श्वासांमधली जाणीव ह्यावरच फोकस असतो. १० दिवसांच्या दुसऱ्या शिबीरातही जुन्या साधकांना ह्यावरच फोकस करायला सांगितले जाते.
२. वर्तणुकीत कायमचा बदल होंणं हे स्वतःविषयीची जाणिव झाल्याशिवाय होत नाही.
३. श्वासात अडकून पडण्यापेक्षा त्यापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणं हीच साधना आहे.
- (साधक) सोकाजी