लेख संपन्न करतांना, व्यक्तीमत्त्वाचा निरास होण्यासाठी आणि पर्यायानं सत्याचा उलगडा होण्यासाठी एक सोपी साधना सांगतो. . . . . तुम्ही फक्त समोर पाहा आणि आजूबाजूला जे चाललंय ते ऐका !
केली. सोपी साधना केली. साधना वरकरणी अत्यंत सोपी वाटली तरी कमालीची प्रभावी आणि आतापर्यंत एकाही सिद्धानं किंवा कोणत्याही अपौरुष्येय ग्रंथात जिचा उल्लेख नाही; तरी सुद्धा कर्मसंलग्न (डायनॅमिक) आणि अत्यंत तर्कशुद्ध; अशी ही साधना केली. बाका प्रसंग गुदरलेला नव्हता, तरी सुद्धा केली. फक्त समोर बघितले आणि आजूबाजूला जे चालल होत ते ऐकलं. आणि अहो आश्चर्यम !! एका क्षणात मी वर्तमानात आलो; प्रसंगातली व्यक्तीसापेक्षता दूर झाली व तो वस्तुनिष्ठ झाला; त्यामुळे माझे व्यक्तीमत्त्व सक्रीय होण्याऐवजी त्या प्रसंगी आवश्यक असलेलं अंगभूत कौशल्य माझ्यात जागृत झाल; मनाचे दृक आणि वाक हे दोन्ही मुख्य पैलू निष्प्रभ झाले; आणि त्याच क्षणी मला कायम समोर उभा ठाकलेला आणि सर्वस्व व्यापून असलेला निराकार दिसला. हे दर्शन इतकं प्रत्यक्ष होत, की मला इतर कोणत्याही पुराव्याची किंवा कोणाच्याही प्रज्ञापनाची गरजच उरली नाही. "निश्चलं ज्ञानं आसनं" या सूत्राचा उलगडा झाला (संस्कृत भाषेचे ज्ञान नसून सुद्धा); "अकंप ज्ञान हेच आसन" याचा पण अनुभव आला (म्हणजे काय ते कळले नाही. पण कळणे महत्वाचे नाही). मग माझ्या हे देखिल लक्षात आल की आत्मविश्वासाचा माझ्या रूप, बुद्धी, संपत्ती, किंवा ज्ञान याच्याशी काहीएक संबंध नाही ! आत्मविश्वास म्हणजे आपणच आत्मा आहोत हा विश्वास. या उलगड्यासरशी मी कमालीचा स्वस्थ झालो. म्हणजेच स्वतःत स्थिर झालो. भारतीय असल्या मुळे मानसिकतेवर असलेला अध्यात्मिक मूढ कल्पनांचा पगडा दूर झाला. मी निष्कारण विनम्रतेचं प्रदर्शन घडविणे थांबवले, पूर्वी त्या भानगडीत बावळटपणा पुन्हा उसळून येत असे, ती शक्यता पण गेली. आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम झाली आणि त्यामुळे सत्याचा उलगडा झाला. आता मला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, पथ्य-अपथ्य-कुपथ्य, व्यायाम, लिहिणं, वाचणं, वाद-विवाद करण, ध्यान, धारणा, आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्याची गरज उरली नाही. मी फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर आहे. विषय संपला !
(संपला ना ? का अजून भाग 4, 5, . . . N बाकी आहेत ?)