रमण महर्षींविषयी मी अनुवाद करत असलेल्या गोष्टींचा अन्वयार्थ वेगळा वेगळा लागू शकतो. 

काही गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेत. दोन व्यक्तींमधला संवाद हा नेहेमी उभयपक्षी असलेली पात्रता, पार्श्वभूमी तसेच स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या अनुषंगाने साक्षेपाने बघावा लागतो. रममहर्षी आणि त्यांचे शिष्य यातले संवाद बहुतांशी 'एकल' पद्धतीचे असत. व्याख्यान, प्रवचन पठडीतला सार्वत्रिक असा पदेश ते कधीच करत नसत.  त्यामुळे व्यासपीठावर उभे राहून तुम्ही हवे ते करा, वाट्टेल तसे वागा आणि फक्त मला आपले गंतव्य (उदा. व्यसनमुक्त होणे ते  आत्मसाक्षात्कार होणे) सांगून बाकी सगळे माझ्यावर सोडा असे सरसकट आश्वासन त्यांनी द्यावे अशी शक्यताच उद्भवत नाही. सरसकटीकरण हा तर्कदृष्ट्या दोष आहे हे आपल्याला माहित आहेच. असो.

'कुणीतरी' सद्गुरू करणे आणि रमण महर्षींकडे मदत मागणे यात माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाने जिंगल गुणगुणणे आणि गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी भूप खुलवणे इतके महदंतर आहे. महर्षींची (किंवा व्यापक अर्थाने गुरूतत्वाची) महत्ता किंवा अधिकार एखाद्याला मान्य नसेल आणि तो सरसकटपणे कुणीतरी सद्गुरू करा आणि वाटेल तसे वागा असा या गोष्टीचा अन्वयार्थ काढत असेल तर 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या न्यायाने ते साहजिकच आहे. 

कोणी कुणाची नैय्या पार करू शकत नाही हे  अर्धसत्य आहे. नैय्या पार करवता न येणे याचा अर्थ कुणी कुणाला कसलीच मदत करू शकत नाही असा होत नाही. तसे असेल तर गुरू आणि शिष्य हे शब्दच निरर्थक ठरतात. नाही का? अभ्यास न करणाऱ्या शिष्याला शिक्षक उत्तीर्ण करू शकत नसेल, पण तो काहीच शिकवू शकत नाही असे का म्हणावे? श्चात्तापदग्ध व्यक्तीला न्मार्गावर येण्यासाठी सत्पुरूषच काय तशी प्रामाणिक ईच्छा असलेली कुणीही व्यक्ती आपापल्या वकुबाप्रमाणे  मोलाची मदत करू शकते हे चूक आहे का? 

आपण चूक करतो आहोत हे प्रत्येकाला उमगते का? ते उमगल्यावरही एखाद्या सत्पुरूषाची मदत घ्यावी अशी बुद्धी त्याला होते का? सत्पुरूषाविषयीचा श्रद्धाभाव पक्का होत गेल्याने अचानक काही परिवर्तन घडून किंवा इंच इंच खिंड लढवत  सन्मार्गाला लागलेल्यांची अगणिक उदाहरणे संत साहित्यात आहेत.  एका पश्चात्तपदग्ध व्यकीला महर्षींनी अत्यंत ठाम (ऍसर्टिव्ह), आश्वासक आणि सकारात्मक पद्धतीने उत्तर दिले असे मला वाटल्याने हा अनुवाद केला.  असो.