महापुरुष, संत आदी मंडळींची नांवे घेउन लिहिण्याचे एक बरे असते. काय वाट्टेल ते लिहिता येते. कोणी त्याची चिकित्सा करू धजत नाही, कारण महापुरुष / संत यांच्या वचनां वर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप होतो. त्यातून, "बाबा वाक्यं प्रमाणं" अशी आपली संस्कृतीच आहे. "माझ्यासाठी स्थळ, काळ किंवा अंतर या गोष्टी खरोखरच अस्तित्वात आहेत का?" . असे जर "हरिभक्त : किंवा टी एस अनंतमूर्ती यांनी म्हंटले असते, तार त्याना विचारता आले असते, की म्हणजे, न्यूटोनियन मेकानिक्स (रिलेटिविटी ऑफ स्पेस), आईन्स्टाईन चे संशोधन (रिलेटिविटी ऑफ टाईम) सगळे चुलीत घालायचे का? स्थळ व काळ या गोष्टी अस्तित्वातच नसतील, तर मग न्यूटन, आईन्स्टाईन यांनी ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यांचे संशोधन करण्यात अख्खा जन्म वाया घालवला का?
पण हे वाक्य रमन महर्षी यांच्या नावा वर टाकले आहे. म्हणजे काही आक्षेप पण घेता येत नाही. कोण जाणे महर्षी खरोखर असे काही म्हणाले होते का. "हरिभक्त" या टोपण नावाची कोणी व्यक्ति असे म्हणते; की टी एस अनंतमूर्ती यांनी त्यांच्या एका पुस्तकात असे म्हंटले आहे; की रमन महर्षी एकदा असे म्हणाले; की . . .
ज्यांची श्रद्धा असेल, त्यांनी विश्वास ठेवावा. आमच्या सोसायटीत एक गृहस्थ आहेत. उच्च शिक्षित, पेश्याने CA, जग हिंडलेले, पण आता एका बुवांच्या आहारी. एकदा मला सांगत होते "अहो पंडित, काय सांगू तुम्हाला. आमचे गुरु इतके महान आहेत. एकदा मी त्यांना भेटायला ऋषिकेशला त्यांच्या आश्रमात गेलो. गुरुजी तिथे बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले "कोणाला नमस्कार करतो आहेस?". मी म्हंटले, "गुरुजी, तुम्हाला". ते म्हणाले "तुला असे वाटते आहे का की मी येथे तुझ्या समोर बसलेला आहे?" मी म्हंटले, "हो, तुम्ही माझ्या समोर आहत की". ते हसले, व म्हणाले "वेड्या, अरे, मी येथे नाहीच. मी माझ्या सनफ्रान्सिस्को येथील आश्रमात आहे. हे बघ मी माझ्या सनफ्रान्सिस्को येथील एका शिष्याला फोन लावतो". असे म्हणून त्यांनी त्यांचा मोबाइल उचलला, एक नंबर लावला, आणि फोन माझ्या हाती दिला. पलीकडून एका इंग्रज माणसाचे हॅलो आले. त्यांच्या सांगण्या वरुन मी त्याला विचारले, गुरुजी आता कुठे आहेत ? आणि तो म्हणाला, सनफ्रान्सिस्को येथील आश्रमात आहेत.
"पंडित, इतका सिद्ध माणूस तुम्ही कधी बघितला होता का?" काय बोलणार मी ? मूर्खपणाचा कळस आहे. पण असे काही म्हणण्यात अर्थ नव्हता. कारण एकूणच हा प्रांत सगळा निव्वळ श्रद्धेचा आहे. इथे मुळात लॉजिकच नसते त्यामुळे कशाचेही प्रूफ देण्याचा प्रश्नच येत नाही. काहीही लिहावे व "हे तर स्वयं सिद्ध आहे" असे सांगून ते सिद्ध करण्याच्या, किंवा काही किमान प्रूफ देण्याच्या जबाबदारीतून मोकळे व्हावे. त्यातून एकादा प्रश्न उपस्थित करणारा उपटलाच (जसे मी, सोत्री) तर त्याला "पृच्छा प्रामाणिक हवी, तुमच्या प्रश्नातून अज्ञान जाहीर होतं" वगैरे अपशब्द फेकून गप्प करता येत.
काहीच्याबाही उपमा. "शांत डोहात चांदण्याचं प्रतिबिंब पडत, . . पण चांदण्याचा पाण्याला आणि पाण्याचा चांदण्याला कुठेही स्पर्श होत नाही, तद्वत घटनेचा सिध्दाला किंवा सिद्धाचा घटनेला कुठेही स्पर्श होत नाही !" (महर्षी संजय उवाच 03.11॰2019). एक काहीतरी वस्तुस्थिती घ्यायची, व मग "तद्वत" असे लिहून काय वाट्टेल ते ठोकून द्यायचे. आता यात गोम अशी आहे, की "अमूत, तद्वत्त तमूक" यात कोणते "तमूक" valid, हे उदाहरण देणाराच ठरवणार. असे ही म्हणता येईल, "शांत डोहात चांदण्याचं प्रतिबिंब पडत, पण चांदण्याचा पाण्याला आणि पाण्याचा चांदण्याला कुठेही स्पर्श होत नाही, तद्वत ज्ञानाचा वा सत्याचा अध्यात्मवाद्याला, किंवा अध्यात्मवाद्याचा ज्ञानाला वा सत्याचा कुठेही स्पर्श होत नाही !" पण कोणी असा प्रतिवाद केल्यास "तुमच्या प्रश्नातून अज्ञान जाहीर होतं; हा सार्वत्रिक घोर गैरसमज आहे; निर्बुद्धपणा आहे, मलाच काय ते सत्य कळले आहे, बाकीच्यांना त्याचं भान नाही." वगैरे अस्त्रे आहेतच.
एक कळत नाही, इथे मनोगत वर असल्या बोजड व अर्थहीन लेखांचा इतका बुजबुजाट का ? मराठीस्रुष्टी ही वेब साईट बघा, कशी "जिवंत" व वास्तवात जगणारी वेबसाईट आहे.