संजय,
माझी किंवा इतर कोणत्याही वाचकाची आकलन क्षमता काय आहे याचे परीक्षकपद तुमच्या कडे नाही. वाचकांना काय आकलन होते किंवा होत नाही याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही जे काही लिहिता, त्याचे तुम्हाला स्वता:ला तरी आकलन होते का, हाच खरा प्रश्न आहे. त्यातून, तुम्ही सिद्ध, अध्यात्माच्या जगात वावरणारे. तुमच्या तोंडी "आकलन" वगैरे शब्द शोभत नाहीत. निरीक्षण, त्या निरीक्षणाचे तार्किक विश्लेषण, स्वता:च्या निष्करशांवर वर स्वता:च प्रश्न उपस्थित करणे, पुरावे शोधणे, समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास पुन्हा निरीक्षण, पुन्हा विश्लेषण, व या सगळ्या प्रक्रिये नंतर शेवटी आकलन. अशी ही साखळी असते.
पण तुमच्या जगात या साखळीतला प्रत्येक घटक निषिद्ध. ना निरीक्षण, ना तर्क, ना विश्लेषण. प्रश्न विचारणे तर महा-पातक. कारण प्रश्न विचारल्यास उत्तरच नाही हे उघड पडेल. म्हणून प्रश्न विचारायचेच नाहीत असा संकेत/ नियम आहे. थेट स्वयंसिद्ध निष्कर्ष. "ब्रम्ह" म्हणून काही तरी आहे. कशावरून आहे, काय पुरावा ? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण विचारल्यास "अहो पुरावा काय मागता ? ब्रम्ह आहेच" या पलीकडे उत्तर नाही. अध्यातमाच्या जगात निष्कर्ष औषधाच्या गोळी सारखे गप-गुमान गिळायचे असतात. तेव्हां, उगाच "आकलन" वगैरे शब्द – कुठे तरी वाचला म्हणून वापरला, असे करू नका.
दुसरा एक मुद्दा असा, की चर्चेत एकमेकांवर आकलनाक्षमता नसल्याचा आरोप केला, तर मुद्द्यांचे विश्लेषण होणारच नाही. मी पण असे म्हणू शकतो, की "ब्रम्ह" असे काहीही नाही, ब्रम्हा ही कल्पनाच शुद्ध थोतांड आहे, पण हे समजणे तुमच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. पण मी तसे म्हणणार नाही. कारण माझा प्रयत्न असतो की चर्चा मुद्द्यांवर केन्द्रित (फोकस्ड) असावी, चर्चकावर वर घसरू नये.
असो. आता तुम्ही लिहीलेल्या काही "विचारा" कडे वळू.
1: अध्यात्म वेळ, अंतर आणि स्थान या गोष्टींचा उहापोह करत नाही. बरोबर. अध्यात्म कशाचाच ऊहापोह करीत नाही. ऊहापोह केला तर जे हजारो वर्षे घोकत आलो ते खोटे ठरण्याची भीती असते. म्हणून ऊहापोह करायचाच नाही. प्रत्येक निष्कर्ष औषधाची गोळी गिळतो तसा गप-गुमान गिळायचा.
2: जाणणं ही एकमेव क्रिया वेळ, अंतर आणि स्थान यांचा आधार आहे. साफ चूक. जगात अश्या अनंत वस्तू आहेत, ज्या आहेत हे ही कोणाला माहीत सुद्धा नाही. जसे, लाखो लाइट-इयर दूर असलेला एकादा ग्रह, किंवा खोल समुद्रातला एक अजून पर्यन्त "अन-नोन" असा बॅक्टेरिया. पण तरी सुद्धा त्या वस्तूचे प्रत्येकाचे आपापले स्थान आहे, त्या व इतर सर्व वस्तु यांच्यात जे असेल ते अंतर आहे, वगैरे.
3: थोडक्यात, वेळ, अंतर आणि स्थान या गोष्टींचा आपल्यावर किंवा जाणण्यार्या घटकावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही आपल्या घरी आहात, का येरवडा जेल मध्ये आहात, याचा तुमच्या वर काहीही परिणाम होत नाही? खरोखर तसे असेल, तर मला तुमचा हेवा वाटतो. मी अजून तरी जेल मध्ये गेलेलो नाही, पण घरी सुद्धा बराच वेळ लाइट गेले, इनवरटरची बॅटरी संपली व पंखा बंद पडला तर मी कासावीस होतो.
4: जे इथे जाणलं जातंय तेच चंद्रावरही जाणलं जाईल; पुन्हा, साफ चूक. इथे माझे वजन 85 किलो आहे, चंद्रावर ते फक्त 14 किलो असेल. हे फक्त एक उदाहरण झाले.
तुमच भाषे वर प्रभुत्व चांगल आहे; जे मुळात नाहीच ते तुम्हाला स्पष्ट दिसत, व विचार तर इतके कमालीचे गूढ आहेत की तुम्ही ही सर्व साधन संपत्ति अध्यात्मा वर लिहिण्यात घालवण्या पेक्षा रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारप टाइप गूढ कथा / कादंबरी लिहिल्यात तर भरपूर नाव कमवाल.