माझा इंग्रजी सोपे / रुळलेले शब्द, त्यामानाने जुन्या झालेल्या मराठी शब्दांऐवजी वापरायला विरोध नाही (उदा. टेबल/मेज, पेन/लेखणी इ.) भाषा, संस्कृती अशा रीतीनं बदलत राहणारच.
जसा टेबल हा इंग्रजीतून उचललेला शब्द आहे, तसाच मेज हा पोर्तुगीजमधून उचललेला शब्द आहे. एक (बऱ्यापैकी रुळलेला परंतु इंग्रजीतून उचललेला) शब्द हटवून त्याजागी (पूर्वी कधीतरी रुळलेला परंतु पोर्तुगीजमधून उचललेला, आणि पोर्तुगीजमधून उचललेला आहे हे विस्मरणात गेलेला) शब्द नेमण्यात कितपत हशील आहे? (ब्रेडच्याऐवजी पाव म्हणा, अशा अट्टाहासासारखे होईल ते!)
वर आपण लिहिलेल्या लेखातले प्रतिशब्द विशेषत: तांंत्रिक विषयांतून आधी इंग्रजीत आल्यामुळे आपल्याला आधी कळले आहेत. जर अभियांत्रिकीचा अभ्यास/संशोधन जर मराठीतून झालं असतं तर मराठी शब्दही आपल्या ओठी रुळले असते, असं मला वाटतं. त्या ओघात कदाचित आणखी सोपे शब्द आलेही असते.
आत्याबाईला जर मिश्या असत्या, तर...
बरे, ते जाऊ द्या. शिवाजीमहाराजांच्या, झालेच तर ते कोणकोण सातवाहन, नि 'श्री चामुण्डराजे करवीयले'पासून ते 'हे शासन जो भंग करी तेहाची माय गाढवे *विजे'पर्यंत काय वाटेल ते शिलालेखांत कोरणारे आपले जे पूर्वीचे लोक होते, त्यांच्या काळांत, तुमचे ते इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग नि फायबर ऑप्टिक्स नि काय काय ते नसेलसुद्धा. परंतु, हे लोक किमानपक्षी नद्यांवर पूल बांधत नव्हते काय? घरे बांधत नव्हते काय? की उघड्यावरच राहात? काही सिव्हिल इंजिनियरिंग तर असेलच? त्याच्या काही ठराविक संज्ञा तर असतीलच? त्या तर मराठीतच असतील? इंग्रजीत निश्चितच नसतील? आणि, गॉड फॉरबिड, संस्कृतातसुद्धा नसतील?