भाषा ही प्रवाही असेल तर ती प्रगत होत जाते.
मराठी शब्दांचा अट्टहास करू नये हे बरोबर आहे, परंतु काही इंग्रजी शब्दांना सोपे आणि चांगले प्रतिशब्द मिळाले तर हरकत काय आहे?
अगदी 'अग्निरथ गमनागमन दर्शपट्टीका' वगैरे शब्द वापरायची गरज नाही परंतु फ्रीज ऐवजी शीतकपाट/शीतपेटी, बोर्ड ला फळा असे काही शब्द वापरण्यास प्रत्यवाय नसावा.
तांत्रिक माहिती बद्दल भाषेचा उगीच आग्रह धरणे योग्यं नाही, तसे केल्यास नित्यं नवीन ज्ञान आणि माहितीपासून वंचित राहण्याची भिती आहे.
--- पण इंग्रजी अथवा अन्य परकीय भाषेचा गैरवाजवी अनुनय देखिल ठीक नाही. बऱ्याचवेळा असे दिसते की मराठी लोकं आपसात इंग्रजीच बोलतात. त्याला काही कारणे आहेतच. माझ्या मुलाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि परदेशामध्ये झालेले आहे. ती सगळी मुले बहुतेक वेळा एकमेकांबरोबर इंग्रजीतच संभाषण करतात. शेवटी भाषेचा मुख्यं उपयोग संवाद साधणे हाच आहे आणि असायला हवा.
परंतु तरीही वाटते, मराठी माझी मातृभाषा आहे. ती चांगल्या आणि योग्य पद्धतीने आणि शक्य तितक्या शुद्धं स्वरूपात ऐकू आली अथवा वाचनात आली तर चांगले वाटते. भाषा संवर्धनासाठी तरी जाणीवपूर्वक मराठी लिहिणे, बोलणे आवश्यक आहे असे वाटते.