इथे वापरलेला फॉण्ट कोणता आहे?
हे कुणाही वाचकाला आपापल्या न्याहाळकातून वाचता येते. उदा. फायरफॉक्स मध्ये 'इन्स्पेक्ट' वर टिचकी मारून जे पर्याय दिसतात त्यात पानावर वापरलेल्या सर्व अक्षरवळणांबद्दल (फॉण्ट्स) माहिती मिळते. अडचण आल्यास पुन्हा विचारावे.
जोडाक्षरांच्या उभ्या मांडणीसाठी अक्षरवळणांमध्ये ती ती उभी जोडाक्षरे अक्षरवळणांच्या संकल्पकाने उपलब्ध केलेली असायला हवीत. आडव्या मांडणीसाठी लागणारी अर्ध्या व्यंजनांची अक्षरचित्रे उपलब्ध केलेली असतातच. वापरलेल्या अक्षरवळणांमध्ये जोडाक्षरांचे जे नियम अंतर्भूत केलेले असतील त्याप्रमाणे जोडाक्षरे (वेगळा प्रयत्न न करता) उमटतात. यात मुद्दाम बदल करायचा असेल तर जोडाक्षरे लिहिताना मध्ये जागा न व्यापता अक्षरे जोडणारी चिन्हे (झीरो विड्थ जॉइनर) वापरावी लागतात. मनोगतावर ही चिन्हे मध्ये सारण्यासाठी काही विशेष व्यवस्था केल्यास/केल्यावर आडव्या मांडणीतील जोडाक्षरेही लिहिता येतील. वेळेच्या उपलब्धतेनुसार ह्या बदलाचा विचार करावा लागेल.
दुसरा पर्याय असा की अक्षरवळणांमध्ये उभी जोडाक्षरचित्रे उमटण्यासाठी जे विशेष नियम असतील ते डावलून आडव्या मांडणीतली जोडाक्षरे उमटतील.
अन्न रत्न इ. उभ्या मांडणीत लिहिण्यासाठी जी उभी जोडाक्षरचित्रे लागतील ती मुद्दाम चित्रून अक्षरवळणामध्ये अंतर्भूत करावी लागतील.
प्रशासनाकडे ह्यापैकी कुठल्याही बाबतीत कामी येईल असे/इतके कौशल्य सध्या नाही. पुढे कदाचित जमेल.