आपण केलेली ही नवीन सोय फारच उत्तम आहे आणि अपेक्षेप्रमाणे चालत आहे. पण उद्गार हा शब्द उद्गार असा लिहिता आला नाही. शासनाच्या नियमानुसार खाली देलेले शब्द आडव्या मांडणीत लिहिले तरी चालतील.
उद्गार, उद्घाटन, उद्भव, अद्भुत, महद्भाग्य, श्रीमद्भगवद्गीता,
उद्गार, उद्घाटन, उद्भव, अद्भुत, महद्भाग्य, श्रीमद्भगवद्गीता
पण युनिकोडच्या नियमानुसार एकच शब्द असा दोन दोन प्रकारे लिहिता येत नाही. कारण तसे केले तर स्पेल चेक, सॉर्टींग, टेक्स्ट टू स्पीच अशा नवनवीन तंत्रज्ञानात अनपेक्षित अडचणी येतात. तर नियम असा आहे की "जेव्हा दोन विभिन्न पदांच्या संयोगातून 'द' चे जोडाक्षर तयार होते तेव्हा, ते 'द' चा पाय मोडूनही लिहिण्याचा विकल्प आहे.” या नियमाची अंमलबजावणी केली तर 'द’ वाले जवळपास सर्वच शब्द दोन प्रकारे लिहिता येतील. अगदी 'उद्धव' शब्द देखील 'उद्धव' असा लिहिता येईल कारण तो शब्द मुळात 'उत् + धव्' म्हणजे समृद्ध होत जाणारा (upwardly mobile) असा आहे.
युनिकोडवाल्यांनी दुसरी म्हणजे आडवी मांडणी स्वीकारावी असे माझे वैयक्तिक मत मी वर दिलेच आहे. पण मला उद्घाटन असे आडव्या मांडणीत इथे (मनोगतावर) लिहिता आले नाही.
गाठयुक्त श आणि दंडयुक्त ल यांची जशी नजरेला सवय झाली आहे तशी पायमोडक्या द ची देखील होईल. उभ्या मांडणीत 'उद्घाटन' मधील 'घ' हा 'उद्धव' मधील 'ध' सारखा दिसतो. लहान टाईप असेल तर ओ. सी. आर. सारखे सॉफ्टवेअर देखील त्यात गल्लत करू शकेल. जुने जाणते वाचक संदर्भाने समजतीलच पण नवीन वाचकांना अक्षर आणि संदर्भ दोन्ही अवघड वाटतील. भाषेत सुलभता आणण्यासाठी छप्पनचे "पन्नास सहा" असे रुपांतर करण्यास तयार होणारे सरकार अशा लहान गोष्टींमध्ये सुलभता का आणत नाही?