सर्वप्रथम, मा. ओक यांचे कौतुक!! मायमराठीसाठी आणि तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट आणि तुम्ही करत असलेले प्रयत्न अत्यंत अभिनंदनीय आहेत. 

परंतू, ह्याच अनुषंगाने मला खालीलप्रमाणे प्रतिसाद द्यावसा वाटतो.

भाषेत सुलभता आणण्यासाठी छप्पनचे "पन्नास सहा" असे रुपांतर करण्यास तयार होणारे सरकार अशा लहान गोष्टींमध्ये सुलभता का आणत नाही?

पन्नास सहा  हा "भाषा" कळायला सोपी जावी म्हणून सुचवलेला पर्याय होता. (तो कुचकामी ठरला /आणि तो ठरणारच होता.हा भाग अलाहिदा.) 

पण, तुम्ही जो सुचवता आहात, तो भाषेसाठी वाटत नसून एखाद्या सॉटवेअरला लिपी लिहिणे सोपे जावे म्हणून सुचवलेला पर्याय वाटतोय. तुमचा प्रयत्न आणि आग्रह अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाही. एखादी भाषा संगणकोपयोगी असणं आजच्या काळात किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही, हे मान्य. पण, मग, तुमच्या ह्या सूचनांनुसार मराठी लेखनातील जी सौंदर्यस्थाने आहेत ती वगळली जाण्याचा धोका नाही का?  म्हणजे, प्रश्न, पद्म, हृद्य आणि आणखी कित्येक शब्द वाचायला आणि अगदी पहायलाही सुंदर वाटतात. असूदे ना आणि  मध्ये वैविध्य. मोडू द्या ना क्त ला एखादा नियम. ही ह्या लिपीची वैशिष्ट्ये आहेत. आणि ती प्रत्येक लिपीत असतातच. ती तशीच जाऊदेत ना पुढं. सुलभतेच्या आग्रहापायी सौंदर्य नको हरवायला.  

हे बदलण्याऐवजी, सॉफ्टवेअरमध्येच बदल करता येणार नाहीत का? किंवा एखादं नवीन सॉफ्टवेअरच नाही का विकसित करता येणार? प्रशासकांनीच म्हटल्याप्रमाणे, अन्न, रत्न इत्यादि शब्द उभ्या मांडणीत लिहिण्यासाठी जी उभी जोडाक्षरचित्रे लागतील ती मुद्दाम चित्रून अक्षरवळणामध्ये अंतर्भूत करावी लागतील. हे करणं जर शक्य असेल तर मग एखादं नवं सॉफ्टवेअर तयार केलेलं बरं नाही का?

मी आपलं हे सरळ विचारतोय हं!! म्हणजे, असं सॉफ्टवेअर तयार करणं कितपत वेळखाऊ, खर्चिक, त्रासदायक आणि किचकट असू शकेल ह्याची कल्पना मला फारशी नाही.