एखादी गोष्ट सुंदर दिसते ती सवयीमुळे आणि आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे. उदाहरणार्थ गोरी मुलगी साधारणपणे सुंदर मानली जाते. पण वास्तविक सावळ्या आणि अगदी आफ्रिकन काळ्या मुली देखील सुंदर असू शकतात, तशा त्या असतात देखील. प्रश्न मधील श अधिक सुंदर दिसत असेल तर इश्क या शब्दात तसा श काढण्याची सूट का नाही? श्न, श्व, श्ल श्च ही जोडाक्षरे जर सुंदर दिसत असतील तर श्क श्य ही जोडाक्षरे तशा पद्धतीने कोणत्याच इनपुट मेथडमध्ये (टंकात) का काढता येत नाहीत. परंपरेने फक्त न, व, ल आणि च या चारच अक्षरांना डोक्यावरून पदर घ्यायला लावला आहे ते फक्त कागद वाचविण्याच्या उद्देशाने, त्यामागे काहीही सौंदर्यदृष्टी नव्हती. या चार अक्षरांची वारंवारता लक्षात घेऊन ही विशेष सोय केली गेली होती. तशीच ती क्ष आणि ज्ञ साठी देखील केली गेली. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही दोन जोडाक्षरे अशीच लिहावी लागतात. त्यासाठी दुसरी कोणतीच सोय नाही. शासनाने देखील "विशेष संयुक्त जोडाक्षरे" असे नाव देऊन त्यांना जवळपास मुळाक्षरांचा दर्जा दिला पण तशी काही सोय श्न, श्व ची केली नाही. त्यामुळे काही टंकांनी श्‍न, श्‍व असे आडवे रूप स्वीकारले. माझा विरोध उभ्या मांडणीतील जोडाक्षरांना नसून ती उभ्या किंवा आडव्या - कशाही पद्धतीने लिहिली तरी चालतील अशी सूट देण्याला आहे. वाहने "शक्यतो” डाव्या बाजूने चालवा, विकल्पाने उजव्या बाजूने चालवली तरी चालतील अशी नियमांची भाषा असू नये. 

>> प्रशासकांनीच म्हटल्याप्रमाणे, अन्न, रत्न इत्यादि शब्द उभ्या मांडणीत लिहिण्यासाठी जी उभी जोडाक्षरचित्रे लागतील ती मुद्दाम चित्रून अक्षरवळणामध्ये अंतर्भूत करावी लागतील. हे करणं जर शक्य असेल…

ह्यातील मुख्य मुद्दा आपण लक्षातच घेतलेला दिसत नाही. ज्यांनी तो टंक बनविला त्यांनी अशी इतर कित्येक जोडाक्षरे चित्रून अक्षरवळणांमध्ये समाविष्ट केली आहेतच ना? अन्न मधील न्न आणि रत्न मधील त्न ते विसरून गेले असतील असे आपल्याला वाटते का? माझ्या मते तसे नक्कीच नसून सुलभीकरणासाठी जाणून बुजून काही जोडाक्षरे वगळली गेली असणार. प्रत्येक टंककर्त्याने आपापल्या मतानुसार लिपीचे सुलभीकरण न करता या विषयातील तज्ज्ञांनी याची गरज आहे हे मान्य करून तोडगा काढावा.