हिन्दू हा शब्द "सिन्धू" शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे

अरबी नव्हे, फारसी. फारसी ही इंडो-इराणी उर्फ आर्य भाषागणातील भाषा असून, संस्कृतशी तिचे बऱ्यापैकी जवळचे (बहुधा भगिनीचे, किंवा फार फार तर मावशी-भाचीचे) नाते आहे. ("ते लोक" पुढे आक्रमकांच्या प्रभावाखाली मुसलमान झाले, म्हणून काय झाले? आपल्याच भावकीतल्या टोळ्यांमधले लोक आहेत ते. (किंबहुना, आपल्याहून कैक पटींनी जास्त आर्य असावेत ते.)) आणि, संस्कृतातील 'स'चा फारसीत 'ह' होतो, याची कितीतरी उदाहरणे आहेत. वर महेश यांनी त्यांपैकी काही नमूद केलेली आहेतच; त्याव्यतिरिक्त, 'सहस्र'चे 'हज़ार' होणे हेदेखील आणखी एक ठळक उदाहरण आहे.

बाकी,

"हिन्दू" हा शब्द "हीनं दुष्यति इति हिन्दू:। म्हणजे "जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हणतात.

मला हे क्लासिक रेट्रोफिट व्युत्पत्तीचे किंवा बॅक्रोनिमचे उदाहरण वाटते. किंबहुना 'ग्वाटेमाला म्हणजे गौतमालय' किंवा 'झांझीबार म्हणजे हिंदू-बाजार' अशा ज्या काही क्लासिक ढुसकुल्या स्वतः सावरकरांनी (संदर्भ: 'जात्युच्छेदक निबंध', प्रकरण १, उपप्रकरण १.६ ('परधार्जिणे विटाळवेड'), पहिलेच वाक्य. गरजूंनी स्वतः तपासून पाहावे.) सोडून ठेवलेल्या आहेत, त्या तोडीची ही ढुसकुली आहे!(टीप: या ढुसकुल्या आहेत, हे न समजण्याइतके सावरकर मूर्ख होते, असा आमचा दावा अर्थातच नाही. किंबहुना, ही सावरकरांच्या अत्युच्च विनोदबुद्धीची साक्ष आहे, असे आमचे मत आहे. आमच्या अदमासाप्रमाणे, आपले बिनडोक भक्तगण आपल्या कोणत्या थरापर्यंतच्या ढुसकुल्या कोणताही प्रश्न न उगारता ('विदाउट रेझिंग अ क्वेश्चन') खपवून घेऊ शकतात (नाही म्हटले, तरी 'बाबा वाक्यं प्रमाणम्' ही आपली संस्कृती आहेच; नि 'बाबा' हा शब्द फारसीमूलक असल्याने त्याचे उच्चाटन होऊन त्याची जागा 'तात्या'('तात'चे अपभ्रष्ट रूप)ने घ्यावी, हे उचितच आहे.), हे अजमावून पाहण्यासाठी सावरकरांनी ही ढुसकुली जाणूनबुजून, अत्यंत गंभीर चेहरा ठेवून परंतु गालात जीभ पद्धतीने, सोडून दिली असावी, नि आपला प्रयोग सफल झाल्याचे पाहून पेढीपर्यंत पूर्ण वाटभर खदाखदा हसत गेले असावेत('वेंट लाफिंग ऑल द वे टू द बँक'). थोडक्यात, सावरकरांनी येथे वाचकांची मस्तपैकी फिरकी घेतलेली आहे, असे आम्हांस वाटते; चूभूद्याघ्या.)


शिवाय, "हीनं दुष्यति"चा संक्षेप होऊन "हिन्दू" बनताना, (१) "हि" दीर्घाचा ऱ्हस्व नक्की कोणत्या नियमाने बनावा, तथा (२) "न्" हलन्त नक्की कोणत्या नियमाने बनावा, असे (गैरसोयीचे) प्रश्न पडू लागतात. तसेच, "हिन्दूः" हे योग्य नाही, (बहुधा) "हिन्दुः" पाहिजे (चूभूद्याघ्या), हीदेखील एक क्षुल्लक अडचण आहेच.

असो चालायचेच.