अरुण फडके यांच्या मते "मंत्रिमंडल" या शब्दात त्रि ऱ्हस्व आहे पण "मंत्रीमंडळ" या शब्दातील त्री दीर्घ आहे. याचे कारण म्हणजे "मंडल” संस्कृत आहे तर "मंडळ” हा मराठी शब्द आहे. त्यांचा या विषयातील अधिकार खूप मोठा आहे म्हणजे ही मांडणी बरोबरच असणार. पण शुद्धलेखनाच्या नियमाचा विचार करता हा निर्णय चूक ठरण्याची शक्यता आहे. तर नियम आहे असा...

नियम ५.५

सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे.

उदाहरणार्थ : बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.

साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.

उदाहरणार्थ : बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

यात समासाचे उत्तरपद (दुसरा शब्द) देखील संस्कृतमधून आलेला असेल तरच हा नियम लागू होईल असे कुठेही म्हटलेले नाही. उलट साधित शब्दांनाही हाच नियम लावावा असे स्पष्ट केलेले आहे. अरुण फडके यांच्या "शुद्धलेखन ठेवा खिशात" या मोबाईल ॲपमध्ये या विषयाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. ते असे...

मंत्रीमंडळ, विधीमंडळ (योग्य)
मंत्रिमंडळ, विधिमंडळ (चूक)

मंत्रिन् असा इनन्त संस्कृत शब्द आहे. संस्कृत इनन्त शब्द मराठीत वापरण्याच्या नियमानुसार ह्यातल्या अंत्य 'न’चा लोप करून "मंत्री" असा मराठी शब्द वापरला जातो. "विधि" असा ऱ्हस्वान्त संस्कृत शब्द आहे. अव्यये सोडून सारे ऱ्हस्वान्त संस्कृत शब्द नियमानुसार मराठीत दीर्घान्त लिहिले जातात. ह्या नियमानुसार विधी हा मराठी शब्द होतो. मंडल असा संस्कृत शब्द आहे. ह्यातल्या अंत्य 'ल’ चा 'ळ’ करून मंडळ हा तद्भव मराठी शब्द होतो. अशा रितीने मंत्री, विधी, मंडळ हे सारे शब्द मराठी होतात. त्यामुळे मंत्री + मंडळ, विधी + मंडळ असे मराठी समास तयार होतात. असे सामासिक शब्द जसेच्या तसे लिहिले जातात. त्यामुळे मंत्रीमंडळ, विधीमंडळ असेच लेखन मराठीत योग्य ठरते.

जर वर दिलेले स्पष्टीकरण बरोबर असेल तर त्याचा अर्थ नियम ५.५ संदिग्ध ठरतो. त्याचा विस्तार करून उत्तरपदाची व्यवस्था स्पष्ट करणे गरजेचे आहे.