१. आपण निर्वस्तू, निर्जोर आणि निर्भार आहोत हे उमगण्यासाठी अथवा ह्याचा उलगडा होण्यासाठी आपण तसे नसणे आवश्यक आहे ना?
आपण निर्भार आणि निर्जोरच आहोत पण आपण तसे नाही हा आपल्याला झालेला भ्रम आहे. आता या क्षणी तुम्हाला तुम्ही बसून वाचता आहात असाच भास होतोय. आपण निर्भार आणि निर्जोर जाणण्याची क्षमता आहोत आणि मेंदूत झालेला वाक्य आणि अर्थाचा उलगडा आपल्याला होतोय अशी प्रचिती नाही. ती जर झाली तर स्वरूपाचा उलगडा होईल.
२. ह्या विधानात "तुम्हाला" म्हणजे नेमकं कुणाला? आणि मग ते जे कुणी अथवा जे काही असेल त्याला "निर्भार" किंवा "निर्जोर" असल्याचा कसा उलगडा होईल?
तुम्हाला म्हणजे तुम्ही जी निर्भार आणि निर्जोर जाणण्याची क्षमता आहे तिला. आपल्याला असा भास होतो की डोळ्यांना दिसतंय, पण डोळ्यांद्वारे आपण जाणण्याची क्षमता स्क्रीनकडे वळवतो आणि त्यामुळे आपल्याला दिसतं. जसा की देह चालतो आणि आपल्याला फक्त कळतं, आपण क्रियाशून्य आहोत पण आपल्याला आपणच चालतोय असा भास होतो, अगदी तसंच.