श आणि ल च्या लेखन विषयक बातमी लोकसत्ताच्या (१५ नोव्हेंबर) पहिल्या पानावर आली यावरून शासन आणि मिडीया या दोघांच्याही दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असावा असे वाटते. तर बातमीचे शीर्षक आहेः 'ल', 'श' च्या नियमामुळे गोंधळ; शिक्षण क्षेत्रातून सूर, निर्णयाच्या लाभावर प्रश्नचिन्ह
बातमीचा सारांश पुढे देत आहे. पूर्ण बातमी या पानावर वाचता येईल.
मराठी देवनागरी लिपीत पाकळीयुक्त 'ल' आणि देठयुक्त 'श' लिहिण्याचा नियम अडचणीचा ठरणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्षांनुवर्षांची सवय मोडणे कठीण असून, या निर्णयाने हित साधले जाण्यापेक्षा गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डॉ. वसंत काळपांडे - "भाषेशी संबंधित नियम हे वापरसुलभ असायला पाहिजेत. स्वतःला भाषातज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या मंडळींची मराठी बोलणाऱ्यांशी नाळ तुटली आहे. भाषेतील बदलांची दिशा तरुण पिढी ठरवत असते, भाषातज्ज्ञ नव्हे. त्यामुळे हा शासन निर्णय मराठी भाषेच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे. या निर्णयाने फायदा होण्यापेक्षा गोंधळच निर्माण होऊ शकतो"
धनवंती हर्डीकर - "आता मात्र ताबडतोब बदल करण्याचे फर्मान आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना किती त्रास होईल, किती वेळ वाया जाईल आणि मुख्य म्हणजे हे सगळे करून काय फायदा होईल, याचा विचार केलेला नाही. गेल्या शतकातील मराठीच्या अभ्यासकांनी लोकांविषयीच्या तळमळीने आणि विचारपूर्वक बदल सुचवले, ते केंद्र स्तरावर मान्यही झाले, ते रद्द करणाऱ्या लोकांनी त्यासाठी आधी योग्य कारणे कोणती, यांची जाहीर चर्चा करायला हवी होती."
मराठीचे शिक्षक - "नव्या शासन निर्णयातील बदल अंगवळणी पडण्यास शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही काही काळ अडचणी येतील."
यास्मिन शेख - 'श' देठयुक्त आहे की गाठयुक्त, 'ल' पाकळीयुक्त आहे की दंडयुक्त याने काही बिघडत नाही. दोन्हीचा वापर योग्यच आहे.
_____
हातात काठी घेऊन उभा असलेला लंगडा 'ल' आणि टक्कल पडलेला 'श' ज्यांना बघवत नसेल त्यांनी फाँट बदलून पहायला हरकत नाही. पण त्यात अडचण ही आहे की शासनाला हवा असलेला ल आणि श फारच थोड्या फाँटमध्ये दिसून येतो. मी गूगल फाँटमध्ये पाहिले तर फक्त "टिरो देवनागरी मराठी" हा एकच फाँट या नियमात बसू शकतो. त्या व्यतिरिक्त शोभिका, यशोवेणू असे काही दोन – तीन चांगले पर्याय मला माहीत आहेत. पण डी. टी. पी. वगैरे कामांसाठी जसे फाँट लागतात तसे आणि तितके उपलब्ध नाहीत हे नक्की. हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात काही अर्थ नाही. मराठीतील 'श’ आणि 'ल’ साठी भविष्यात नवीन युनिकोड संकेतांक आणले गेले तर असलेल्या गोंधळात अधिक भर पडेल. स्पेल चेक, मशीन लर्निंग, टेक्स्ट टू स्पीच वगैरे तंत्रज्ञान मराठीत नीट चालणार नाही आणि मराठीचेच नुकसान होईल. याचे कारण गूगल, फेसबुकसारख्या कंपन्या मराठीची वर्गवारी "देवनागरी” या गटात करतात. त्या गटातून बाहेर काढले गेले तर नवीन गुंतवणूक करायला कोणीही तयार होणार नाही. स्वप्नाळू ध्येयवाद आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती या दोन्हीतील फरक जाणून घेतला पाहिजे असे मला वाटते.