इंग्रजी, उर्दू भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांच्या बाबतीत जो नियम आहे तो पाळू नका असे अरुण फडके यांनी आपल्या कार्यशाळेत सांगितले आहे.
(यूट्यूब चॅनलः शुद्धलेखनाचे इतर नियम- भाग ८)
कोणी विचारले तर माझे नाव सांगा असे त्यांनी वरील व्हिडिओत म्हटले आहे. मला त्यांचे हे विचार बहुतांश पटले आहेत. म्हणून या वादग्रस्त नियमात थोडा बदल करून "त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे" याऐवजी "मराठीच्या नियमांप्रमाणे" असा बदल करावा असे मला वाटते. थोडक्यात इंग्रजी, उर्दू शब्दांना संस्कृतसारखा तत्सम शब्दांचा दर्जा देऊ नये. तर नियम १४ उपनियम २ असा आहेः
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.उदाहरणार्थ: ब्रिटिश,हाउस
हेच शब्द जर मराठी असते तर आपण ते ब्रिटीश, हाऊस असे लिहिले असते. कारण नियम ७ उपनियम १ असा आहेः
मराठी अ‑कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब, विहीर ऊस, चिरूट,तूप, मूल
खाली दिलेले उर्दूमधून आलेले शब्द नियमाप्रमाणे जसेच्या तसे लिहिले तर असे लिहावे लागतील...
कारकीर्द
शागीर्द
ऊर्फ
सुपूर्द
पण फडके साहेब म्हणतात की जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार पहिला असतो या नियमाला अनुसरून हे शब्द असे लिहावे.
कारकिर्द
शागिर्द
उर्फ
सुपुर्द
(पाहा यूट्यूब चॅनल शुद्धलेखनाचे नियम - ऱ्हस्व आणि दीर्घ ह्यांचे नियम -भाग १२)
अरुण फडके म्हणतात त्यानुसार हा नियम सुधारावा किंवा अधिक स्पष्टता द्यावी. उदाहरणार्थ त्या शब्दांची सामान्यरूपे कशी करायची?
शागिर्दांच्या कारकिर्दीचा अभ्यास
शागीर्दांच्या कारकीर्दीचा अभ्यास
बहुतेक लोक पहिला पर्याय बरोबर आहे असे म्हणतील. पहिला पर्याय मराठी (मूल- मुलांचा) अशा प्रकारचा तर दुसरा पर्याय संस्कृतसारखा (दूत -दूतांना) असा आहे. मूळ शब्द संस्कृतसारखा तत्सम ठेवून त्याचे सामान्यरूप मात्र मराठीसारखे करावे असे तर कोणी म्हणणार नाही. तसे असेल तर फाईल, टाईम, लाईन हे शब्द फाइल, टाइम, लाइन असे मूळ इंग्रजी उच्चारासारखे लिहावे लागतील. त्यांचे सामान्यरूप फाइलचा, टाइमचा आणि लाइनवर असे होईल. फायलीचा, टायमाची आणि लायनीवर असे शब्द वापरता येणार नाहीत. कारण नियम ८.३ हा परत मराठी शब्दांसाठी आहे असे वाटते. तो नियम असाः
८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ असेल, तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ‘ई’ च्या जागी ‘य’, आणि ‘ऊ’च्या जागी ‘व’ असे आदेश होतात.
उदाहरणार्थ: काईल - कायलीला, कायलींना देऊळ – देवळाला, देवळांना.
वर दिलेल्या चार / सहा शब्दांपुरता हा गोंधळ मर्यादित नाही. तर इतर भाषेतून, त्यातही विशेषकरून इंग्रजीतून आलेल्या हजारो शब्दांचा हा प्रश्न आहे. नियमात संदिग्धता ठेवून शासनाने तर या विषयावर तोंड गप्प ठेवून अभ्यासकांनी आपले अंग काढून घेतले असले तरी त्यामुळे भाषेचे नुकसान होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.