ते संस्कृतमधून आलेले शब्द आहेत त्यामुळे त्यांना मराठीचे नियम लागू होत नाहीत. उदा. सूर्याचे, चूर्णाचे, दीर्घाचे, वीर्याचे. आपण सुर्याचे, चुर्णाचे, दिर्घाचे, विर्याचे असे चुकीचे शब्द फार क्वचित लिहिले/ वाचले असतील. गूगलमध्ये देखील "सूर्याचे” या योग्य रूपाला १ लाख तर "सुर्याचे” या चुकीच्या शब्दाला फक्त दोन हजार पाने दिसतात यावरून हा नियम मराठीत बऱ्यापैकी स्थिरावला आहे हे स्पष्ट होते.

आता आपण गूगलमध्ये हे दोन शब्द टाकून पाहू.

"कारकिर्दीचे"

"कारकीर्दीचे" 

दोन्ही शब्दांना सुमारे २०,००० पाने मिळाली. म्हणजे मराठी लिखाणात हे दोन्ही शब्द प्रचलित आहेत असे दिसते. "कारकीर्द” हा शब्द संस्कृत सारखा तत्सम मानायचा की त्याला तद्भव करून "कारकिर्द” हे मराठी रूप स्वीकारायचे हा कळीचा प्रश्न आहे. गूगल हे काही उत्तर होऊ शकत नाही. पण यातील तज्ज्ञ खूप भाव खातात त्यामुळे मी त्यांना विचारणे सोडून दिले आहे. सध्या मी फडके संप्रदायात सामील होऊन त्यांच्या पुस्तकातून / यूट्यूब व्हिडिओमधून जे मिळेल ते प्रमाण मानत आहे. अर्थात काही विषयातील त्यांची टोकाची मते मला मान्य नाहीत आणि मी तसे वर एका प्रतिसादात लिहिलेच आहे.

"फाइल" हा मूळ इंग्रजी तत्सम शब्द. “फाईल” हा तद्भव शब्द. त्याला नियम ८.३ लावून "फायलींचा" हा शब्द चोख बनतो. गूगलमध्ये त्याला लाखाच्या आसपास पाने मिळतात तर "फाइलींचा" किंवा "फाईलींचा" या शब्दांना हजार पाने देखील नाहीत. इंग्रजीची रोमन लिपी किंवा उर्दूची लिपी आपण मराठीत वापरत नाही. ते शब्द देवनागरीत आणताना "जसेच्या तसे" म्हणजे "तत्सम" आणणे शक्य नाही. हे शब्द तद्भव मानून त्यांना मराठीच्या नियमाप्रमाणे चालवणे योग्य असे मला वाटते.
_____

अरूण फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या "शुद्धलेखन ठेवा खिशात" या ॲपमध्ये याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

बरोबरः उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द

चूकः ऊर्फ, कारकीर्द,शागीर्द, सुपूर्द

उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुत्र हे मराठीतले तद्भव शब्द आहेत. त्यामुळे ह्यांमधले इकार-उकार मराठीच्या ऱ्हस्व-दीर्घ नियमांनुसार लिहिले जातील. परंतु ह्या चारही शब्दांमध्ये रफारयुक्त अ-कारान्त जोडाक्षर आहे. त्यामुळे ह्या शब्दांना दोन नियम लागू होतात.

१) अ-कारान्तापूर्वीचा इकार उकार दीर्घ असतो.

२) जोडाक्षरापूर्वीचा इकार-उकार ऱ्हस्व असतो.

हे दोन नियम परस्परविरुद्ध इकार-उकार दाखवतात. त्यामुळे आता अ-कारान्त जोडाक्षर असलेले इतर मराठी शब्द ह्या दोन नियमांपैकी कोणत्या नियमाने चालतात हे पहावे लागेल. ते शब्द असे - कुट्ट, खिन्न, खुट्ट, गुच्छ, ठुस्स, डिम्म ढिम्म, डु ढुस्स, फुस्स, भिल्ल, भिस्त, मिट्ट, शिस्त, सुस्त, हुश्श हे सारे शब्द जोडाक्षरापूर्वीचा एकार इकार - उकार ऱ्हस्व असतो ह्या नियमाने चालताना दिसतात. त्यामुळे ह्याच नियमानुसार उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द असेच लेखन बरोबर ठरते.

व्याकरणतज्ज्ञ झाले नसते तर ते एक चांगले वकील झाले असते इतका त्यांचा युक्तिवाद बिनतोड असतो.