काही भाषांना स्वत:ची निगडीत लिपी असते (उदा. मल्याळम/कन्नडा/तेलगू - या भाषाही आहेत, आणि त्यांच्या आपापल्या लिपीचीही नावे तीच आहेत.)
अपवादात्मक काही भाषांना - त्या निव्वळ बोली नसूनही - स्वत:ची अशी लिपी नसते. (उदा. संस्कृतला स्वत:ची मुळची लिपी नाही. ती ब्राह्मी, देवनागरी, ग्रंथी, कन्नडा - सगळ्या लिप्यांमध्ये लिहिली गेली आहे. देवनागरी ही संस्कृतची मूळ लिपी ही लोकप्रिय पण अनैतिहासिक गैरसमजूत आहे.)
काही भाषांना एकापेक्षा अधिक लिप्यांमध्ये लिहिता येत असले, तरी बहुधा स्वनिगडीत native अशी एकच लिपी असते. उदाहरणार्थ, मराठीला मोडीतून जरी लिहिता येत असले, तरी बाळबोध देवनागरी ही तिची स्वलिपी मानतात. - अगदी जेव्हा मोडीचाच वापर अधिक होता तेव्हाही. (पाहा - दासबोध)
रोमनमधून मल्याळम लिहिता आली, तरी त्याला "transliteration" - "लिप्यंतर" असे सकारण म्हटले जाते. लिप्यंतर करताना उच्चारांशी तडजोड करावी लागते आणि ते स्वाभाविक आहे.
भाषा आणि लिपी या बहुतकरून सोबत जातात. कुठल्याही भाषेसाठी कुठलीही लिपी वापरता येते हा समज अगदी अज्ञानी नसला तरी अपुऱ्या ज्ञानावर आधारित आहे. चिनी हान लिपीतून मराठी लिहिणे किंवा अरबी लिपीमधून कोरियन लिहिणे - भलेही ती व्यक्क्तिनामे असली तरीही - केवळ अवघड नव्हे, तर कधी कधी अशक्यप्राय असते.
"पडवळ" हे आडनाव असणाऱ्याने नाइलाज म्हणून ते रोमनमध्ये Padwal लिहिलेले असते आणि त्याचा पदवल, पादवल, पादवाल, पडवाल, पाडवल वगैरे वगैरे उच्चार तो चालवून घेत असतो. लिप्यंतर हा नैसर्गिक भाषाव्यवहाराचा भाग नाही. (त्यामुळेच अगदी व्यक्तिनावेही भाषांनुसार बदलतात. उदा. Maria, Marie, Mary ही सर्व नावे मुळात एकच. केवळ भाषा बदलल्याने त्यांचे उच्चार व वर्णलेखन बदलतात! त्यामुळे जाणकार लोक, उदाहरणादाखल, "मेरी - फ़्रेंच की इंग्लिश" असे विचारून स्पेलिंग लिहितात.)
देवनागरी ही भारतातल्या काही भाषांची native - स्वनिगडीत - लिपी आहे, पण भाषांनी तिच्यात हवे तसे बदल करून घेतले आहेत. हिंदीची देवनागरी व मराठीची देवनागरी यांतील साम्य हे प्रचंड असले तरी त्या एकरूप नाहीत. जर त्या समसमान असत्या तर समान अक्षरांच्या व चिन्हांच्या उच्चारांत फरक पडला नसता. उदा. - "काळे" हे आडनाव हिंदीच्या देवनागरीत लिहिता येत नाही. किंवा "गौरी", "वैभव" ही मराठी नावे हिंदी देवनागरीत लिहिता येत नाहीत. (तशीच्या तशी लिहिली तर उच्चार वेगळे होतात! - ते मराठी देवनागरीतील "गॉरी" व "वॅभव"च्या जवळ जातात.) तसेच हिंदीतील "ग़ज़ल" हा शब्द मराठी देवनागरीत लिहिता येत नाही. हे असे सर्व शब्द हिंदीतून मराठीत किंवा मराठीतून हिंदीत जाताना transliterate होतात! - जर दोन्हींची लिपी समान असती तर असे लिप्यंतर करावे लागले नसते.
त्यामुळे मराठीची देवनागरी लिपी ही मराठी लिपी आहे. (ब्राह्मीमधून निघून मलयाळमसाठी वापरलेल्या लिपीचे नाव मलयाळम आहे, आणि त्याच ब्राह्मीतून उद्भवलेल्या पण तेलगू भाषेसाठी वापरलेल्या लिपीचे नाव तेलगू आहे.), म्हणून आपण इथे लिहीत आहोत ते मराठी भाषेतून आणि मराठी देवनागरीतून - मराठी लिपीतून लिहीत आहोत!
वरील सर्व मजकुराचा मथितार्थ इतकाच की भाषेशी लिपी निगडीत असते, आणि व्यक्तिनामे transliterate केली जातात ती व्यवहारासाठी तशी करावी लागतात म्हणून, सहज व सुकरपणे होतात म्हणून नव्हे!
ही झाली थियरी! पण मुळात मराठी अस्मितांधांना मराठीतून सहीचा आग्रह धरावासा का वाटतो यामागे काही प्रासंगिक आणि व्यवहारातील संदर्भ आहेत:
- वर संग्राहकांनी एक संदर्भ दिला आहेच. त्यातील लेखकाला अगदी पुण्यातील नामांकित शाळेतही केवळ सही देवनागरीत आहे म्हणून - गैरसमजुतीतून, पण लोकप्रिय गैरसमजुतीतून - अडवणूक सहन करावी लागली!
- अविनाश धर्माधिकारींनीही त्यांच्या आत्मकथनात दिल्लीत आयएएससाठी निवड झाल्यानंतरही तिथे प्रशिक्षणकेंद्रात त्यांची सही केवळ रोमनमध्ये नाही म्हणून ती कशी नाकारली गेली व नंतर त्यांना उच्च पातळीपर्यंत लढून मगच सही देवनागरीत कशी राखता आली याचे वर्णत केले आहे.
- आजही, कोणत्याही सरकारी अगर खाज़गी बॅंकेत नवीन बचत खाते उघडण्याचा अर्ज भरताना अर्जदाराची सही जर रोमनव्यतिरिक्त अन्य लिपीत असेल तर सोबत एक निराळे घोषणापत्र द्यावे लागते. त्याला निराळे साक्षीदार लागतात.
- इतकेच काय, अनेक बॅंकांमध्ये अजूनही चेकवर रोमनमध्ये सही नसेल तर तसा चेक नाकारला जातो (सही खात्यातील नोंदीशी जुळते की नाही हेही न तपासता!) आणि हा असा पूर्वग्रह व दुराग्रह इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बॅंक शाखांमध्ये अधिक दिसून येतो. - तीस-चाळीस वर्षांपूर्वी तर असे धनादेश महाराष्ट्रात अगदी नजरचुकीनेच (किंवा खातेधारक कुणी प्रसिद्ध व्यक्ती असल्यानेच) वटत असत. ते विनातक्रार वटावेत यासाठी मराठी अस्मितांधांना सरकारदरबारी आणि आरबीआयपर्यंत हट्टाने पाठपुरावा करावा लागला आणि (मुळातच भेदभावात्मक असलेल्या परंतु नाइलाजाने देशी भाषांसाठी काही थोड्याशा समानतेची सवलत देणाऱ्या) तरतुदींची अंमलबजावणी करून घ्यावी लागली.
मुळात देवनागरी लिपीला अशी दुय्यम वागणूक द्यावी हे या व्यवस्थेला का वाटते? तर लोकांची मानसिकता तशी घडवली गेली आहे म्हणून.
आजही बहुतांश सुशिक्षित लोक जेव्हा स्वत:ची म्हणून सही करतात तेव्हा त्यांना ती रोमन लिपीत करावी असे का वाटते? तुम्ही कॉलेजात गेल्यावर आपली सही सी एम पी ए एन डी आय टी अशी अक्षरे वापरून रोमनमध्येच का करू लागलात? चे. म. पंडित अशी आपापल्या भाषेच्या लिपीत ती करावी असे आपल्याला थोडेही का वाटले नाही? आणि वाटले तर ती तशी का केली नाहीत? - कदाचित आपली काही व्यक्तिगत कारणे असतीलही, पण बहुतांश लोक जराही विचार न करता रोमन अक्षरेच का निवडतात? ती जर प्रथा असेल तर ती तशीच का पडली? आणि पूर्वी कधी असेल, तर ती तशीच पाळत राहिल्याने ही रोमनधार्जिणी व्यवस्था अधिक मातली नाही का?
या प्रथांना आव्हान देणे हे प्रतीकात्मक आहे. आणि इथे तरी ही प्रतीकात्मकता निरर्थक नाही. व्यवस्थेला जागे करून थोडेसे तरी बदलायला भाग पाडण्याइतकी ताकद या प्रतीकात्मकतेत आहे.
उलट अमुक अशी केवळ प्रथा आहे म्हणून निर्विचारी अंधतेने त्या चाकोरीतच राहाणे हाच कदाचित मूर्खपणा आहे. पहिली सही करायला शिकताना केवळ रिवाज़ आहे म्हणून ती रोमन लिपीतूनच करावीशी वाटणे (किंवा इथे काही निवड करण्यासारखा प्रसंग आहे हेच न उमजणे) हे शहाणपणा जागा नसल्याचे लक्षण आहे.
सही रोमनमधून करावी की देवनागरीत हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. तसा तो "निवडीचा" प्रश्न समजून जाणीवपूर्वक रोमनमधून सही करणाऱ्यांना मूर्ख म्हणण्याचे कारण नाही, तसेच ज्यांची मूळ भाषा मराठीच आहे, त्यांनी मुद्दाम किंवा अगदी सहजपणेही देवनागरीतून सही करणेही मूर्खपणाचे मानायचे कारण नाही. पण व्यक्तिगत निवडीच्या सर्व प्रश्नांत - जसे वेश, आहार वगैरे - निवडीचा हक्क मान्य करूनही आपापल्या प्राधान्यांचा किंवा आवडींचा आग्रही प्रचार व प्रसार करणे, विशेषत: लेखन व भाषणस्वातंत्र्याचा अहिंसक वापर करून, हे अगदी वैध व स्वीकारार्ह असले पाहिजे. तसा करणाऱ्यांचा उपहास केल्याने आपली उंची न दिसता खुजेपणा ठळक होतो!
सर्व प्रतीके ही निरर्थक नसतात. मिठागरातील मुठभर मीठ उचलणाऱ्या महात्म्याला आणि श्रद्धेने व उत्कंटेने त्या क्षणाची वाट पाहाणाऱ्या गुलाम राष्ट्राला काय त्या कृतीची प्रतीकात्मकता समज़त नव्हती? पण जगभर पसरलेल्या अजेय साम्राज्याचा पाया खचण्याइतकी सार्थता त्या कृतीत भरली होती. असो.
वर दिलेल्या उदाहरणांनी हे स्पष्ट व्हावे की देवनागरीला रोमनपेक्षा उच्च दर्जा मिळावा यासाठी नव्हे, तर केवळ समान दर्जा मिळावा यासाठी हा हट्ट करावा लागतो आहे!
केवळ बरेच लोक देवनागरीत सही करू लागल्याने मराठी भाषेला सोन्याचे दिवस येणार नाहीतच. केवळ देवनागरीत पाट्या असल्याने लोकांना स्वभाषेचे शुद्धलेखन येणार आहे असेही नव्हे. (प्रमाणभाषा आणि तिची शुद्धता हा गुंतागुंतीचा विषय आहे.) पण कुणीतरी जर हा "मराठीतून सही"चा आणि "मराठीतून पाट्यां"चा हट्ट धरलाच नसता, तर आजही बॅंका चेकवर केवळ देवनागरी सही आहे म्हणून चेक नाकारत राहिल्या असत्या, आणि डॉमिनोज़मध्ये केवळ मराठीतून ऑर्डर घेतली जात नाही म्हणून सामान्य लोकांमध्ये त्या उपाहारगृहांत जाण्याविषयी गंड निर्माण झाला असता.
अशा प्रतीकात्मक पावलांनी भाषेच्या सद्यस्थितीत - म्हणजे दुर्गतीत - काही तसुभर तरी सुधारणा होणार आहे की त्यामुळे काही महागडा तोटा होणार आहे? जर याचे उत्तर थोडेसे जरी सुधारणेच्या बाजूने झुकणारे असेल तर मराठ्यांनी स्वभाषेचा व स्वलिपीचा हट्ट धरणे हे अतिशय शहाणपणाचे आहे.
"बहुतेकांची सही "वाचता" येत नाही. म्हणजे त्यात त्यांचे नाव एकेक अक्षर असे वाचता येत नाही. मी कॉलेजात गेल्या वर मला जेव्हां सही करायची गरज पडू लागली, सुरुवातीला माझ्या सहीत सी एम पी ए एन डी आय टी अशी अक्षरे दिसत असत. कालांतराने ही अक्षरे डिफॉर्म होत गेली व आता गेले काही अनेक दशके माझी सही म्हणजे केवळ "एक चित्र" आहे,"
आता आपण मोठे झालो. "स्वत:वरून जग ओळखावे" ही शिकवण अगदी तंतोतंत खरी मानायला नको! ?
हलकेच घ्या! ?
- मराठा