चलच्चित्रणाबद्दल (सिनेमॅटोग्राफीबद्दल) तुम्ही तांत्रिक माहिती अतिशय सोप्या भाषेत आणि रंजकपणे सांगितलेली आहे.
मराठी मालिकांमध्ये चलच्चित्रण फार सोपे केलेले असते असे वाटते. त्यांत कॅमेरा हालत नाही फक्त ज्या/जिचे संवाद सुरू असेल/होईल त्या/तिचा चेहरा फटॅक्-कन पडद्यावर दिसू लागतो. पूर्वी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू व्हायच्या आधी किंवा मध्यांतरामध्ये 'थुंकू नका', 'धूम्रपान करू नका', 'शांतता राखा' अशा पारदर्शिका एकदा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे सरकवीत त्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही. अलीकडे गूगल मीट किंवा झूम चॅट करताना जवळ जवळ असेच होते. चेहराच जो काय हालत असेल तेवढीच हालचाल. कॅमेरा स्थिर!! मराठी मालिका पाहताना गूगलचॅटची आठवण होते.
बी बी सी इ. मंडळींच्या मालिका पाहिल्यावर हे मला अधिकच जाणवू लागले. बीबीसीवाले साध्या साध्या प्रसंगामध्येही अनेक कॅमेरे अनेक प्रकारे हालवतात. एका प्रसंगात तर एक ऑफिसातला कर्मचारी एक फाईल काढून पोलिसाला देतो इतका अगदी क्षुल्लक अर्ध्या-एक मिनिटाचा प्रवेश होता त्यातही सहा सात तुकड्यांत चित्रण होते आणि कॅमेरेही पुढे मागे वर खाली डावी-उजवीकडे जिकडेतिकडे हालत होते.
यू ट्यूबवर अशी चलच्चित्रणविषयक ध्वनिचित्रे फार छान आहेत.