झाकिरला प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा योग फ़ार उशीरा आला. पावसाळ्याचे दिवस होते,सभागृह खच्चून भरले होते. रवीशंकर यांची सतार आणि साथीला झाकिर. तीन तासांची ती मैफ़ल संपताना माझ्यासारख्या नास्तिकालाही Hand of God यापरती दुसरी उपमा सुचली नाही, अजूनही सुचत नाही. नंतर झाकिरच्या मुलाखतीत त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या अब्बाजाननी त्याच्या कानात कलमा पढण्याच्या ऐवजी तबल्याचे बोल बोलल्याच्या वगैरे कहाण्या कळाल्या आणि त्या खोट्या किंवा अतिरंजित वाटल्या नाहीत. एकूणच माणसात एक सच्चाई होती. त्याची नम्रता खोटी, बेतलेली वाटली नाही. त्याचा विनय बेगडी वाटला नाही.

त्याच्या वादनकौशल्यावर भाष्य करण्याइतपत माझी जाण नाही, पण हा माणूस खराखुरा 'उस्ताद' वाटला. त्याचे तबल्याशी असलेले नाते हा 'रोमान्स' वाटला. त्याचे देखणेपण तर डोळ्यांत भरण्यासारखे होतेच. एकूण त्याचा स्टेजवरचा वावर फ़ार सहज, सुखद वाटला. लता मंगेशकरांशी त्याने फ़ोनवर केलेला संवाद, त्यातही त्याने त्यांना 'तुम्हाला साष्टांग नमस्कार' म्हणणे, तुम्ही दोघे (म्हणजे तो आणि सचिन तेंडुलकर) मला मुलासारखे आहात असे लताबाईंनी म्हटल्यावर त्याचे भारावून जाणे हे सगळे अस्सल वाटले होते. अशी माणसे आहेत, अजूनही आहेत या विचाराने बरे वाटले होते. हा कुणाला भाबडेपणा वाटत असेल तर वाटो बापडा.

त्याला 'भारतरत्न' मिळण्यामागे त्याचे 'झाकिर' असणेच आड आले असावे. अलीकडच्या काळात तर नक्कीच.

झाकिर गेल्याची खोटी बातमी आली तेंव्हाच घशाशी काही दाटून आले. दुसरी सकाळ उजाडली तेंव्हा ती बातमी खोटी ठरुन पुन्हा खरी झाली होती. घशाशी दाटलेले होतेच.

लताबाई गेल्या तेंव्हा 'दी रायटिंग,नॉट दी रायटर'हे आठवून वस्तुनिष्ठ होण्याचा प्रयत्न केला होता. ते जमले नाही. झाकिर गेला तेंव्हा पुन्हा ते जमले नाही.

झाकिर गेला म्हणून तबला संपला नाही, संपणारही नाही. पुन्हा पूरिया दरवळेल, तो कदाचित अधिक बहारदार असेल पण आता आमच्या आठवणीच्या ताटात फ़क्त देठ लवंगा साली राहिल्या आहेत या विचाराने मन खिन्न होते.