आज मनोगतावर एका ठिकाणी "अतिसूक्ष्म कार्यालय" असा शब्दप्रयोग वाचला. काय गौडबंगाल आहे कळेना...मग थोड्यावेळाने समजले की ते "मायक्रोसॉफ्ट ऑफिस" आहे.
मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न चांगला आहे. फक्त जागा चुकली. सामान्यनाम आणि विशेषनाम मध्ये फरक आहे.
कामाच्या जागेला कार्यालय म्हणणे १००% योग्य आहे.
परंतु "मायक्रोसॉफ्ट ऑफिस" चे "अतिसूक्ष्म कार्यालय" म्हणजे दुराग्रह, अट्टाहास आणि धादांत चुकीचे शब्दांतर आहे असे वाटते.
मग इंग्लिश भाषेतून आपली नावे आपण असे शब्दांतर करून सांगतो का? उदा.
द्वारकानाथ = लॉर्ड ऑफ़ द गेट सीटी
लता = क्रीपर
शशांक = मून
समीर = विन्ड
छाया = शॅडो
सोनाली = गोल्डन
सौरभ = फ़्रॅग्रन्स
ज्ञानेश्वर = गॉड ऑफ़ विज्डम
गणेश = गॉड ऑफ़ पिपल
कवठेकर = ओरिजिनली फ़्रॉम द टाऊन नेम्ड़ आफ़्टर ऍन इंडीयन फ़्रूट हॅविंग हार्ड शेल.
असे सांगतो का? नाही ना!
विशेषनामाचे भाषांतर करत नाहीत हा साधा सरळ नियम आहे.
क) अतिसूक्ष्म कार्यालय नाही मायक्रोसॉफ्ट ऑफिस
ख) अतिसूक्ष्म खिडक्या नाही मायक्रोसॉफ्ट विंडोज
ग) गरमपत्र नाही हॉटमेल
घ) जीपत्र नाही जीमेल
परंतु, (संगणकाच्या) विंडो ऐवजी खिडकी म्हणता येईल कारण तेंव्हा ते एखादे उत्पादन अथवा विशेषनाम नसते तर सामान्यनाम असते.
गमतीसाठी असे शब्दप्रयोग करणे आणि गंभीर चर्चेत अथवा लेखात आपले विचार प्रकट करताना असे शब्द वापरणे यात खूप फरक आहे असे वाटते. अश्या शब्दांचा विचारपूर्वक वापर व्हावा.