जीआरबीजी, (शेवटचा 'जी' आदरार्थी)

काही घटना, अनुमाने, ठोकताळे बुद्धीच्या कसावर घासून त्यावर विश्वास ठेवला जातो तर कांही भावनेच्या कसावर.
प्रेम, दुःख, आनंद, संताप अशा अनेक भावना कधी कधी बुद्धीच्या कसावर खऱ्या उतरत नाहीत तरीही अस्तित्वात असतात. आपण त्यांचा स्वीकार करतो.
परग्रहावर माणसाने पाऊल ठेवणे शिवाजी महाराजांच्या काळात बुद्धीच्या कसावर अशक्य मानले असते पण आज? आज आपण ते शक्य मानतो.
चंद्राचा परिणाम भरती-ओहोटीवर होतो, आपल्या रक्ताभिसरणावर होतो असे मानतात. माझ्या एका मित्राचे निरीक्षण असेच विचित्र आहे. तो म्हणतो नेहमी एकाच ब्रँडची व्हिस्की (अथवा अन्य कुठलीही दारू), ठराविक प्रमाणात घेतली तरी 'किक' वेगवेगळ्या प्रमाणात बसते. कारण .....चंद्राची अवस्था. जर ह्या गोष्टी खऱ्या मानल्या तर सर्वच ग्रहांचा आपल्या शरीरातील 'रसायना' वर परिणाम होतो हेही मान्य असावे. वेगवेगळ्या 'रसायना' नुसार वेगवेगळे स्वभाव बनतात आणि त्या नुसार वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येतात. प्रत्येकाची आयुष्ये वेगवेगळी होतात. एकूण जीवनमान, शिक्षण, कलाक्षेत्रातील प्रगती, वैवाहिक जीवन, संभावित आजार, आणि मृत्यूची शक्यता ह्या आपल्या आयुष्यातील ठळक घडामोडींचे 'ढोबळ' अंदाज बांधता येतात. असा माझा विश्वास आहे.
'तंतोतंत' अंदाजासाठी ज्योतिष शास्त्राचा आणि परस्परावलंबीत अनंत शक्यतांचा अभ्यास हा 'महासागर' आहे आणि तिथे वादविवादाला भरपूर वाव आहे. उदा. एखाद्याच्या हातावर शिक्षणाची रेषा चांगली असली तरीही मुख्य रेषा (मस्तक रेषा, आयुष्य रेषा आणि हृदय रेषा) ह्या जाड असतील आणि हात राठ असेल तर अशा माणसाचे शिक्षण (शिक्षण रेषा चांगली असूनही) यथातथाच होते असे मानतात. पण नवशिक्या ज्योतिषी फक्त शिक्षण रेषा पाहून ती व्यक्ती उच्चशिक्षित होईल असे भविष्य वर्तविततो. तसे होत नाही आणि ज्योतिषशास्त्राविषयी विरोधी मत तयार होते. हे फक्त उदाहरण आहे.
ज्योतिषशास्त्र हे वैद्यकीय शास्त्राइतकेच क्लिष्ट आणि गहन आहे. एखाद्या निष्णांत डॉक्टरच्या आयुष्यातही 'हतबल'तेचे, गोंधळाचे प्रसंग येतात तसेच ज्योतिषीच्याही आयुष्यात येतात. असो.
 
वरील विवेचनात मी हस्तरेषाशास्त्राचा आधार घेतला आहे. पत्रिका वाचण्याचा नाही.