बाकी शास्त्रे, जसे विज्ञान, रसायन, जीव आणि गणित ह्यात मानवाने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. त्या त्या विषयात अजून अनेक गोष्टी कळलेल्या नसल्या तरी १००-२०० वर्षापेक्षा कितीतरी जास्त माहिती आहे. चुकीच्या सिद्धांतांचे खंडन केले जाते. केवळ प्राचीन आहे म्हणून ते बरोबर असेलच असे म्हटले जात नाही. त्यातील ज्ञान व्यक्तीनिरपेक्ष आहे, कुणीही पडताळून बघू शकतो. सिध्दांताच्या भक्कम पायावर ते उभे आहे.
ज्योतिषाचे असे आजिबात नाही. भाकित खरे निघण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळत नाही. कुणी प्रयोगशाळेत सांख्यिकी वापरुन त्याला सिद्ध केलेले नाही कारण मुळातच हे मिथ्यविज्ञान आहे. मनोरंजन म्हणून एक वेळ ठीक आहे. पण एखादे युद्ध लढायचे असेल वा एखाद्या उद्योगाला नवे उत्पादन बाजारत आणायचे असेल तर ज्योतिष बघू नये.