'पत्रिका' या प्रकरणा बाबतचे विचार दोन भागात स्पष्टपणे विभागले आहेत असे मला वाटते-
१. ग्रह (आणि ताऱ्यांची) मांडणी
२. त्यावरून व्यक्तीचे भविष्य आणि लग्न ठरवणे
===
१. ग्रह (आणि ताऱ्यांची) मांडणी-
हे गणित आहे. राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या(?) (घोड?) चुका सोडल्या तर इतर ग्रहांची (आणि ताऱ्यांची) स्थिती अचूक सांगता येते असे वाटते. नजिकच्या काळात राहू, केतूंची जागा नेप्च्यून आणि प्लुटो यांनी घेतली असेल तर मला कल्पना नाही. पत्रिकेच्या या भागावर माझा आंधळेपणाने नसला तरी डोळसपणे विश्वास आहे कारण याला गणिताचे पाठबळ आहे. (याचा मला दैनंदिन व्यवहारात काय उपयोग आहे हा चर्चेचा मुद्दा ठरावा. वृत्तपत्रांना जागा भरायला एक कारण!)
===
२. पत्रिके वरून व्यक्तीचे भविष्य आणि लग्न ठरवणे-
हा तद्दन नादानपणा आहे असे वाटते. 'माझ्यापासून लाखो आणि करोडो मैल अंतरावर असलेले ग्रह आणि ताऱ्यांचा संबंध माझ्या लग्नाशी आणि भविष्याशी आहे' यासारखे तर्कशून्य विचार आपल्या संस्कृतीत टिकले याचे मला वाईट वाटते. याची कोणी गणिती सिद्धता दिली तरच यावर माझा विश्वास बसेल अन्यथा नाही.
अगदी ३६ गुण जुळून लग्ने मोडतात आणि पत्रिका न जुळणारे पण पत्रिका न बघता केलेले संसार यशस्वी होतात. याचे उत्तर मागावे तर "त्यांच्या पत्रिका चुकीच्या असतील" असे उत्तर येते!
मानवी आयुष्य हा पुनःपुन्हा न करता येणारा प्रयोग आहे. त्यामुळे याचे असे झाले तर त्याचे तसे होईल असे म्हणणे अशक्यच आहे. दोन व्यक्तींच्या पत्रिका जर का तंतोतंत (या शब्दात सगळे 'त'च आहेत!) सारख्या असतील तर त्यांचे आयुष्य सुद्ध एकसारखे व्यतीत व्हायला हवे ना? पण तसे होताना दिसत नाही. का? ... "त्यांच्या पत्रिका चुकीच्या असतील!" ...आता बोला!
'पत्रिकेचा मानवी जीवनावर परिणाम होतो' ही माणसाच्या क्रयशक्तीला चालना द्यायच्या ऐवजी खीळ घालणारी, आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकायला शिकवणारी अंधश्रद्धा आहे आणि त्याचे उच्चाटन व्हावे असे वाटते.
===
प्रशासक महोदय आणि जाणकार मंडळी,
'तद्दन' हा शब्द मराठी व्याकरणाप्रमाणे चुकीचा आहे का? 'गमभन' मला नेहमी दुरुस्ती सुचवतो.