नमस्कार!
'त्या'ने लिहिलेल्यामध्ये ज़राशी दुरुस्ती.
'शास्त्र' आपणांस सांगते प्रत्येक गोष्टीत कार्य-कारण भाव आहे. याआधी काय व कसे झाले हे नक्की माहित असेल तर यानंतर काय होईल हे सांगता यायला हवे. (जग हे मोठ्या विशाल 'पूल टेबला'प्रमाणे आहे ज्यात सुरुवातीची स्थिती, मारल्या जाणाऱ्या चेंडू(?)ची दिशा व वेग यांची 'नक्की' माहिती असल्यास अंतिम स्थिती सांगण्यास शास्त्र समर्थ हवे (जे सध्या नाही..प्रयत्न चालू आहेत).
विज्ञानानेही ज़री भविष्य वर्तवू शकतील अशी समीकरणे/असमीकरणे/नियम इ. बनवणे हे एक उद्दिष्ट मानले असले, तरी ते अज़ून सजीव वस्तूंबाबत फारशी प्रगती करू शकले नाही. किंबहुना निर्जीव वस्तूंबाबतही (की जे भौतिकशास्त्राचे क्षेत्र आहे) अज़ून फार मज़ल मारायची आहे. वर आपण उल्लेख केलेले उदाहरण हे त्यातूनच आलेले आहे, आणि ते फक्त जड वस्तूंनाच लागू आहे, अजड किंवा सचेतन वस्तूंना नव्हे हे विसरता कामा नये.
एका प्रकारे 'भविष्य सांगता येते' म्हणणारे 'शास्त्रवादी' आहेत तर ते तसे सांगता येत नाही म्हणणारे 'दैववादी'
बरे ज्या दैववादाचा उल्लेख ते करतात (खरे तर तो अटळतावाद/नियतिवाद आहे - सायंटिफिक डिटरमिनिज़म), तो भौतिकशास्त्रातून येतो, आणि त्याचे कार्यक्षेत्र हे केवळ जड वस्तूंपुरते (inanimate objects) मर्यादित आहे, अगदी क्लासिकल फिज़िक्सपासून ते सापेक्षतावाद किंवा अनिश्चिततावादापर्यंत सर्वांबाबत.
शशांक यांच्या ज्या लेखाचा संदर्भ आपण दिला आहेत, त्यात काही थोड्या गफलती आहेत. (विषयांतर करून - त्या लेखासंदर्भात, 'यक्षगान' या नारळीकरांच्या विज्ञानकथासंग्रहातील इतिहासाधारित एक कथा ही या कालवकाशातील शक्यता या अटळतावादातून निघणाऱ्या एका संकल्पनेवर आधारित आहे, ती ज़रूर वाचा.)
बरे हा अटळतावाद हीही मुळात सामान्य सापेक्षतावादाचा विस्तार केला तर निघू शकणारी एक शक्यता आहे, वैज्ञानिक सिद्धांत नव्हे. आणि सामान्यतः प्रचलित असणाऱ्या नियतिवाद/दैववादाच्या कल्पनेपेक्षा किंवा विश्वनियंता इ. संकल्पनांपेक्षा ती कमालीची निराळी आहे. फक्त अनेक लोक त्या दोहोंचा संबंध ज़ुळवून बराच घोळ घालतात हे खरे.
हाज़नबर्गने त्या कल्पनेच्याही चिंध्या केलेल्याच आहेत.
तसाही हा सर्व भौतिकशास्त्राच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्न आहे आणि पुढे ते मेटाफिज़िक्समध्ये घुसतो.
अशा प्रकारे वैज्ञानिक संकल्पनांचा कुठे पारंपरिक मिथकांशी संबंध ज़ोडताना आपण अधिक सावध राहिले पाहिजे.
आपला हे सर्व लिहिण्याचा उद्देश अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे हे मान्य आहे.
परंतु त्यातूनच छद्मविज्ञानाच्या शोधात असणाऱ्यांना चुकीचे संदेश ज़ावू शकतात, याचे भान असावे.
छद्मविज्ञानातून - (pseudoscience) - आपण ब्रह्म (ईथर - खरे तर हीही एक नुसती विचारासाठी मांडलेली संकल्पना होती आणि मायकेल्सन-मोर्लेंनी तिची अनावश्यकता सिधही केली, तरी थिऑसॉफियन्स अज़ूनही तिचा आधार घेतात!) ब्रह्मातून विश्वोत्पत्ती (महाविस्फोट - बिग बँग सिद्धांत), स्वर्गगमन (स्ट्रिंग थियरी), ग्रहांचा जीवनावर परिणाम (न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत), पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (पाय 'दक्षिणपूर्वे करो नये') वगैरे अनेक भाकड समज़ुतींना आधार मिळवले आहेत! आणि दुर्दैवाने आपल्याकडे शास्त्रशिक्षित लोक असले, तरी शास्त्रीय दृष्टिकोनाच्या निर्मितीबाबत उजेड आहे. त्यामुळे असल्या आधारांवर शास्त्राबाबतच्या आंधळेपणामुळे विश्वास ठेवणारी बरीच गिर्हाइके मिळतात!
तेव्हा आपणही ज़रा ज़पूनच!
शास्त्राच्या दृष्टीने भूत व भविष्य अगर काळाची दिशा या गोष्टी शास्त्रीय नियमांत बदल करत नाहीत.
- हेही विधान ज़रा दमानेच करायला हवे! उष्मागतीशास्त्राचा तिसरा नियम आठवा. त्याच्यासाठी कालप्रवाह हा भूतकाळापासून भविष्याकडे ज़ात आहे असे मानणे आवश्यक आहे! (ही कमालीची वैज्ञानिक चर्चा झाली हे मान्य आहे, इतरांनी माफ करावे!) ज़र अशी दिशा मानली नाही, तर तो नियम असफल होतो.
आपला,
मराठा