नमस्कार!
तात्पर्य, सूर्य आणि चंद्राला ग्रह म्हणणे हा काही शास्त्राचा दोष नव्हे. त्या काळातील त्या संज्ञा आहेत, त्या काळाला अनुरूप आणि आवश्यक.
भ्रमंतींच्या या चर्चासूत्रातील प्रतिसादामधील प्रत्येक शब्दाशी सहमत.
सूर्य, चंद्र हे ज़से पारंपरिक भारतीय फलज्योतिषात ग्रह आहेत, तसेच राहू केतू हेही अवकाशातील विशिष्ट बिंदू आहेत.
आधुनिक ज्योतिषशास्त्रात (= खगोलविज्ञानात) या संज्ञांना अधिक काटेकोर अर्थ प्राप्त झाले म्हणून फलज्योतिषाला झोडपण्यात काही अर्थ नाही. मुख्य म्हणजे ते बिनमहत्त्वाच्या गोष्टींना आक्षेप घेणे झाले.
हा भाषेचा घोळ आपल्या ज्योतिर्विज्ञानात अन्यही काही शब्दांबाबत झाला आहे/होता. उदा. पूर्वी आता आपण विश्व, दीर्घिका व आकाशगंगा या शब्दांमध्ये योग्य तो फरक मान्य करतो. पूर्वी नवीन दीर्घिकांचा शोध लागला की "नवीन आकाशगंगा सापडली" अशा बातम्या येत. (आता आकाशगंगा - मिल्की वे हे आपल्या, सूर्यादी तारे असणाऱ्या 'दीर्घिके'चे विशेषनाम आहे असे आपण शिकलो आहोत.) आणि अवकाशातील अनंत तारकासमूहांबाबत (म्हणजेच दीर्घिकांबाबत) "अवकाशात अनेक विश्वे आहेत" असेही छापलेले असे. (आता एकूण विश्व हे अनेक दीर्घिकांचे बनलेले आहे असे आपण शिकलो आहोत.)
तसाच गोंधळ सूर्य व चंद्र या शब्दांबाबतही होता. "नवीन सूर्य सापडला" वगैरे शीर्षकाच्या बातम्या येत, आणि शनीचे 'चंद्र', गुरूचे 'चंद्र' असे असे शब्दप्रयोग सर्रास वापरले ज़ात. (आता आपण सूर्य हे आपल्या, पृथ्वी असणाऱ्या ग्रहमालेतील एकमेव 'ताऱ्या'चे विशेषनाम आहे, आणि चंद्र हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या एकमेव 'उपग्रहा'चे विशेषनाम आहे असे आपण शिकलो आहोत!)
बाकी फलज्योतिषाविषयीची चर्चा ही ज़ोरदार आणि रंजक होणार यात शंकाच नाही. माझ्याकडूनही वेळेअभावी केवळ एका मुद्द्याविषयी दोन पैसे!
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाविषयीचा सिद्धांत हा अनेक फलज्योतिष्यांना त्यांच्या 'शास्त्रा'चा आसरा वाटतो. (आपली तथाकथित पारंपरिक 'शास्त्रे' 'बाबावाक्यम् प्रमाणम्'चा जप करणारी असतील, आणि त्यांच्या दिवटेगिरीपेक्षा पश्चिमोद्भव आधुकिक शास्त्रे हीच दिवे लावण्यास जास्ती समर्थ आहेत असे दिसत असल्याने समाजच पश्चिमाभिमुख बनला असेल तर असे वाटण्यात काही नवल नव्हेच!) "ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असे आम्ही इतकी शतके म्हणतोय, आता तुमचे न्यूटन आणि केप्लरही तसेच म्हणतायत कीनई पाहा!"
न्यूटनच्या सिद्धांतानुसार, जगातल्या कोणत्याही दोन जड वस्तूंमध्ये एक आकर्षणबल कार्यरत असते, आणि ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाशी समप्रमाणात आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तप्रमानात बदलते.
शाळेतील कुठल्यातरी भूगोलाच्या पुस्तकात सर्व ग्रहांच्या कक्षांच्या सरासरी त्रिज्या, ग्रहांचे वस्तुमान इ. दिलेले असते. माणसाचे सरासरी वज़न ७० किलो माना. हे सर्व घेवून दहावीतील एखाद्या मुलाला गणित करून तो काल्पनिक मनुष्य (किंवा तुम्ही स्वतः!) आणि कुठलाही ग्रह यांच्यात असलेले आकर्षणबल मोज़ायला सांगा.
मनुष्य उभा असेल आणि बसला असेल, तर त्याच्या वज़नात (विज्ञानानुसार वज़न म्हणजे वस्तू व पृथ्वी यांच्यातील आकर्षण बल) किंचित फरक होतो. चंद्र, शनी, मंगळ वगैरे कुठल्याही ग्रहाच्या आपल्या वज़नातील तथाकथित परिणामापेक्षा हा उठून बसल्यावर होणारा बदलही जास्ती असतो, आता बोला!
इतकेच काय, त्या शनिमंगळादी ताकदवान, भयंकारी ग्रहांचा आपल्या शरीरावर जितका प्रभाव असतो, त्यापेक्षा जास्ती प्रभाव आपल्या घरापासून शंभर फूट दूर उभा असलेला तीन टन उसाने भरलेला ट्रक आपल्या शरीरावर पाडत असतो! (आता काय त्याला शेंदूर फासणार?!)
लिहिण्याचा उद्देश इतकाच की छद्मविज्ञानापासून सावध असा! ;-)
जिज्ञासूंनी 'विज्ञानगंगेची अवखळ वळणे' हे जयंत नारळीकरांचे पुस्तक वाचून अधिक बोध करून घ्यावा! (नारळीकर हे स्वतः बनारसेत वाढलेले संस्कृतप्रेमी/ज्ञानी आहेत याचीही आवर्ज़ून नोंद घ्यावी!)
शास्त्र आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण आजही काही प्रज्ञावंत ज्योतिषी व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना अचूक सांगतात.
म्हणूनच लोकांचा भविष्यावर अजून विश्वास आहे.
हे मान्यच!
शिवाय मानवी मन हे काही सर्वज्ञ, सर्वशक्तिमान नव्हे! त्यामुळे अज्ञाताची ओढ, कुतूहल आणि त्याबद्दल अनामिक भय हे असणारच!
या एका गोष्टीमुळेच आज़ इतकी शतके जीवरसायनभौतिकादी विज्ञानांची सतत प्रगती होत आहे, त्यांची क्षितिजे रुंदावत आहेत, मर्यादा गळून पडत आहेत, ज्ञानभांडार समृद्ध होत आहे.
आणि त्याउलट आस्तिकतेपासून ते वास्तुशास्त्रापर्यंत अनेक संकल्पनांच्या व्यवहारातील अवतरणांना केवळ हीच एक काडी इतकी शतके बुडण्यापासून वाचवत आहे!
आपला,
मराठा