नमस्कार.
आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.
त्यांमधील काही मुद्द्यांवर प्रतिक्रियाः
ऊर्ध्वनिर्दिष्ट वाक्याच्या संदर्भात, राष्ट्रभाषा प्रचार समिती ही मुळात श्री. चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) यांच्या उत्तेजनाने प्रथम चेन्नई (मद्रास) येथे स्थापन झाली होती, हे मी नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. - टग्या
- आपण पुरवलेला हा तपशील बरोबर आहे, पण अपुरा आहे. त्या समितीची तेथून उचलबांगडी करणे 'भाग पडले' हा भागही आपण लिहिला असतात तर अधिक बरे झाले असते!
प्रगत महाराष्ट्र आता इतका प्रगत राहिला नाही. इतर दक्षिणी राज्ये व गुजरात पुढे गेली आहेत. - विनायक
आपल्या लेखाच्या अनुषंगाने ही बातमी पुढारलेला महाराष्ट्र १४ व्या क्रमांकावर आठवली. - शशांक
- आपल्या या संदर्भाबद्दल आभारी आहे. परंतु मी माझ्या लेखात महाराष्ट्र हा सर्वच्या सर्व बाबींत अग्रेसर आहे असे कुठेच म्हटले नाही. किंबहुना मराठ्यांच्या अंतर्दृष्टीबद्दल (inward-looking attitude) मीही तक्रारीचाच सूर लावतो. आणि ही अंतर्दृष्टी आपल्याला तोट्याचीच ठरेल हे खरे. आत्मसंतोष हा व्यक्तिगत पातळीवर स्वीकारार्ह आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकेल, पण संस्थापातळीवर, समाजपातळीवर तो विघातकच आहे हे नक्की. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बंगाल. स्वातंत्र्याच्या वेळी सर्वांत प्रगत असलेल्या त्या राज्याची परवड ही या अंतर्दृष्टीमुळे, आत्मसंतोषामुळेच झाली. आमची संस्कृती, कला, आमचे उद्योग, आमच्या संस्था, आमचे तत्त्वज्ञान, एकूणच आमची व्यवस्था ही इतकी महान की ती बदलाच्या पलीकडे आहे असे मानण्याच्या विघातक दृष्टिकोणाचा तो परिणाम होता. आपले तसे होवू नये यासाठी आपण सतत सावध असायला हवेच.
पण त्याच्या दुसऱ्या टोकाचे, कमालीच्या बहिर्दृष्टीचे उदाहरण म्हणजे बिहार. सर्व गोष्टींसाठी बाहेरची निमित्ते द्यायची, व्यवस्थेत आतून व स्वतःच सुधारणा करणे सतत नाकारायचे या वृत्तीपायी तेथे काय झाले आहे याची चर्चा करायची गरज़ नाही.
अशा थोड्याही बहिर्दृष्टीपेक्षा सध्याची अंतर्दृष्टी परवडली!
आपण ज्या बातमीचा दुवा पुरवला आहेत, त्यातही हिंदी भाषिक राज्ये कोणती आणि किती आहेत?! (आणि महाराष्ट्राला चौदावा क्रमांक ज़रूर मिळाला असेल, पण त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र पुढारलेला असे केवळ महाराष्ट्रीय लोक म्हणत नाहीत तर आंतरराज्य परिषदांमध्ये परप्रांतीय मंत्री, मुख्यमंत्रीही म्हणतात, योजना आयोगही म्हणतो. तेव्हा आपण पुढारलेले हा काही केवळ 'आत्मभ्रम' नव्हे!) दाक्षिणात्य राज्यांची थोरवी तर मी मान्य केलीच आहे. खरे तर अगदी मिज़ोराम व सिक्कीम ही छोटी राज्येही आपण अनुल्लेखाने मारत असलो, तरी ती किती प्रगत आहेत याची कल्पना तेथील लोकांना भेटल्यावर आपल्याला येवू शकेल.
त्या हिशोबाने महाराष्ट्र गेली काही वर्षे मागे पडत आहे हे खरेच आहे. उदाहरणार्थ, सहिष्णूतेची आपली परंपरा मार खात आहे. राजकारण किळसवाण्या दिशेने प्रगती करत आहे.
एके काळी (किंबहुना आज़ही) आय.ए.एस./आय.पी.एस. अशा सेवांमध्ये अधिकाऱ्यांची पहिला पसंती ही महाराष्ट्राला (किंवा त्यांच्या home-stateनंतर मग महाराष्ट्राला) असायची. इथे प्रशासकीय सेवकांचा आदर होत असे. राजकारणीही त्यांना सन्मानाने वागवत. इथली कायदा आणि सुव्यवस्था अव्वल दर्जाची होती.
आपले राज्यकर्ते हे बऱ्याच अंशी सुसंस्कृत होते. भ्रष्टाचाऱाच्या आरोपांमुळे अंतुले आणि निलंगेकरांना राजीनामे द्यावे लागले हे खरे, पण ते त्यांनी दिले! पण पुढे दूरनियंत्रकाच्या आशीर्वादाने अगदी खुनाचा आरोप असलेली व्यक्तीही मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली.
विधिमंडळात पेपरवेट किंवा माईक फेकून मारणे असले प्रकार होत नसत. ती उत्तर प्रदेशाची परंपरा होती.
मध्यंतरी शिवसेनेने काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न चारपाच वर्षांपूर्वी केला तेव्हा सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी ज़े वर्तन केले, तेव्हा आपले उच्च पातळ्यांवरचे राजकारणही किती गलिच्छ बनत चालले आहे हे समज़ले.
महाराष्ट्राची आर्थिक प्रगती वाखाणण्याज़ोगी आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. आणि ती काही आखाती देशांप्रमाणे सामाजिक प्रगतीखेरीज़ झालेली नाही. तसे असते तर इथे इतके उद्योगधंदे उभे राहिले नसते. आज़ही स्वतंत्र नोकऱ्या केलेल्या स्त्रियांना दिल्ली, नॉयडा, चंदीगढ, हैद्राबाद, बेंगलोर व मुंबई/पुणे/औरंगाबाद/कोल्हापूर अशा शहरांपैकी कुठे सर्वाधिक सुरक्षित वाटते याचे उत्तर विचारा. त्यात येथील वास्तव दिसून येईल.
अर्थात लिंगगुणोत्तराबाबत महाराष्ट्र कधीच अग्रणी नव्हता. आपण निर्दिष्ट केलेल्या बातमीतील तो भाग त्यामुळे नवीन नाही.
पण अन्य अनेक सामाजिक प्रगतीचे आपले निर्देशांक बळकट असल्यानेच आपली आर्थिक प्रगती ही ज़ोमाने झाली.
आज़ही नवीन आर्थिक गुंतवणुकीबाबत नक्की अग्रेसर कोण हे निरनिराळ्या पाहण्यांनुसार निरनिराळे असले, तरी महाराष्ट्राचे त्यातील महत्त्व कोणीच नाकारत नाही.
पण अर्थातच विनायक यांनी लिहिल्याप्रमाणे आता आपल्यालाही गुजराथ, आं.प्र., कर्नाटक, तमिळनाडू यांच्याकडून ज़बरदस्त स्पर्धा निर्माण झाली आहेच. पण यांत हिंदीभाषक राज्ये कोणती? माझा मुद्दा हाच होता की हिंदीभाषकांची संस्कृती ही दाक्षिणात्य राज्यांपेक्षा निराळी आणि त्यांच्यापेक्षा अधिक स्थितीवादी, व प्रगतीला पोषक नसणारी आहे.
(एक दयानंद सरस्वतींचा आणि सर सय्यद अहमदांचे टळटळीत अपवाद वगळता हिंदी प्रांतांत कोणता radical समाजसुधारक/धर्मसुधारक झाला? आपल्याइथे मात्र शेणाचे गोळे खावूनही आपले काम नेटाने सुरू ठेवणाऱ्या सावित्रीबाईंपासून ते जिवंतपणी प्रेतयात्रा निघूनही विचारांपासून न ढळणाऱ्या आगरकरांपर्यंत, पूर्णविभिन्न पण महत्त्वपूर्ण क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कर्वे पितापुत्रांपर्यंत, गुलामाला गुलामीची ज़ाणीव करून देणाऱ्या आंबेडकरांपर्यंत, दलितांसह सहभोजने करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांपर्यंत, धर्मसुधारणेचा तोवर कल्पनातीत असा विचार मांडणाऱ्या हमीद दलवाईंपर्यंत, व्यवस्थेविरुद्ध आवाज़ उठवणाऱ्या मेधा पाटकरांपर्यंत, धर्मातील अंधरुढींवर प्रहार करणाऱ्या दाभोळकरांपर्यंत त्यांची मांदियाळी आहे. तीच कथा बंगाल आणि तमिळनाडूची. आता आपल्याइथे अशा radical सुधारकांऐवजी, त्यांच्याच सुकृतांचा आधार घेवून अधिक विधायक कार्ये करणाऱ्यांची फौज़ आहे. हिंदी राज्ये अज़ूनही शंभर वर्षे मागे आहेत!)
दुसरे म्हणजे महाराष्ट्राची मूळ प्रगतीच आता इतकी झाली आहे की प्रगतीचा वेग मंदावणे हे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत तो वेग राखणे हे मोठेच आव्हान आहे, आणि ते आपण पेलले पाहिजे. वेगवान प्रगतीचा हा एक अटळ परिणाम आहे. बेंगलोरात कर्नाटकालाही त्याचा सामना करावा लागत आहेच.
याउलट मागास राज्यांना प्रगतीचा अधिक वेग गाठणे हे शक्य होते. (म्हणूनच आंध्र, मध्य प्रदेश, राजस्थान ही आता वेगाने प्रगती करताहेत असे भासते. भारताचा विकासदर हा अमेरिकाइंग्लंडादींपेक्षा खूप अधिक आहे म्हणून भारत हा अधिक विकसित देश आहे असे नव्हे!)
बाकी प्रादेशिक असमतोल हा असणारच आहे. अमेरिकेतही कॅलिफोर्निया आहे आणि ऍरिज़ोनाही आहे! विदर्भ मागासलेला आहे, पण तो उत्तर प्रदेश किंवा बिहारपेक्षा अनेक पटींनी चांगला आहे!
या सर्व संदर्भांत ब्लेअरचा प्रबंध आपण ज़रूर वाचावा.
दुसरे असे की शिवाजी, थोरले बाजीराव व लोकमान्य टिळक यांच्याबरोबर शरद पवारांचे नाव घेणे योग्य नाही. पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पक्षात राहून पूर्ण होणार नाही असे वाटल्यानेच केवळ ते कॉँग्रेसबाहेर पडले. यात स्वदेशी अथवा राष्ट्रवादाचा काडीचाही संबंध नाही. हा कसलाही विधीनिषेध नसलेला माणूस आहे. यापेक्षा यशवंतराव हे हजार पटींनी स्वच्छ, गुणी, अजातशत्रू आणि सुसंस्कृत होते. - विनायक
आपले म्हणणे थोडेफार मान्य आहे, पूर्ण नाही.
आपण पवारांचे केवळ अलीकडचे बंड विचारात घेतले आहे का? आधीही त्यांनी कधीच दिल्लीशी मतभेद दाखवले नाहीत असे आपल्याला म्हणायचे आहे का? इंदिरा गांधींशीही त्यांनी वाकडे घेतले होते हे कसे विसरता?! (स्वदेशी/राष्ट्रवाद हा निराळा मुद्दा आहे, त्याचा दिल्लीदरबारी निष्ठा अर्पण करण्याशी संबंध नाही.)
यशवंतराव हे हज़ार पटींनी स्वच्छ व अजातशत्रू हे मान्य, गुणी व सुसंस्कृत हे नाही. ते पवारांवर कमालीचा अन्याय करणारे आहे. (गांधींच्या खुनानंतरच्या ज़ाळपोळीत ब्राह्मणांना 'तुमची घरे आम्हीच बांधून दिली होती, नीट वागाल तर अज़ूनही पुन्हा बांधून देवू' असे सांगणारा 'गुणी, सुसंस्कृत' नेता कोण?!) शिवाय चव्हाणांचे अजातशत्रुत्व हे दिल्लीच्या ताटाखालचे मांजर झाल्यानेच आले होते हे विसरायला नको. राजकारणात महत्त्वाचे असते ते यश, अजातशत्रुत्व नव्हे! त्यांनी व्यक्तिगत राजकीय यश मिळवले, महाराष्ट्राचा मान वाढवला नाही. (अर्थात खुद्द महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहेच, तो नाकारता येणार नाहीच!)
सावरकर हे राष्ट्रीय पातळीवर कितपत प्रभावी नेते होते? त्यांच्यापेक्षाही चव्हाण, पवार, अगदी ठाकरेही खूप अधिक प्रभावी! आंबेडकरांना राजकारणी म्हणणे मला कठीण ज़ाते. पण तरीही त्यांचेही नाव या मालेत घालणे मी मान्य करीन.
याउलट ज्यांची योग्यता अजूनही आपण ओळखली नाही असे एक नाव म्हणजे महादजी शिंदे. - विनायक
- बरोबर! पण तिथेही आपण फक्त किंगमेकर बनलो, किंग नव्हे! कारण दिल्लीचे तख्त फोडले, तरी शेवटी तिथे बसणारा म्हणजे वैकुंठाधिपती! शाहू महाराजांनी शब्द घालून दिलेला, तो मोडायचा कसा?! (अर्थात म्हणून इथे महादजींची थोरवी कमी होत नाहीच. राजा न बनता दिल्लीदरबारचे फक्त मंत्री बनण्यामागे strategic कारणे होती, ती निराळी.)
अगस्तीमहाशय व विसोबापंतांनी मी ज्यांचा परामर्श मूळ लेखात घेतला तेच मुद्दे परत उगाळले आहेत, तरीही मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देत आहे, आणि माझी भूमिका अधिक स्पष्ट करत आहे!
१) मराठी असे आमुची मायबोली।...... मराठीचे आमच्या आयुष्यातील स्थान अढळ आहे. तिला पर्याय तर दूर, तिच्या जवळपासही दुसरी भाषा पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यावर वाद/चर्चा/उहापोह करण्याचा काही प्रश्नच नाही, आवश्यकता नाही. - अगस्ती
- ही गोष्ट गृहीतच (given) आहे. वादाचा तो मुद्दाच नव्हे.
पण हिंदी कशी क्रमाक्रमाने मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांतून मराठीला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करत आहे आणि मराठीला केवळ खाज़गी आयुष्याच्या वर्तुळात सीमित करत आहे हे ज़र आपल्याला अनुभवास आले नसेल, तर आश्चर्य आहे! हल्ली पुण्यात टिळक आणि शास्त्री रोडवरील दुकानदारही हिंदीत बोलतात (स्टेशनपासचा परिसर तर कधीचाच हातचा गेला!), उद्या बाजीराव रोडवरही हे झाले तर आश्चर्य वाटू नये. (गरज़ूंनी टिळक स्मारकशेज़ारच्या दुकानांत ज़ावून खात्री करून घ्यावी!)
यासाठीच मी 'महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे.' असे विधान केले होते. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर नुसते ओझ्याचा बैल अशी भूमिका बजावावी न लागता स्वतःला assert करता येईल. दक्षिण भारतीय राज्ये ज्याप्रमाणे स्वभाषाप्रेमादर दाखवतात, तसाच आपण दाखवणे हे अत्यावश्यक आहेच.
३) कारण हिंदी ही हिंदूसंस्कृतीशी निगडीत आहे. ती मराठीच्या, संस्कृतच्या जवळची आहे.
४) त्यामुळे तिच्याबद्दल जास्त जिव्हाळा असणे हे स्वाभाविक आहे. - अगस्ती
- भाषेमध्ये धर्माचा प्रश्न मिसळला की विनाकारण, नसती, अनाठायी गुंतागुंत निर्माण होते.
हिंदुसंस्कृती अशी काही एकजिनसी संस्कृती अस्तित्वात आहे असे मानायचे असेल, तर मग भारतातील विविधतांचा आदर करणे वगैरे कचऱ्यातच जाते. आसिंधुसिंधुहिंदुएकता वगैरे म्हणायचे असेल तर भारताच्या वास्तवाकडे आपण सोयीस्कर व स्वप्नील दुर्लक्ष करत आहोत!
माझ्या मूळ लेखातील वाक्ये परत उद्धृत करतोः
भारताचे स्वरूपच असे आहे की इथे अमुक एकच भाषा, धर्म, संस्कृती असा हट्ट धरणे म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये खीळ घालणे आहे. त्यापेक्षा आहेत त्या विभिन्नतांसह एकत्र राहाणे हे हितावह आहे.
बरे ज़री धर्माचा विचार घेतला, तर आज़ किती मुस्लिम राष्ट्रे अरेबिक (अथवा पर्शियन) बोलतात किंवा किती क्रिश्चन राष्ट्रे लॅटिन (अथवा इंग्रजी) बोलतात? त्यांच्या धर्मावर किंवा धार्मिकतेवर त्याचा काय दुष्परिणाम झाला आहे?
५)सर्व देशवासियांना एका समान धाग्यात गुंफण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. ती संपन्न आहे. गोड आहे. उदात्त आहे. - अगस्ती
- दुसरे वाक्य मान्य. पण ते मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, जर्मन, तमिळ अशा सर्वच भाषांबाबत मान्य आहे! अर्थात एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की ज्या भाषेमागे आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक (business) संपन्नता नाही ती भाषिकदृष्ट्या कितीही संपन्न असली तरी मागासच.
पहिले वाक्य भाबडेपणाचे आणि वास्तवापासून योजने दूर असणारे आहे. इथे लोक भाषेपायी रक्तरंजित दंगली, आंदोलने करत आहेत, हिंदी लादण्याचे प्रयत्न झाले तर स्वातंत्र्याच्या चळवळी करायच्या गोष्टी करत आहेत, आणि आम्हाला मात्र हिंदी ही देशाला एका धाग्यात गुंफणारी भाषा वाटत आहे!
हिंदीविरोध म्हणजे राष्ट्रविरोध किंवा हिंदीप्रेम म्हणजे राष्ट्रप्रेम अशी अतिसुलभीकरणे टाळली पाहिजेत. देशप्रेम दाखवण्यासाठी संविधानातील दोन अधिकृत (official) भाषांपैकी एकीचाच आग्रह धरला पाहिजे हे अन्यायकारक विधान आहे!
६) दक्षिण भारतात किंवा उत्तर-पूर्व भारतात पूर्वी इंग्रजी किंवा स्थानिक भाषा येत नसेल तर फार त्रास व्हायचा. आता सुदैवाने हिंदी भाषा ते बोलू लागले आहेत. त्यामुळे किमान महानगरामध्ये तरी फारसे अडत नाही. - अगस्ती
- याला उत्तर मूळ लेखात दिले आहेच. प्रश्न हा आहे की अज़ून हिंदीचा भारतात सर्वत्र स्वीकार व्हायला कित्येक दशके लागतील. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धात्मकता प्राप्त करण्यासाठी इंग्रजीत उत्तमत्व प्राप्त करणे! तोवर जग आपली वाट पाहात थांबणार आहे का?
(विषयांतर करून: अगस्तीमहोदय, 'संपन्न' हिंदीमध्ये ज़री इंग्रजीचे भाषांतर करून पूर्वोत्तर किंवा 'उत्तर-पूर्व' असा शब्द आला असला, तरी मराठीत त्यासाठी 'ईशान्य' असा शब्द आहे बरे का! तसेच हिंदीत 'दर्शक' असले, तरी मराठीत 'श्रोते' आणि 'प्रेक्षक' असे दोन निराळे शब्द आहेत; हिंदीत भारतीय जनता 'पार्टी' असली, तरी मराठीत 'पक्ष' आहे, हिंदीत 'जी' असले, तरी मराठीत राव, साहेब, पंत आहेत! अर्थात इथे केवळ शब्दच्छल करून हिंदीच्या श्रीमंतीपुढे प्रश्नचिन्ह उभे करायचा हेतू नाही, हिंदी ही श्रीमंतच भाषा आहे. प्रत्येक भाषा ही तिच्या तिच्या संदर्भांमध्ये श्रीमंतच असते. फक्त आपल्या विचारविश्वात हिंदीचे नकळत आक्रमण किती झाले आहे, आणि आपण मराठी शब्द न वापरता हिंदी शब्द कसे वापरतो हे दाखवण्याचा हा इथल्या इथे केलेला प्रयत्न आहे!)
७) इंग्रजी मडमेच्या कुशीत विसावण्यापेक्षा, आम्ही आर्यावर्तातील हिंदीच्या कुशीत विसावू.
- sheer rhetoric! त्यामुळे हा निराळा मुद्दा मानायची गरज़ नाही.
हे विधान उत्तरास पात्र आहे असे मला तरी वाटत नाही!
परंतु हिंदी भाषेवरही आमचे नितांत प्रेम आहे आणि कोणी मानो किंवा न मानो, आम्ही हिंदीलाच आमची राष्ट्रभाषा मानतो. - विसोबा
- भले! इथे खुद्द संविधान आमच्या मायमराठीला अन्य एकवीस भाषांसोबत राष्ट्रभाषेचा दर्जा देते, पण आमच्या लेखी मात्र अज़ून हिंदी हीच राष्ट्रभाषा!
आमचेही हिंदी भाषेवर प्रेम आहेच. आपली हिंदी भाषा 'तेरे/मेरे'च्या आणि 'मैं जिनेके उपरसे धापकन पड्या'च्या पलीकडे ज़ावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करून ती हिंदीभाषकांकडून कौतुक व्हावे अशी सुधारली आहे. पण म्हणून काही तिचा परिणाम आम्ही आमच्या भाषेला, संस्कृतीला घातक होईल इतका करून घ्यायचे कारण नाही.
बाकी दुसऱ्या वाक्यातील 'कोणी मानो किंवा न मानो' हा प्रयोगच महाराष्ट्रासाठीचा आणि मराठ्यांचा गंभीर प्रश्न उघड करायला पुरेसा आहे. आपण 'राजापेक्षा राजनिष्ट' आहोत आणि 'हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उदोउदो दिल्लीतही होत नाही तितका महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होतो' ही माझी विधाने आपल्या या वाक्यातून पुरेशी स्पष्ठ होतात! ;-)
पण भाषेवर रागवायचं काय कारण आहे आम्हाला? कोणतीच भाषा वाईट नसते, तर प्रत्येक भाषेचं वेगळं सौंदर्य असतं. आंग्ल भाषेवरही आमचे फार प्रेम आहे. - विसोबा
- एकदम मान्य!
आमचा हिंदी भाषेवर बिलकूलच राग नाही, ना इंग्रजीवर!
पण भाषेचा अतिरेकी स्वीकार केल्याने ज़र महाराष्ट्राच्या संस्कृतीचा व प्रगतीच मूळ गाभा ज़र धोक्यात येत असेल, तर तशी भाषा टाळणे अत्यावश्यक आहे. आणि हा प्रश्न हिंदीबाबतच संभवतो, इंग्रजीबाबत नाही. तमिळनाडूत फक्त तमिळचा आग्रह होतो आणि परभाषिकसंपर्कासाठी इंग्रजीचा स्वीकार/पुरस्कार होतो म्हणून काही तिथे इंग्रजी/अमेरिकन लोक गठ्ठ्याने स्थलांतरे करत नाहीत! महाराष्ट्रात हिंदीप्रेम अती असल्याने महाराष्ट्रात मात्र हिंद्यांची अशी स्थलांतरे होतात! विशेषतः मराठीसाठीचा देवनागरी लिपीचा वापर हा याला कमालीचे उत्तेजन देतो. आपण लिपी बदलू शकत नाही, पण किमान परप्रांतीयांशी बोलताना कुठली भाषा वापरायची याची निवड तरी करू शकतो.
आज जगातले बरेचसे व्यवहार आंग्ल भाषेतंच होतात हीदेखिल वस्तुस्थिती आहे. - विसोबा
- हे तरी आपण मान्य केलेत याबद्दल आपले आभार!
भारतातही सर्व महत्त्वपूर्ण - those that matter - असे व्यवहार इंग्रजीतच होतात हे वास्तवही का स्वीकारत नाही? दिल्लीत ज़ावून राहून पाहिले की तिथे इंग्रजी महत्त्वाची की हिंदी हे समज़ून येईलच!
हिंदीवाले प्रादेशिक हिंदीच्या प्रसाराच्या निमित्ताने प्रादेशिक भाषांना मारुन टाकण्याचे राजकारण करीत आहेत. आता त्यांचा डोळा मराठीवर आहे. हे ओळखून आपण इतर दक्षिणी राज्यांप्रमाणे हिंदीला विरोध केला पाहिजे.
दुसरे म्हणजे भाषिक मताधिक्याच्या जोरावर इतके वर्षे उत्तर भारतीयांनीच सर्व देशावर राज्य केले. नरसिंह रावांचा सन्माननीय अपवाद वगळता एकही पंतप्रधान दक्षिणेतील नाही. - विनायक
- दोन्ही मुद्दे कमालीचे महत्त्वाचे आहेत, आणि मला ते शंभर टक्के मान्य आहेत. म्हणून तर महाराष्ट्राला दाक्षिणात्य राज्यांच्या पंगतीला बसावे हा आग्रह!
माझ्या मूळ लेखाचा उद्देश हा अगस्तीमहोदय व विसोबापंत यांनी प्रातिनिधिकत्वाने मांडलेल्या मराठ्यांच्या पारंपरिक मतांचा परामर्श घेणे हाच होता.
आपले अवाज़वी हिंदीप्रेम हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्याचा (खरे तर दूर कुर्हाड पडली असताना मुद्दाम ज़ावून तिच्यावर पाय मारण्याचा!) प्रकार आहे, आणि आपण डोळ्यावर कातडे ओढून घेवून भावुकपणे हिंदीप्रेमाचे गळे काढले तरी हे वास्तव नाहीसे होणार नाही.
धन्यवाद,
मराठा