सहमत -
उद्या भारताचे तुकडे होवून सर्व राज्ये ज़र स्वतंत्र झाली, तर महाराष्ट्राची जाज्ज्वल्य दिल्लीनिष्ठा इतकी आहे, की आपण आपलेच नामकरण 'भारत' असे करून घेवू आणि दिल्लीतील ज़ो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्या पायी आपल्या निष्ठा विनाअट अर्पण करू!
महाराष्ट्रातील लोक कसे महाराष्ट्राबाहेर पडत नाहीत आणि उत्तर भारतीय लोक कसे शिकायला कुठेही ज़ातात, नोकरीसाठी फिरायला तयार असतात, म्हणून खूप कावकाव केली ज़ाते. पण याचे कारण हे की मराठी माणसाने महाराष्ट्रातच अशी व्यवस्था निर्माण केली आहे की त्यात तो प्रगती करू शकतो. आम्ही उत्तम शिक्षणसंस्था उभारल्या आहेत, उद्योगधंदे इथे यायला उत्सुक असतात, इथले सामाजिक व राजकीय वातावरण नवीन उद्योग उभारायला पोषक आहे त्यामुळे इथे कारखाने व सेवाउद्योग भरभराटीला येतात, इथे स्त्रियांना सन्मान मिळतो, त्या रस्त्यावरून एकट्या फिरू शकतात, संपत्तीचे कमालीचे विषम वाटप इथे नाही, सरंजामशाही नाही, मग आम्ही महाराष्ट्र सोडून कुठल्या तरी बुरसटलेल्या भागात ज़ायची गरज़च काय?
अर्थातच यात ढोंगीपणा काहीही न दाखवता, परप्रांतांत/परदेशांत राहाणाऱ्या मराठी लोकांनीही तेथील स्थानिक संस्कृतीचा आदर केला पाहिजे, तेथील भाषा शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हे ओघाने आलेच. कारण एकूणच स्थानिकांच्या असंतोषाला (backlash) आपण कारणीभूत होवू नये असे वागण्यात शहाणपणा, सुसंस्कृतपणा व ज़बाबदारपणा आहे.
असहमत -
उलट हिंदीचा पुरस्कार करून (म्हणजे नक्की काय करून ? महाराष्ट्रात आजही शिक्षणासाठी माध्यम मराठी नंतर इंग्रजीच आहे, शास्त्रशाखेसाठी तर निव्वळ इंग्रजीच आहे, आता इंग्रजी पहिली पासून आहे, माझ्या माहिती प्रमाणे फक्त उत्तर प्रदेशात शास्त्रीय विषय हिंदीत शिकता येतात, इथे शिक्षणाचा प्रगतीशी संबंध गृहीत धरला आहे.)उत्तर भारतीय हिंदीभाषक राज्यांच्या मागे वाहात ज़ाण्याने (म्हणजे काय ते समजले नाही) भारतातील एका मोठ्या विकसित राज्याचे नुकसान होणार आहे, आणि पर्यायाने ते भारताचेही नुकसान असणार आहे. (या पेक्षा अधिक नुकसान बिहारच्या अविकसितपणामुळे होतच आहेच, त्यात महाराष्ट्राच्या अशा वर्तनाने भरच पडणार नाही का? महाराष्ट्राने उद्या संविधानाच्या बाहेर जाऊन बिहारी माणसाला प्रवेश नाकारलाच तर त्याचा काय परिणाम होईल?) बिमारू राज्यांना उठते करण्यासाठी उपयोगी पडत आहे; उद्या महाराष्ट्रही आज़ारी पडला तर भारताचा एक कमावता सदस्य कमी होईल व नुसतीच खाती तोंडे वाढतील (महाराष्ट्राचे हिंदी प्रेम (सुबत्ता, स्थैर्य, मराठी माणसाचा स्वभाव नव्हे) हे एकच कारण या स्थलांतराला कारणीभूत आहे का?). त्यापेक्षा दक्षिण भारतीय राज्यांच्या मार्गाने ज़ाऊन महाराष्ट्र भारताला अधिक विकसित करण्यातच मदत करू शकेल. (हा मार्ग नक्की कोणता हिन्दी द्वेष की कार्यशीलता, सौजन्य, नैतिकता?)
उत्तर भारतीयांच्या नादाला लागून (समजले नाही)त्या गोष्टी (कोणत्या?) आज़च सोडून दिल्या, तर भारताला वाचवायला मग इंग्रजीभाषक व स्वभाषाभिमानी दाक्षिणात्य राज्येच फक्त शिल्लक राहातील!
तर अशा प्रकारे महाराष्ट्रात राहाणे हे हिंदीभाषकांना एकदम सोयीचे, सुखाचे असते. (असू नये काय? कोणत्याही भारतीयाला संविधानाने कुठेही जाऊन व्यवहार करण्याचा दिलेला हक्क, तुमच्या लिपीचे वा भाषेचे हिंदीचे साधर्म्य असतानाही, डावलण्यासाठी आपण कोणते डावपेच लढवायला हवेत असे आपल्याला वाटते? आपल्यापेक्षा प्रगत (मुंबई विसरायची ना?) असलेल्या गुजरात व पंजाब इत्यादी राज्यातील भाषा ह्या हिंदीशी अधिक साधर्म्य बाळगणाऱ्या आहेत तरी ही समस्या त्यांना न भेडसावण्याचे कारण काय?(आता पंजाबातही बिहारी वाढत आहेत असे ऐकून आहे, त्यावर उत्तर? अहो..पंजाबी/गुजराथी आता जगभर पोहोचत आहेत मग भल्लांचे कनेडा असो की पटेलांचे लंडन... आता बोला!)
थोडक्यात दोष भाषेचा नसून मानसिकतेचा आहे. कोणत्याही कामाबद्दल कमीपणा वाटून न घेता प्रामाणिकपणे काम करणे, उद्यमशीलता या गुणांची महाराष्ट्राला गरज आहे. भाषेचा पुरस्कार, आग्रह, दुराग्रह, द्वेष याचा परिणाम भाषेच्या विकासावर विस्तारावर होईल, 'निव्वळ असे केल्याने' प्रगती होईल हा भ्रम आहे.
हा विषय चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद.