नमस्कार!
बिहारसरकारची वागणूक निश्चितच चांगली नव्हती
- बिहार सरकारची नव्हे हो, केंद्र सरकारातील बिहारी मंत्रिमहोदयांची! (राज्य सरकारात रेल्वे खाते नसते! ;-) )
पण म्हणून तोडफोड हा मार्ग असु शकतो हे मला अजिबात मान्य नाही. हा अत्यंत असंस्कृत प्रकार असून नुकसान शेवटी आपलेच होते.
- ठीक आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, नुसत्या मार्गाला नावे ठेवा. हेतूला नको. किंबहुना त्या उद्देशाशी सहमती दाखवा. पण आपण मात्र मराठी लोकांच्यावर अन्याय होतो हे मान्य करायलाच नकार देतो, मग पुढे काय बोलणार?!
मी पटले म्हटले ते आपल्या उपायाला. पण तुम्ही म्हणता तसे खरेच घडते का? मला तरी असे घडलेले दिसत नाही.
- अर्थातच तसे सार्वत्रिक प्रमाणावर घडताना दिसत नाही. पण घडणे शक्य आहे आणि आवश्यक आहे.
आणि इथेच भाग येतो तो कृतीचा. काही तरी कृतीवाचून नुसती भूमिका, नुसते तत्त्वज्ञान काय उपयोगाचे? पण मुळात विचार पक्के असतील, तर कृती होईल अशी माझी (कदाचित बाळबोध) समज़ूत!
मी महाराष्ट्रात राहात होतो तेव्हा व्यक्तिश: खरेदी करताना जिथे दुकानदार माझ्याशी मराठीत बोलतो (किंवा नाइलाज़ असेल तर जिथे दुकानदार इंग्रजीत बोलतो) तेथेच ज़ात असे. ज़वळ आहे म्हणून हिंदी बोलणाऱ्या दुकानदाराकडे नाही. (माझा आक्षेप हिंदी असण्याला नव्हता, त्या लोकांच्या महाराष्ट्रात स्वतः राहूनही माझ्याशी हिंदी बोलण्याला होता. त्यामुळे मी ग्राहकांशी मराठी बोलणारा दुकानदार स्वतः हिंदी असला तरी त्याच्याकडे ज़ात असे.)
हॉटेलात वेटरशी सक्तीने मराठीतच बोलत असे. (हा आपला वीक पॉईंट असतो. बऱ्यापैकी हॉटेलात ज़ावून वेटरशी मराठीत बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते की काय कोण ज़ाणे! पण मी बहुतेक करून ही वागणूक सर्वत्र पाहिली आहे की गिर्हाइके हॉटेलात ज़ावून तेथील कर्मचाऱ्यांशी हिंदीतच बोलणे सुरू करतात! अगदी वेटर स्वतः मराठी बोलत असला तरीही!)
कॉलेजात असताना परप्रांतीय विद्यार्थ्यांशी इंग्रजीतच (आणि काहीकाहींना थोडे मराठी शिकवल्यावर क्वचित मराठीतही!) बोलत असे.
रेल्वेच्या तिकिटखिडक्यांमध्ये मराठी किंवा इंग्रजीच. हिंदी नाही.
(अर्थात हे सर्व वर्तन महाराष्ट्रात, मुंबईत नव्हे! कारण ती मराठी नाहीच!)
आणि आक्षेप हा परभाषिक लोकांनी येथे येण्याला नाहीच मुळी. आक्षेप आहे तो त्यांनी इथे येवून त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, प्रथापरंपरा आमच्यावर लादण्याला. त्यामुळे मग इथे एक-दोन पिढ्या राहिलेले सिंधी नाही तर पंजाबी किंवा मारवाडी/गुजराथी दुकानदार हे घरी काही का भाषा बोलेनात, त्यांनी गिऱ्हाइकांशी - म्हणजे माझ्याशी - मराठीत बोलले तर किमान ते आमच्या भाषेचा थोडा तरी स्वीकार करतायत इतके पुरे आहे. कारण यातूनच हळुहळू ते स्थानिकांत मिसळून ज़ातील. तसेच मग हिंदी लोक इथे स्थायिक होण्याच्या हेतूने आले तरी ठीक आहे, त्यांनी महाराष्ट्रात पूर्वीपासून राहिलेल्या स्थलांतरितांप्रमाणे इथल्या समाजाचा आदर करावा, आणि तो वर्तनातून दाखवावा. म्हणूनच मी दुकानदाराची भाषा कोणती हे न पाहाता तो ग्राहकांशी कोणत्या भाषेत बोलतो हे पाहात असे.
मला वाटते तो उपाय अमलात आणायचा असेल तर व्यक्तिगत स्तरावर अशी काही पावले उचलावी लागतील. त्यात कदाचित थोडे अधिक कष्ट असतील, खिशालाही थोडी अधिक चाट बसेल, पण ते आवश्यक आहे अशी माझी श्रद्धा आहे, आणि मराठीच्या व महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हितासाठी विचारी लोक तसे वागतील अशी मला खात्री आहे.
मराठा