मी_मराठी, तुमचे सर्व विचारांचे मूळ पटले.
महाराष्ट्र दक्षिण भारतातच गणत होते मी आजवर. तुमच्या लेखातून नव्याने लक्षात आलं की ही वस्तुस्थिती वेगळ्याने सांगावी लागत आहे! मी एक वाक्य कुठेसं वाचलेलं आठवतं की 'जसंजसं उत्तरेकडून दक्षिणेकडे जायला लागतो तसंतसं सौंदर्य कमीकमी होत जाऊन बुद्धीमत्ता वाढत जाते.' याबद्दलची सत्यासत्यता माहित नाही पण मला सार्थ अभिमान आहे की आपला महाराष्ट्र दक्षिण भारताचा भाग आहे.
कुठली भाषा 'राष्ट्रभाषा' असावी याबद्दल सर्व सुजाण नागरीकांचं एकमत असणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्यक्तीला जास्त आटापीटा न करता जवळची वाटू शकेल, सहज आत्मसात करता येऊ शकेल, उज्ज्वल भविष्य घडवायला हातभार लावू शकेल अशी भाषाच राष्ट्रभाषा असायला हवी. याबद्दल मी_मराठी म्हणतात त्याप्रमाणे इंग्रजीला जास्त मतं मिळाल्यास नवल असे काहीच नाही. पण ते म्हणतात त्याप्रमाणे आधी राष्ट्रभाषा मग मातृभाषा हा मुद्दा तितकासा पटत नाही. कुठलीही कागदपत्रं भरताना माझी लेखणी मराठी लिपीतच आधी वळते आणि गरज असल्यास हिंदी/इंग्रजीत आणि हा क्रम असाच असायला हवा असं वाटतं. म्हणजे आधी राज्यभाषा आणि मग राष्ट्रभाषा. जेणेकरून इथल्या सर्वसामान्य माणसालाही जीवनव्यापन करताना सुसह्य होईल.
इतर सर्व भाषांप्रमाणेच हिंदी/इंग्रजी या भाषांबद्दलही माझ्या मनात नितांत आदर आहे आणि प्रेमही.
महाराष्ट्र स्वागततत्पर आहे आणि तो तसा असावाच असं मला वाटतं. नविननविन लोकांनी इथे जरूर यावं, त्यांच्या संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी आपल्या संस्कृतीने आत्मसात करायचा प्रयत्न केला तर त्यात कोणीही हरकत घेऊ नये पण त्यांच्या कुठल्या नको त्या रुढींचा पगडा पडायला लागला तर त्याला ठाम विरोध करायला हवा. कर्वाचौथ जल्लोषात साजरा व्हावाच पण वटपौर्णिमा बंद न करता, होळी साजरी व्हावी पण रंगपंचमीचा रंगोत्सव भंग न करता असं वाटतं. नविन चांगल्या गोष्टी आत्मसात करायलाच हव्यात. त्यात कुठल्याही प्रकारची काटकसर असायला नको.
मराठी न बोलणाऱ्यांना वाळीत टाकण्याचा जो प्रकार वरती दिसला तो आवडला नाही. त्या लोकांची मनं मराठीकडे वळवण्यात खरी कसोटी आहे, असं मला वाटतं. नियम,कायदे करून कधीही कुठले प्रश्न सुटलेत असं वाटत नाही. मनात शिरूनच अशी कामं करावी लागतात तेव्हाच दूरगामी परिणाम हाती गवसतात असं माझं मत आहे. अर्थात साम-दाम-दंड-भेद मधला हा पहिला साम आहे, तो वापरल्याशिवाय इतर उपायांकडे वळू नये इतकाच माझ्या या निवेदनामागचा हेतू.