नमस्कार!

वरदाताई, आपण या समांतर चर्चेचा दुवा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी येथे नियमिततेने येत नसल्याने बरेचदा अशा महत्त्वाच्या चर्चा हुकतात.

त्या चर्चेचा वरील लेखांच्या संदर्भात आढावा मी येथे घेत आहे.

त्यातील निवडक वेचे खाली उद्धृत केले आहेत. मला वाटले तिथे त्यांसंदर्भात माझी स्पष्टीकरणेही दिली आहेत.

समांतर चर्चेतील विधाने फिकट काळ्या रंगात व समासात आहेत. स्पष्टीकरण देताना जिथे प्रस्तुत चर्चेतील निरनिराळ्या प्रतिसादांतीलच मुद्दे परत वापरले आहे तिथे त्यांची पार्श्वभूमी फिकट पिवळ्या रंगात रंगवलेली आहे. (चू. भू. द्या. घ्या. ह्या रंगाला पिवळा म्हणत नसल्यास कृपया मला मारू नका. मला बरेचदा रंगांधतेचा त्रास होतो. उदाहरणार्थ, मला भगवा, हिरवा, निळा, लाल असे 'कट्टर' रंग सामान्यत: सारखेच दिसतात!)

वरील समांतर चर्चा ही केवळ भाषा, स्वाभिमान आणि तिची उपयुक्तता आदी बाबींवर झालेली दिसते. परंतु माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे त्यात राजकारण, अर्थकारण असेही मुद्दे यायला हवेत, आणि मुख्य म्हणजे हिंदीच्या मुकाट स्वीकारातून आपल्या राज्याच्या सामाजिक पटलावर होणारे दुष्परिणाम, संस्कृतीवर होणारे विघातक परिणाम, भाषेवरील अतिक्रमण, पुरोगामीपणात येणारे अडथळे आदी बाबीही महाराष्ट्रासाठी व मराठीसाठी महत्त्वाच्या आहेत.

---------------------------------------------

'हिंदी' ही भारताची राष्ट्रभाषा(कागदोपत्री फक्त!),  - (राष्ट्रभाषा आणि मातृभाषाप्रेमी) अनु

त्यातल्या मराठी माणसाचे म्हणणे असे होते कि 'दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषाच समजत नाहीत.  - अनु

आंग्ल आणि माझी भाषाच येते फक्त' हे सांगताना त्याना 'देशाची राष्ट्रभाषा येत नाही' याची शरम नसून 'आम्ही आंग्ल भाषा उशापायथ्याशी ठेवून असतो सारखे' याचा अभिमान असतो.  - अनु

 - हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज़ व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही.

---------------------------------------------

मी आतापर्यंत वाचलेल्या ईतिहासात तरी 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा' हे शिकले. - अनु

 - आपण चुकीचे शिकलात. अधिक संदर्भांसाठी वरील चर्चेतील भोमेकाकांचा 'पहिली गोष्ट' हा आणि माझा 'प्रतिक्रिया - २' हा प्रतिसाद पाहा.

मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच आहे हे मी मूळ लेखात सांगितलेच आहे. (तो फक्त एक प्रचलित, लोकप्रिय, गोड शब्दप्रयोग आहे आणि दिल्लीकरांनी नेताजी, गांधीजी आदींची भाषणे, अवतरणे वापरून तो लोकप्रिय होईल याची पुरती खबरदारी घेतली आहे!) बाहेरून आधारासाठी काही उदाहरणे घेवून ती राष्ट्रभाषा नसल्याचे सिद्ध करायची काहीच आवश्यकता नाही आहे.

---------------------------------------------

अरे ज्या देशात दर आठवड्याला नविन हिंदी चित्रपट जन्माला येत असतात तिथे राहता,'क्योंकी सास भी कभी बहू थी' वगैरे सारख्या अनेक हिंदी मालिका पाहता, हिंदी नविन चित्रपटांच्या CD आणि DVD आणून पाहता आणि 'हिंदी अजिबात येत नाही आणि समजत नाही'??  - अनु

 - तमिळ, कन्नड, तेलगू चित्रपटसृष्ट्या या in their own right विकसित झालेल्या आहेत, आणि त्यांच्याकडे त्यांच्या भाषांतले 'स्टार' असतात. त्यांना हिंदी भाषेतील चित्रपट/मालिकांच्यापलीकडे करमणुकीचे विश्व आहे.

आणि करमणुकीच्या साधनांची ज़वळपास निम्म्या भारताची काही एक भाषा आहे म्हणून काय ती भाषा उर्वरितही भारताला यायलाच हवी? भाषेचा मुद्दा हा केवळ चित्रपट/मालिकांपुरता कधीपासून मर्यादित झाला?

---------------------------------------------

'दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषाच समजत नाहीत. जवळजवळ हिंदी भाषिक आहेत तितकेच जगात तामिळ भाषिक आहेत' - अनु

 - दाक्षिणात्यांनी (मराठ्यांनीही) फक्त हिंदीला राष्ट्रभाषा समज़ण्याचे काही एक कारण नाही. कारण सर्व मुख्य दाक्षिणात्य भाषाही राष्ट्रभाषाच आहेत!

- तमिळ भाषकांची संख्या हिंदी भाषकांइतकी आहे हे मात्र सत्य नाही. हिंदी मातृभाषा असणारे जगात सामान्यत: २० कोटी लोक असतील, तर तमिळ ज़वळपास ७ कोटी आहेत. (१९९१ चे आकडे. आता संख्या थोडी वाढली असेल.) तमिळ ही भारताची व श्रीलंकेची एक राष्ट्रभाषा आणि सिंगापोरची एक अधिकृत भाषा आहे. हिंदी ही फक्त भारताची एक राष्ट्रभाषा व अधिकृत भाषा आहे.

---------------------------------------------

वा!मराठी माणसाच्या पडखाऊपणाचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.तामिळ देशबंधू सगळीकडे फक्त साहेबाची भाषाच बोलतो आणि इतरांनी त्याच्याशी फक्त साहेबाच्याच भाषेत बोलावे ही अपेक्षा करतो, आणि त्याला पदराखाली घेणारा 'सहिष्णू' आणि 'समजूतदार' माणूस हा नेमका माझाच मातृभाषाबंधू मराठी माणूस. हा हंत हंत!! - अनु

 - हिंदी मनुष्य भारतभर फक्त त्याचीच भाषा बोलतो, आणि आपण ज्या प्रांतात राहातो तेथील भाषा शिकायची त्याला कधी इच्छा होत नाही, ना त्याला त्याबद्दल काडीची लाज़ वाटते! आणि त्याला पदराखाली घेणारा 'सहिष्णू' आणि 'समजूतदार' माणूस हा नेमका माझाच मातृभाषाबंधू मराठी माणूस. हा हंत हंत!!

महाराष्ट्र हा एकदम स्वागततत्पर असतो. तो प्रथम हिंदीतूनच बोलायला सुरुवात करतो. शिवाय देवनागरी लिपीही वापरतो. मग या थव्यांना त्यांची भाषा बदलायची किंवा इथल्या स्थानिक संस्कृतीत मिसळण्याची काहीच गरज़ नसते. उलट आपली संस्कृतीच त्यांना ठासून मांडता येते.

फार काय, अगदी महाराष्ट्रीय लोकही - ज़से विदर्भातले, नागपूरकडचे - हिंदीचाच वाढता वापर करतात तेव्हा ते 'पूर्वी मध्यप्रांतात होते' असे म्हणून आपण त्यांना 'समज़ून' घेतो! तिथल्या हिंदी लॉबीचे नेतृत्व असलेली स्वतंत्र विदर्भ चळवळ आपल्याला अहितकारी वाटत नाही!

---------------------------------------------

भले!! दाक्षिणात्य हिंदीला राष्ट्रभाषा मानत नाहीत. पण अ-राष्ट्रभाषा आणि अ-भारतीय  असलेली आंग्ल भाषा मात्र त्यांच्यासाठी अपरिहार्य! - अनु

हा लेख लिहीण्यामागचा माझा मूळ उद्देश 'हिंदीचा पुरस्कार' किंवा 'दाक्षिणात्यांनी हिंदी शिकावी' हा नसून 'आंग्ल भाषेचे पाय कामाव्यतिरिक्त शक्यतो धरु नका, जिथे शक्य असेल तिथे आणि तेव्हा भारतीय भाषेला प्राधान्य द्या' हा आहे - अनु

जेव्हा २ मराठी, २ तामिळ, २ बंगाली एकत्र येता तेव्हा एकमेकांशी बोलताना साहेबाची भाषा न वापरता दुसरी कोणतीतरी भाषा वापरा, आणि ही कोणतीतरी भाषा 'हिंदी', कारण ती चित्रपट आणि रेल्वे स्थानकावरील पाट्या आणि साबण नाट्य(मला 'सोप ऑपेरा'म्हणायचे आहे!!) यामधून सामाईक आहे.  - अनु

 - तमिळनाडू व नागालँडमधील लोकांना इंग्रजी ही ज़र परकी भाषा असेल तर हिंदी हीही तितकीच परकी आहे.

इंग्रजी ही भारतासाठी परकी भाषा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. (आणि मी इथे भारत म्हणून फक्त उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचा विचार मांडत नाही, तर दक्षिण व पूर्व भारताचाही समावेश करत आहे. अंदमान किंवा मिज़ोराम किंवा तमिळनाडू किंवा प. बंगाल यांच्यासाठी हिंदी अधिक परकी की इंग्रजी? हिंदी अधिक जुन्या परिचयाची की इंग्रजी?)

भारतासाठी एक व्यवहार करायला समाईक भाषा असणे गरज़ेचे आहेच. पण मग ती हिंदी का म्हणून? म्हणजे आधी हिंदी या समान पायावर सर्व राज्ये आणायची, त्यात एक अर्धे शतक घालवायचे, आणि मग जागतिक व्यवहारांना सोयीचे म्हणून इंग्रजीकडे वळायचे हा द्राविडी प्राणायाम कशाला? (इथे हा 'द्राविडी' प्राणायाम हा शब्द कसा विशेष मजा आणतो!) जी जागतिक व्यवहाराची आणि प्रगतीची भाषा इंग्रजी तिचाच आधीपासून स्वीकार का नको? आपण हिंदीचा पुरता स्वीकार करेपर्यंत स्पर्धात्मक जग काय स्वस्थ वाट पाहात बसणार आहे काय? तिकडे चीन आणि जपान इंग्रजीचा स्वीकार करत आहेत, युरोपियन युनियनने इंग्रजी स्वीकारली आहे आणि आपण मात्र आधी अख्ख्या भारतासाठी एक भाषेच्या बाता करत आहोत.

---------------------------------------------

इंग्रजाचे राज्य जाऊन ५० पेक्षा जास्त वर्षे उलटली, पण आजही मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आली नाही तरी चालेल, ती न येणारा आणि फक्त आंग्ल भाषा बोलणारा उच्चभ्रू, आणि आंग्ल भाषा परकी म्हणून ती नीट न येणारा एखादा भारतीय बंधू मात्र 'गावठी'(अ-मराठी लोकांच्या तोंडात असलेला प्रिय शब्द: 'घाटी'), हा कुठला न्याय आहे? - (राष्ट्रभाषा आणि मातृभाषाप्रेमी) अनु

 - हा एकदम अन्याय आहे हे मान्यच! पण तो सुधारायचा मार्ग हा तथाकथित राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा पुरस्कार करणे हा नसून मातृभाषेचा, स्थानिक भाषेचा ठाम पुरस्कार करून तिचा आदर वाढवणे हा आहे. (ज़ाता ज़ाता: अमराठी लोकांच्या, त्यातही विशेषत: हिंदी लोकांच्या, तोंडात असलेला प्रिय शब्द 'घाटी' हा मराठी माणसासाठी वापरला ज़ातो याची मी नम्र नोंद करू इच्छितो. हा शब्द भाषिक संदर्भात, मराठी भाषकांसाठी वापरला ज़ातो, गावठी म्हणून नव्हे! ज़से गुजराथी म्हणजे गुज्जू तेलगू म्हणजे गुल्ट, मलयाळी म्हणजे मल्लू, बंगाली म्हणजे बाँग तसे मराठी म्हणजे घाटी!)

याचे उत्तर साक्षरता वाढवून, स्थानिक भाषांचा कामकाज़ातील वापर वाढवून द्यायला हवे, अन्य कुठल्या तरी प्रांतांतील मिळून चाळीस टक्के लोक बोलू शकतात म्हणून एक परकी भाषा लादून नव्हे! इंग्रजी येवो अगर न येवो, हिंदी येवो अगर न येवो, शेतकऱ्यांना, मज़ुरांना त्यांच्या स्थानिक भाषेच्या वापरातच व्यवस्थित ज़गता यायला हवे.

आणि या दृष्टीने पावले उचलली ज़ात आहेतच. उदाहरणार्थ आता न्यायालयांतील कामकाज़ स्थानिक भाषांत चालावे यासाठी अनेक राज्यांत तरतुदी होत आहेत. (आधीही हे कामकाज़ फक्त इंग्रजीत चालत असे, हिंदीत नव्हे!)

ब्रिटिशांनी दीडशे वर्षे हिंदीला अधिकृत भाषा न बनवता, इंग्रजीचा व देशी भाषांचा वापर करून भारतावर राज्य केले, आणि बऱ्याच प्रमाणात चांगले व्यवस्थापन - administration - दिले.

---------------------------------------------

खरे म्हणजे हिंदी हीच एकमेव राष्ट्रभाषा असल्याचा डांगोरा पिटवला जात असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. मराठी, कन्नड, तामिळ सहित १५ भाषा ह्या राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रभाषा आहेत. - सुनील

 - एकदम बरोबर. आता २२ भाषा.

---------------------------------------------

'उत्तरप्रदेशातील लोकांची मातृभाषा हिंदी आहे. ते हिंदी व इंग्रजी या दोनच भाषा शिकतात. मग तमिळ लोकांना तीन भाषा शिकण्याची सक्ती का?' असा निरुत्तर करणारा प्रश्न मला माझ्या एका तमिळ रूपाने विचारला होता.  - मृदुला

आपले राज्य सोडून इतरत्र जावे लागले की त्या त्या राज्याची भाषा शिकणे क्रमप्राप्त होणे हे केवळ दाक्षिणात्य राज्यांव्यतिरिक्त इरतत्र फारसे लागू होत नाही, ह्याचे कारण हिंदीचा मध्य व उत्तर भारतात झालेला प्रादुर्भाव. ह्याचे फायदे असले तरी तोटेही आहेत. ह्याच प्रादुर्भावामुळे मूळ हिंदी भाषिकांचा 'आम्हास इतर राज्यीय भाषा शिकण्याची आवश्यकता नाही' असा (गैर)समज झाला आहे.  - वरदा

आणि मुख्य म्हणजे, दुसरी कुठलिही भाषा न शिकण्याचा दुराग्रह फ़क्त हिंदी भाषिकांतच आढळतो. - सुनील

 - अगदी बरोबर बोललात सुनीलराव. म्हणून तर त्यांना दाक्षिणात्य राज्यांत स्थलांतर करणे आवडत नाही. त्याऐवजी महाराष्ट्र सोयीचा.

आज़ त्रिभाषासूत्री स्वीकारली ज़ावून इतकी वर्षे झाले, केंद्रीय/नवोदय विद्यालये वगळता किती हिंदी राज्यांनी अन्य तिसरी भाषा शिकवायला घेतली आहे?

हिंदी ही हिंदीभाषकांना गैरवाज़वी फायदा - undue advantage - देते असा अहिंदीभाषक राज्यांचा दावा आहे. त्यामुळे सर्वच भारतीयांना समान पायावर आणण्यासाठी म्हणून इंग्रजी ही अधिकृत भाषा हवी असा त्यांचा आग्रह आहे.

---------------------------------------------

हिंदी भाषेविषयी कन्नडा, तेलुगु आणि मलयाळम लोकांची मानसिकता तितकीशी वाईट नाही. - प्रवासी

 - हे एक कमालीचे loaded विधान आहे. (दुर्दैवाने मला यासाठी मराठी शब्द सुचत नाहीय.) 'वाईट मानसिकता'?! सहमती न घेता लादलेली हिंदी मुकाट्याने स्वीकारत नाहीत म्हणून 'वाईट मानसिकता?'

---------------------------------------------

ब्रिटिशांनी शिकवलेला चुकीचा इतिहास, भाषेचे राजकारण आणि तमिळ लोकांमधे असलेला उपजत सर्वंकष दुराभिमान ह्यामुळे काही तमिळ भाषिकांना हिंदीविषयी तिटकारा निर्माण झाला आहे.  - (सर्वभाषाप्रेमी) प्रवासी

 - भाषेचे राजकारण? गेल्या अठ्ठावन्न वर्षांत केवळ दोन पंतप्रधान द. भारतीय (आणि तेही बरेचसे नाईलाज़ानेच!), बाकीचे सर्व उत्तरेकडचे, बहुतांश सर्व हिंदीभाषक, आणि तमिळ भाषिकांचे भाषेचे राजकारण?!

आणि 'उपजत सर्वंकष दुराभिमान'? प्रवासी महोदय, तमिळांचे मातृभाषेविषयीचे प्रचंड प्रेम हे हिंदी भाषेच्या तेथील प्रसारास अडथळा आणते म्हणून तमिळ लोक 'दुराभिमानी'?!

---------------------------------------------

नोकरीला लागल्यावर माझा पहिला 'नेता' (पीएल) कानडी-तेलुगू होता. मला इंग्रजी बोलता येत नव्हते! त्याला हिंदी येत नव्हते. तो हळूहळू माझे ऐकून हिंदी शिकला. (मी मात्र सरळ इंग्लंडला येऊनच इंग्रजी बोलायला शिकले.)  - मृदुला

आजही मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आली नाही तरी चालेल, ती न येणारा आणि फक्त आंग्ल भाषा बोलणारा उच्चभ्रू, आणि आंग्ल भाषा परकी म्हणून ती नीट न येणारा एखादा भारतीय बंधू मात्र 'गावठी'(अ-मराठी लोकांच्या तोंडात असलेला प्रिय शब्द: 'घाटी'), हा कुठला न्याय आहे? - (राष्ट्रभाषा आणि मातृभाषाप्रेमी) अनु

 - हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी मांडायचा विसरलो होतो!

जनहो, हे स्वीकारा, हे मान्य करा - आपण मराठी लोक परप्रांतीयांशी बोलताना हिंदीचा आग्रह धरतो, त्यांच्याशी बोलताना आपली भाषेची पहिली निवड हिंदी असते कारण आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही! हिंदी बोलणे आपल्याला तिच्याशी चित्रपटादींतून होणाऱ्या संपर्कामुळे सोपे जाते. इंग्रजीविषयी आपल्या मनात कुठे तरी एक न्यूनगंड असतो! आपण बरोबर बोलू की नाही अशी भीती असते. (दाक्षिणात्यांना तशी असत नाही! ते अन्य भाषिकांशी बिनधास्त इंग्रजीतून बोलतात!)

मराठी लोक हिंदीचा प्रथम वापर करतात, कारण त्यांना इंग्रजीची नकळत भीती असते, तिचे आपले अज्ञान झाकणे त्यांना सोयीचे वाटते!

त्यामुळे मग जे आपल्याशी इंग्रजीतून बोलू इच्छितात अशा भारतीय बंधूंवर आपण 'साहेबाचे गुलाम' असल्याचा आरोप करतो, 'राष्ट्रविरोधी' असल्याचा आरोप करतो, त्यांची मानसिकता 'वाईट' असल्याचा, ते 'दुराभिमानी' असल्याचा उद्धार करतो! त्यातून आपली आपल्या इंग्रजीविषयीच्या भयाशी मुकाबला करण्यातून सुटका होते, आणि वर आपण 'राष्ट्रभाषाप्रेमी' म्हणून मिरवता येते!

(येथे कुठलाही व्यक्तिगत संदर्भ अपेक्षित नाही. मृदुलाला उत्तम इंग्रजी येते हे मला माहिती आहे. परंतु त्यांच्या या विधानांनी फक्त मला या मुद्द्याची आठवण झाली.)

पण लोकहो, या भयातून सुटका ही अशी पळून ज़ावून होणार नाही. उद्याच्या आपल्या आयुष्यात प्रगतीसाठी, जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी हवी ती इंग्रजी. हिंदी नव्हे! तेव्हा द्वितीय भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार, पुरस्कार करा, हिंदीचा नव्हे. अन्य प्रांतीय लोकांशी महाराष्ट्रात बोलतानाही प्रथम मराठीचा आणि दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करा. याच प्रकारे आपण इंग्रजीचा अधिक उपयोग करून त्यात प्रावीण्य मिळवू शकतो.

---------------------------------------------

'आंग्लभाषा बोलणारे उच्च लोक' हा समज महाराष्ट्रातही तितकाच आहे असे मला वाटते.  - मृदुला

 - सहमत

---------------------------------------------

तमिळ लोक किमान स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगतात. आपल्या लोकांना मराठी बोलायचं म्हणजे 'किती बॅकवर्ड फील होतं ना!' - मृदुला

 - पूर्ण मान्य! तमिळांनी हिंदी झिडकारली व इंग्रजी स्वीकारली तरी मातृभाषेला दुय्यम दर्जा दिला नाही. आपल्याला नक्की काय करावे हा प्रश्न अज़ून सुटत नाही. इकडे 'राष्ट्रभाषा' हिंदी, तिकडे 'ज्ञानभाषा' व 'जागतिक' भाषा इंग्रजी, आणि आणखी एकीकडे मातृभाषा मराठी, यांमधून आपल्याला धड प्राधान्ये ठरवता येत नाहीत. दुभंग व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आपण इकडून तिकडे उड्या मारत आहोत.

यातून सुटका हवी असेल तर तमिळांचा मार्ग अनुसरा!

---------------------------------------------

एक स्वकीय भाषा राष्ट्रभाषा असणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येच्या सत्तर ऐंशी टक्के (त्यातही निरक्षरतेचे प्रमाण अधिक) असलेल्या हिंदीभाषिक लोकांनी तमिळ शिकण्यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या पाचदहा टक्के असलेल्या हुशार तमिळ लोकांनी हिंदी शिकणे सोपे आहे. - (सोयीस्कर) प्रवासी

 - प्रवासीमहोदय, आपण आधी आपली लाडकी मते ठरवून मग त्यांच्या समर्थनासाठी संदर्भ/तथ्ये/वास्तव शोधता की तथ्ये/वास्तव यांवर विचार करून मग त्यांवर आधारित मते बनवता?

ज़र दुसरी गोष्ट करत असाल, तर येथे, अधिकृत संकेतस्थळावर, भारताच्या शिरगणतीतील भाषाविषयक नोंदी  पाहा. यानुसार हिंदीच्या सर्व बोलीभाषा (ज्यात मैथिली, भोजपुरी वगैरे स्वतंत्र भाषाही येतात - उदा. मैथिली भाषा ही संविधानातील एक निराळी अनुसूचित (शेड्युल्ड) भाषा आहे.) एकत्र विचारात घेतल्या, तरी हिंदीभाषिकांची एकूण संख्या खच्चून ४०% भरते!

आणि या अन्य एका स्थळावर  पाहा. निव्वळ हिंदी भाषक घेतले तर ते १८ कोटी (१९९१ ची शिरगणती) भरतात. म्हणजे २० टक्केही नव्हे!

आता आपले 'सोयीस्कर' मत व उपाय बदलणार का?!

---------------------------------------------

देशाची म्हणून अशी एक भाषा असावी हे ही योग्यच. अनेक भाषा बोलल्या जाणार्‍या देशामधे 'जास्त प्रमाणात' बोलली जाणारी भाषा ही राष्ट्रभाषा ठरावी ह्यात गैर ते काही नाही.  - वरदा

 - गैर आहे. कारण भारताच्या संदर्भात एकच 'राष्ट्रभाषा' किंवा 'अधिकृत भाषा' ठरवणे हा मुद्दा केवळ जागतिक भाषा ठरवण्यासारखा आहे. इंग्रजीचा जागतिक भाषा म्हणून स्वीकार हा काही ती एकच भाषा कुणी लादल्याने झालेला नाही. तो व्यवहारात सर्वांना काय सोयीचे वाटले त्यानुसार झाला आहे. (संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषा आहेत. तिथेही सदस्य राष्ट्रप्रतिनिधी त्यांच्या आवडीच्या भाषेत बोलू शकतात, अधिकृत भाषांची सक्ती नाही! तरीही बहुतांश राष्ट्रे इंग्रजीत संवाद साधणे सोयीचे मानतात!) इंग्रजांच्या साम्राज्यविस्तारासोबतच, इंग्रजी भाषेच्या लवचिकपणामुळे, तिच्या प्रवाहीपणामुळे, तिच्यातील ज्ञानाच्या प्रचंड भांडारामुळे अगदी पूर्वी ब्रिटीश वसाहती नसलेल्या देशांनीही जागतिक संवादासाठी इंग्रजीचा स्वीकार केला आहे. त्यामध्ये निव्वळ व्यावहारिक शहाणपणा आहे.

बहुसंख्येचा युक्तिवाद हा इथे लागू करणे योग्य नाही. उद्या अशाच हिशोबाने भारताचा हिंदू हा राष्ट्रीय धर्म बनवा असेही म्हणाल!

---------------------------------------------

हिंदीच्या कच्छपी लागून आपण मराठीला गौण केले आहे. मुंबईत दोन मराठी लोक हटकून हिंदीत बोलतात.  - वृकोदर

मराठी न येणार्‍या माणसाचे मुंबईमधे काडीमात्र अडत नाही.  - वरदा

 - एकदम बरोबर.

फार काय, मराठी न येणाऱ्या, परंतु हिंदी येणाऱ्या माणसाचे महाराष्ट्रातील बहुतांश सर्व शहरांत अडत नाही!

---------------------------------------------

आज आंग्ल ही ज्ञानभाषा झाली आहे, आणि ती जरूर शिकावी, परंतु त्यासाठी मराठी बोलणार्‍यास कनिष्ठ समजण्याचे काहीच कारण नाही. आंग्ल माध्यमातून शालेय शिक्षण झालेल्यांना मराठी नीत लिहिता-वाचता येत नाहीच, परंतु त्याबद्दल वैषम्यही न वाटणे ही माझ्या दृष्टीने गंभीर बाब आहे.  - वरदा

 - पूर्ण सहमत!

---------------------------------------------

शालेय शिक्षण मराठीतून होऊनही महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीतून झाल्यावर इंग्रजीचा प्रभाव एवढा होतो की साध्या साध्या शब्दांसाठीही आंग्ल प्रतिशब्द वापरले जातात. - वरदा

 - हे साधारणत: सहज़ उठून दिसते, पण हिंदी भाषेचा आपल्यावर पडत असलेला पगडा दिसत नाही! साध्यासाध्या शब्दांसाठी हिंदी शब्द वापरले ज़ातात, हिंदी रचना वापरल्या ज़ातात. (सुनीलरावांनी त्यांच्या प्रतिसादांत योग्य उदाहरणे दिली आहेत.)

अगस्तीमहोदय, 'संपन्न' हिंदीमध्ये ज़री इंग्रजीचे भाषांतर करून पूर्वोत्तर किंवा 'उत्तर-पूर्व' असा शब्द आला असला, तरी मराठीत त्यासाठी 'ईशान्य' असा शब्द आहे बरे का! तसेच हिंदीत 'दर्शक' असले, तरी मराठीत 'श्रोते' आणि 'प्रेक्षक' असे दोन निराळे शब्द आहेत; हिंदीत भारतीय जनता 'पार्टी' असली, तरी मराठीत 'पक्ष' आहे, हिंदीत 'जी' असले, तरी मराठीत राव, साहेब, पंत आहेत!

'पूर्व'/'भूतपूर्व' राज्यपाल हा खास आकाशवाणी/दूरदर्शन यांचा हिंदी शब्द आहे! मराठीत 'माजी' हा शब्द आहे का?

आज दूरदर्शनव मराठी भाषेचे हिंदीकरण जोरात चालू आहे. - विनायक

---------------------------------------------

चीन,जपान,जर्मनी, इटली,स्वीडन सर्व आपापल्या भाषा धरुन आहेत आणि कामासाठी आणि आवश्यक तितकीच आंग्ल भाषा वापरतात आणि बाकी ठिकाणी त्यांची स्वत:ची भाषा. भारताला जो अनेक भाषांचा प्रश्न आहे तो या देशाना नाही. एक मुख्य भाषा ही प्रत्येक देशात जास्त प्रमाणात आहे त्यामुळे तिला बोलीभाषा बनवणे त्यांच्यासाठी सोपे आहे. भारताला अनेक प्रांतिय भाषा असल्याने 'कोणती भाषा समाईक' हे ठरवणे कठीण आहे पण हिंदी निदान कागदोपत्री तरी समाईक भाषा म्हटली जाते. - अनु

गेले पन्नास वर्षे हिंदीला राष्ट्रभाषा करायचा प्रयोग केला गेला आहे. पण तो साफ फसला आहे. - वृकोदर

 - सहमत!

तमिळनाडू, कर्नाटक अशी राज्ये व ईशान्य भारत नजीकच्या कित्येक वर्षांत हिंदी स्वीकारणार नाहीत हे स्पष्ट आहे. दक्षिण भारताची आर्थिक प्रगती ही भारतातील (महाराष्ट्र वगळता) अन्य राज्यांच्या तुलनेत नेत्रदीपक आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रानेच एकट्याने हिंदीचा पुरस्कार करून बिहार, म.प्र., राजस्थान, उ.प्र. अशा बिमारू हिंदीभाषक राज्यांच्या मार्गाला ज़ायचे आहे की कर्नाटक, तमिळनाडू, आं.प्र अशा विकसनशील राज्यांप्रमाणे स्वभाषा व इंग्रजी यांचा पुरस्कार करून स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण करून, दिल्लीच्या दारातले कुत्रे व्हायचे नाकारून जागतिक दर्जाचा विकास साधायचा आहे हा प्रश्नही उद्भवता कामा नये.

---------------------------------------------

मराठी लोकांनी आपल्या भाषेला दुय्यम स्थान स्वीकारुन हिंदीचा पुरस्कार केला पण त्याने मराठीचेच नुकसान झाले आहे.  - वृकोदर

 - पूर्ण सहमत!

आम्ही हिंदी राष्ट्रभाषा म्हणुन मान्य केली अन मराठीला दुय्यम मानले. (आज आमच्यात सुद्धा मराठीला तुच्छ लेखणारे अनेक आहेत.) आंग्ल भाषेला आम्ही जास्त जवळ केले नाही. पण आता जेव्हा गरज भासते आहे तेव्हा हे तामिळ लोक अधिच तिथे जाउन आमच्यावर पावशेर ठेउ पाहतात.  - चाणक्य

 - त्यात त्यांचे काहीच चूक नाही! आपण गाढव आहोत!

मागास लोकांच्या आपण मागे लागलो आणि आपल्या गळ्यात एक लोढणे बांधून घेतले आहे!

---------------------------------------------

माझ्या मते आपणही तमिळ व तेलगु लोकांप्रमाणे आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा. आणि पोटापाण्याकरिता इंग्रजी शिकावे.
 - वृकोदर

 - एकदम बरोबर!

महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे.

---------------------------------------------

मी हिंदीचा तिटकारा करत नाही. पण माझ्यामते ती वर्गात शिकणे सक्तीचे असू नये. वर्गात शिकलेल्या हिंदीचा काहीही उपयोग नाही. कुणाला हौस असेल तर त्याने ती शिकावी पण सक्तीने नाही.  - वृकोदर

- मला वाटते की मुद्दा केवळ हिंदी शाळेत शिकण्याचा नाही. त्याहून मोठा आहे. तसेही महाराष्ट्रात केवळ तीनच वर्षे (पाचवी ते सातवी) सक्तीचे हिंदी शिकावे लागते. त्यापुढे हवी ती भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहेच.

---------------------------------------------

हिंदी भाषेतले साहित्य, विज्ञान, संस्कृती ही अन्य प्रादेशिक भाषांच्या तोडीचीच आहे. इंग्रजीप्रमाणे त्यात ज्ञानाचा महासागर वगैरे आजिबात नाही. तेव्हा त्या दृष्टीनेही हिंदीचा काही फायदा नाही.  - वृकोदर

 - मराठीसह अन्य काही प्रादेशिक भाषांशी हिंदीची तुलना होवू शकत नाही. त्या भाषा या सर्व बाबींत हिंदीपेक्षा बऱ्याच अधिक समृद्ध आहेत! हिंदीला अज़ून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे!

---------------------------------------------

एकेकाळी हिंदीच्या तोडीस तोड सिनेमे बनवणारे आपण मराठी आज सिनेमाच्या बाबतीत दयनीय स्थितीत आहोत. - वृकोदर

मराठी माणुस यात नेहमीच मागे पडतो. त्याला अस्मितेचा फ़ारसा फ़रक पडत नाही. पण दाक्षिणात्य तसे नाहीत. त्यांनी कोणावर अवलंबुन न राहता स्वत:चे बरेच काहि उभे केले. चित्रपट हे एक त्यातले उदाहरण. - चाणक्य

 - अस्मिता? मराठी अस्मिता? आता तिचे श्राद्ध करायला लागेल!

आपण म्हणजे राष्ट्रप्रेमाचा उमाळा अति झालेले लोक! हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उदोउदो दिल्लीतही होत नाही तितका महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होतो.

आपल्याकडे 'माय मरो पण मावशी ज़गो' अशी म्हण! त्यामुळे मायमराठी मेली तरी चालेल, पण आपली मावशी 'राष्ट्रभाषा' हिंदी ज़गली पाहिजे यासाठी आटापीटा! तिच्याविरुद्ध ज़रा कोणी काही शब्द काढले की तो 'राष्ट्रविरोधी' आणि मराठी वाचवण्यासाठी कुणी आवाज़ चढवला की तो 'पुराणमतवादी', 'ढोंगी', 'प्रादेशिकतावादी', 'फुटिरतावादी'!

आपले अवाज़वी हिंदीप्रेम हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्याचा (खरे तर दूर कुर्हाड पडली असताना मुद्दाम ज़ावून तिच्यावर पाय मारण्याचा!) प्रकार आहे, आणि आपण डोळ्यावर कातडे ओढून घेवून भावुकपणे हिंदीप्रेमाचे गळे काढले तरी हे वास्तव नाहीसे होणार नाही.

---------------------------------------------

दुसरे म्हणजे हिंदीचा आग्रह म्हणजे उत्तरेच्या दक्षिणेवरील आक्रमणाचा एक भाग आहे हे दाक्षिणात्यांनी चाणाक्षपणे ओळखले आहे, हे आपणही ओळखून हिंदीबद्दलचा अभिनिवेष सोडावा.  - विनायक

 - सहमत

---------------------------------------------

आपण उत्तरेवरील आक्रमणात दाक्षिणात्यांची साथ दिली पाहिजे, कारण आपली सांस्कृतिक नाळ दक्षिणेशी जोडली आहे‌. - विनायक

- दाक्षिणात्य लोकांनीही त्यांची संस्कृती आणली, परंतु ती महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीच्या प्रकृतीशी काही थोडीफार तरी ज़ुळणारी, प्रगतिशील, पुरोगामी व सहिष्णू होती.

---------------------------------------------

शिवाजी लुटारू असल्याचे फक्त उत्तरेत शिकवतात, दक्षिणेत हिंदूंचा तारणहार असल्याचे शिकवतात. - विनायक.

 - एकदम बरोबर. शिवाजीसह मराठ्यांची प्रतिमा केवळ दरोडेखोर, लुटारू अशा प्रकारची उत्तरेत आहे - गरज़ूंनी दिल्लीतील ऐतिहासिक स्थलदर्शनाच्या वेळी तेथील मार्गदर्शकांचे साह्य घेवून हे तपासून पाहावे! (आणि ती तशी बनवण्यात पंडितजींचेही मोठे योगदान आहे!)

बाकी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य ज़री स्थापले असले तरी अन्य धर्मांबाबतचा त्यांचा दृष्टीकोण कमालीचा आदर्श, उदार व सहिष्णू होता. त्यांच्या सैन्यात, व्यवस्थापनात मुस्लिम लोकही कसे होते याविषयी इतिहासात पुरेसे लिहिले गेले आहेच. त्यांनी मुस्लिमांचा कधी द्वेष केला नाही. मुस्लिम राज्यकर्ते हे त्यांचे शत्रू होते त्याचे कारण त्या राज्यकर्त्यांच्या अमलाखाली स्वराज्य मिळत नव्हते, ते राज्यकर्ते अन्यायी, जुलमी होते हे आहे, ते राज्यकर्ते मुस्लिम होते हे नव्हे! अर्थात महाराजांमुळे हिंदू धर्म वाचायला बरीच मदत झाली हे खरे.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, तेव्हा गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी सख्य केले. 'दख्खन दख्खन्यांचा' ही भूमिका प्रथम आचरणात आणली ती शिवरायांनी! आम्ही त्यांचे ढोंगी पाईक, ती भूमिका कधीचे विसरलो!

---------------------------------------------

मी एकदा संत बनुन माझ्या एक तमिळ सहकार्‍याला जर्मनीला जायला मार्ग मोकळा करुन दिला. या लोकांचा हा अनुभव माहित असल्याने (माझ्या कामाच्या ठिकाणी हे अनेक लोक एकत्र असल्याने असे अनेक अनुभव आले होते) तो सहकारी तिकडे गेल्यावर मी मुद्दाम होउन हिंदी वा काहि वेळा जर्मन भाषेत व्यवहार केला. त्याने खुप खटाटोप केला पण मी बरेचदा हिंदी चा ठेका सोडला नाही. - चाणक्य

 - हे फारच आगाऊ (कुचकेपणाचे?) वागणे झाले ना?!

ज़ो अ-हिंदी मनुष्य आपल्या भूमीत (= महाराष्ट्रात) नाही, त्याने अ-हिंदी माणसाशी हिंदीतूनच व्यवहार करावा हा असा अट्टाहास का?!

---------------------------------------------

अनेक तमिळ लोक साहेबाच्या (आम्ही त्यांना आजही साहेब मानत नाही) भाषेला जवळ करुन साहेबाच्या जवळ जाउन आंतरराष्ट्रिय वर्तुळात पुढे आहेत अन आम्ही मागे. कारण ज्ञानाची जगाची भाषा आंग्ल आहे - चाणक्य

- जी जागतिक व्यवहाराची आणि प्रगतीची भाषा इंग्रजी तिचाच आधीपासून स्वीकार का नको? आपण हिंदीचा पुरता स्वीकार करेपर्यंत स्पर्धात्मक जग काय स्वस्थ वाट पाहात बसणार आहे काय? तिकडे चीन आणि जपान इंग्रजीचा स्वीकार करत आहेत, युरोपियन युनियनने इंग्रजी स्वीकारली आहे आणि आपण मात्र आधी अख्ख्या भारतासाठी एक भाषेच्या बाता करत आहोत.

भारतातही सर्व महत्त्वपूर्ण - those that matter - असे व्यवहार इंग्रजीतच होतात हे वास्तवही का स्वीकारत नाही? दिल्लीत ज़ावून राहून पाहिले की तिथे इंग्रजी महत्त्वाची की हिंदी हे समज़ून येईलच!

---------------------------------------------

घरी मातृभाषा न बोलणे हा कोणता मोठेपणा आहे कोणास ठाउक? पण त्यातुन नाती सुद्ध कृत्रीम बनतात. - चाणक्य

 - पूर्ण सहमत! (पण उद्या 'ग्लोबलाईज़्ड' जगात द्वैभाषिक विवाहांचे प्रमाण वाढेल तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर बनणार आहेच! आज़ही विशेषतः महानगरांत अशा प्रकारच्या कुटुंबांतील मुलांना ना धड आईची भाषा येते ना वडिलांची. मग इंग्रजी हीच त्यांची भाषा बनल्यास आश्चर्य ते काय?!)

---------------------------------------------

उलट परप्रांतीय लोक ४/६ महिन्यात मराठीतून बोलू लागल्याचे अनुभवले आहे.  - मृदुला

स्वानुभव असा अहे कि फ़क्त तमिळ लोक एवढे टोकाची भुमिका घेणारे असतात. कन्नड, मल्याळी वा तेलगु लोक पटकन मिसळुन घेतात वा जातात. माझ्या बरोबर माझे अनेक कन्नड मित्र मराठी बोलतात वा शिकण्याची इच्छा व्यक्त करतात. - चाणक्य

 - पण असे हिंदी लोक का बरे करत नाहीत? मुंबई पुण्यात स्थलांतरित झालेले हिंदी लोक मात्र मराठी का बोलत नाहीत? (त्यांना ती इतरांनी बोललेली समज़त असले तरीही स्वतः या 'घाटी' भाषेत बोलायचा मात्र तिटकारा!)

पूर्वीची जी स्थलांतरे झाली, त्यांतून आलेले लोक हे स्थानिक संस्कृतीविषयी काही किमान आदर बाळगणारे होते, तिच्यात सामावून ज़ाण्याचा प्रयत्न करणारे होते. (बटाट्याच्या चाळीतली दक्षिण भारतीय पात्रे परकी का वाटत नाहीत त्याचे हे कारण आहे.)

---------------------------------------------

मुख्य म्हणजे आपण भारताच्या मधल्या भागातले आहोत. हिंदी आणि दाक्षिणात्य लोकांना जोडणारे. अन मधला कधी होउ नये - इति - व. पु. काळे. - चाणक्य

 - आपण दाक्षिणात्यच आहोत, मधले नव्हेच!

यासाठीच मी 'महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे.' असे विधान केले होते. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर नुसते ओझ्याचा बैल अशी भूमिका बजावावी न लागता स्वतःला assert करता येईल. दक्षिण भारतीय राज्ये ज्याप्रमाणे स्वभाषाप्रेमादर दाखवतात, तसाच आपण दाखवणे हे अत्यावश्यक आहेच.

---------------------------------------------

युरोपमध्ये देश छोटे आहेत पण अनेक देशांनी आपली राष्ट्रभाषा जपली आहे. ते आंग्ल भाषा अभावानेच बोलतात. तरिही ते आपला देश, देशाभिमान टिकवुन आहेत आणि एकता (युरोपियन युनियन). आपण थोडे तसेच आहोत. पण आपण राज्याभिमान बाळगत नाही. भविष्यात कदाचित आपण यु एस आय असु? - चाणक्य

 - आम्ही भारतीय आधी, आणि मराठी नंतर! - उद्या भारताचे तुकडे होवून सर्व राज्ये ज़र स्वतंत्र झाली, तर महाराष्ट्राची जाज्ज्वल्य दिल्लीनिष्ठा इतकी आहे, की आपण आपलेच नामकरण 'भारत' असे करून घेवू आणि दिल्लीतील ज़ो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्या पायी आपल्या निष्ठा विनाअट अर्पण करू!

---------------------------------------------

आज मनोगत आणि मनोगती आहेत म्हणुन आपण मराठी चांगली टिकवुन आहे. - चाणक्य

 - आपण मराठी चांगली टिकवून आहोत की नाही याविषयी शंका आहे, पण मनोगताचे त्यासाठी उत्तम योगदान होईल/होते आहे यात शंका नाही.

Let thousand such Manogats bloom!

---------------------------------------------

पण एक अजून चांगली गोष्ट की महाराष्ट्र मंडळ मात्र जोरदार आहे. कार्यक्रम होत राहतात. काही दिवस आधी 'श्वास' दाखवला. ईथे एक देऊळ आहे. तळ्घरात मोठ्ठा हॉल आहे, तीथेच दाखवला. मग मस्त जेवणाचा कार्यक्रम होता. सांगण्याचे तात्पर्य हे की मराठी लोकं अजूनही मराठी व हिंदी चा आदर करतात!! तामीळ लोकं कधीच ती पातळी गाठू शकत नाही.  - फ़ुल्टू अमोल

 - हाहाहा! किती हा भाबडेपणा!

तमिळ लोकांनी तमिळ भाषेचा आदर करण्यात, तिच्यावर प्रेम करण्यात जी पातळी गाठली आहे तिथे पोचण्यात मराठी लोकांना अज़ून बराच काळ आहे. ते ती कधी गाठू शकतील की नाही याविषयी शंकाच आहे!

बाकी हिंदी भाषेबाबत मात्र वरील विधान बरोबर आहे. हिंदी भाषेच्या प्रेमादराबाबत मराठी लोकांनी जी पातळी गाठली आहे, तिथे कदाचित खुद्द हिंदीभाषकही पोचले नसतील!

---------------------------------------------

त्यामुळे काही वेळेस मराठीचा लाभ होणार असेल हिंदी ही आणि नसेल तर हिंदी भी असे म्हणायला पाहिजे. - द्वारकानाथ

'हिंदी ही' हा माझा आग्रह नाही. 'हिंदी भी' का नको? हा साधा प्रश्न आहे.  - अनु

 - पहिला आग्रह ('हिंदी ही') फार तर मराठी माणसे मानतील, तमिळ, मलयाळी किंवा तेलगू लोक ऐकणे शक्यच नाही! त्यांच्यासाठी हिंदीच्या आधी मातृभाषा व इंग्रजी येतात! त्यामुळे 'हिंदी ही' हा त्यांच्यासाठी पर्यायच नव्हे!

मराठीसाठी 'हिंदी भी' हे घातक ठरले आहे म्हणून 'हिंदी भी'सुद्धा नको. ते कसे घातक ठरले आहे हे वरील सर्व चर्चेत स्पष्ट केलेच आहे.

---------------------------------------------

हिंदी आणि मराठी भाषेतील लिपीचे साधर्म्य चा जास्तीत वापर करुन घ्यावा लागेल. तत्रंज्ञान आणि विज्ञानात याचा लाभ होवु शकतो. - द्वारकानाथ

 - याविषयी शंका आहे.

लिपीच्या साधर्म्यामुळे मराठीला तंत्रज्ञानातही बरेचदा दुय्यम भूमिका घ्यावी लागली आहे.

उदाहरणार्थ:

१) सध्या अनेक मोबाईल हँडसेट उत्पादक कंपन्या भारतीय भाषांत चालणारे संच बाज़ारात आणत आहेत. त्यांतील किती संचांत मराठी ही निराळी भाषा म्हणून दाखवली ज़ाते? माझ्या माहितीप्रमाणे एकाही नाही. हिंदीतील मेनू हाच मराठी मेनू म्हणून खपवला ज़ातो.

२) अनेक मार्केटिंग कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रथम मर्यादित चाचण्या (test launches) करतात. या चाचण्या भारतात भाषिक राज्यांत - म्हणजे सामान्यत: दक्षिण भारतातील एखाद्या राज्यात किंवा प. बंगालात होतात. त्याचे कारण तेथील भाषिक सीमा स्पष्ट असतात, प्रादेशिक प्रसारमाध्यमे (media) विकसित आहेत, त्यामुळे जाहिरातींचा खर्च नियंत्रित करता येतो (हिंदी/इंग्रजी वाहिन्या या खूप महाग असतात), आणि मुख्य म्हणजे चाचण्यांचे निकाल मोज़णे सोपे होते. पण हे महाराष्ट्रात - ते भाषिक राज्य असूनही - केले ज़ात नाही. कारणे? - अ) महाराष्ट्रात मराठी वाहिन्यांपेक्षा हिंदी वाहिन्या अधिक पाहिल्या ज़ातात. आणि ब) महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्येपर्यंत पोचायचे तर नुसत्या मराठी वाहिन्यांचा वापर पुरेसा नाही, विशेषत: मुंबईत हिंदीभाषक बरेच घुसलेले असल्याने हिंदी वाहिन्यांचाही वापर करावा लागतो!

ही दोन उदाहरणे मराठीला हिंदीमुळे, समान लिपीमुळे कसा तोटा होतो हे दाखवायला पुरेशी आहेत.

---------------------------------------------

परन्तु सारभुत सांगायचे म्हणजे, व्यक्तिगत अनुभवातुन आपले दिर्घकालीन काहीतरी धोरण निर्माण झाले पाहिजे.
व्यक्ति म्हणुन आपल्या मर्यादा लक्षात घेता, शासनाने या कडे बघितले पाहिजे असे मला वाटते. - द्वारकानाथ

 - शासन काही करणार नाही, त्याने काही करायची अपेक्षा योग्य नाही, त्याने काही करायची गरज़ही नाही.

व्यक्ती म्हणून किमान या मुद्द्यासंदर्भात तरी आपल्याकडे कमालीची ताकद आहे.

आपण महाराष्ट्रात असताना सर्वांशी फक्त मराठीभाषेतच व्यवहार केला, आणि जिथे ते अशक्य (ज़से की परदेशी लोक, फिरत्या नोकरीवर असलेले परप्रांतीय लोक, दोनचार वर्षांपुरतेच इथे आलेले लोक अशांशी बोलताना) त्या ठिकाणी इंग्रजीचा वापर केला, ज़े या भाषांचा वापर न करता हिंदीचा हट्ट धरतात त्यांच्याशी व्यवहार टाळले (ज़से की ग्राहकांशी हिंदीतून बोलणाऱ्या लोकांच्या दुकानांत न ज़ाणे, हिंदी बोलणारे वेटर असणाऱ्या हॉटेलांत न ज़ाणे, मराठी बोलणारा रिक्षाचालक असेल तरच ती रिक्षा घेणे, मराठी बोलणारेच सुतार, प्लंबर, रंगारी इ. लोक बोलावणे) आणि हे धोरण ठामपणे अमलात आणले तर बरेच काही साध्य होवू शकेल!

इथे हिंदी भाषक लोकांवर बहिष्कार टाकणे हा उद्देश नाही. पण ते ज़र महाराष्ट्रात राहात असतील, तर त्यांनी मराठ्यांशी मराठीतून बोलावे हा हट्ट आहे. ते ज़ोवर तसे बोलतील, तोवर त्यांनी इथे येण्याला/राहाण्याला विरोधाचे कारण नाही.

---------------------------------------------

अमुक भाषाच फक्त शिका, असे म्हणणे अजिबात नाही. जितक्या जास्तीत जास्त भाषा शिकता येतील तितक्या शिका, पण बहुभाषिय मेळाव्यात भारतीय भाषांचा वापर करा(अरे बापरे, हे वाक्य मी जास्त वेळा लिहीलं वाटतं!!) हे मत व्यक्त करण्यासाठी हा लेख लिहीला आहे.  - अनु

 - सहमत!

---------------------------------------------

सर्वसाक्षी, 'किधर है यार' म्हणणारे लोक मुंबईत मिळत असतील बहुधा; मी आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या ज्या छोट्या शहरांत राहिले आहे, तिथे कुणीच मला अशी सढळ हिंदी वापरताना आढळले नाही.  - मृदुला

 - कुणी म्हणेल हे फक्त पुणे, मुंबई, नाशिक इथले चित्र आहे, अन्यत्र नाही. - तर लक्षात घ्या, आधी ते फक्त मुंबईत होते, आता इतर शहरांत पसरते आहे. जसे जसे हिंदी भाषक अन्य शहरांत घुसत ज़ातील तसे तसे अन्यत्रही हे वाढेल!

हिंदी कशी क्रमाक्रमाने मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांतून मराठीला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करत आहे आणि मराठीला केवळ खाज़गी आयुष्याच्या वर्तुळात सीमित करत आहे हे ज़र आपल्याला अनुभवास आले नसेल, तर आश्चर्य आहे! हल्ली पुण्यात टिळक आणि शास्त्री रोडवरील दुकानदारही हिंदीत बोलतात (स्टेशनपासचा परिसर तर कधीचाच हातचा गेला!), उद्या बाजीराव रोडवरही हे झाले तर आश्चर्य वाटू नये. (गरज़ूंनी टिळक स्मारकशेज़ारच्या दुकानांत ज़ावून खात्री करून घ्यावी!)

---------------------------------------------

धन्यवाद!

मराठा

ता.क. या चर्चासूत्रांतील अन्य प्रतिसादांवर प्रतिक्रिया (- ३!) वेळ मिळाल्यावर देईन!