आपण मराठी लोक परप्रांतीयांशी बोलताना हिंदीचा आग्रह धरतो, त्यांच्याशी बोलताना आपली भाषेची पहिली निवड हिंदी असते कारण आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही!

हे अगदी पटले. माझे स्वतःचेच उदाहरण आहे. मला मनातल्या मनात मराठीतून इंग्रजीत भाषांतर करण्यापेक्षा ते हिंदीत करणे सोपे वाटत असे. त्याची सवय होऊन मी अमराठी लोकांशी हटकून हिंदीत बोलत असे. सुरुवातीला इथल्या इंग्रजी (, फ्रेंच, स्पॅनिश इ इ) सहकाऱ्यांशीही मी हिंदीत बोलायला सुरुवात करत असे!

हिंदी-मराठीत काही शब्द सारखे असल्याने, किंवा बेधडक मराठी / संस्कृत शब्द घुसडता येत असल्याने असावे. दाक्षिणात्य लोक असेच त्यांचे शब्द 'बेधडक' इंग्रजीत घुसडतात, वाक्प्रचारांचीही भाषांतरे करतात आणि मजेत बोलतात. मला वाटते, 'प्रवाह किमान रोधाच्या मार्गाने जातो' या नियमाने, हिंदी व इंग्रजीपैकी जी सोपी वाटते ती भाषा वापरली जात असावी. दाक्षिणात्यांना दोन्ही भाषा कदाचित तितक्याच अवघड वाटल्या असाव्यात व त्यातून त्यांनी फायद्याची ती इंग्रजी स्वीकारली असावी.

असो. मराठीचे हिंदीकरण होऊ नये आणि त्याही पुढे जाऊन मराठी संस्कृतीचे उत्तरीकरण होऊ नये या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे.