नमस्ते!
फारच सुरस व मुद्देसूद चर्चा! पारंपरिक शहाणपणाला आव्हान देवून यशस्वीरीत्या विचारबदल साधणारी! (पण स्वतःच्या inertiaवर मात करून ते विचार आचरणात किती लोक आणतील यावर तिचे खरे यश अवलंबून!)
वरील चर्चेतील मराठाभाऊच्या बहुतांश विधानांशी सहमत!
खाली त्यांच्या विविध प्रतिसादांतील विधाने एकत्र केली आहेत आणि एकाच संदर्भात एकामागोमाग एक मांडली आहेत:
---------------------------------------------------------
महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे.
आपण महाराष्ट्रात असताना सर्वांशी फक्त मराठीभाषेतच व्यवहार केला, आणि जिथे ते अशक्य (ज़से की परदेशी लोक, फिरत्या नोकरीवर असलेले परप्रांतीय लोक, दोनचार वर्षांपुरतेच इथे आलेले लोक अशांशी बोलताना) त्या ठिकाणी इंग्रजीचा वापर केला, ज़े या भाषांचा वापर न करता हिंदीचा हट्ट धरतात त्यांच्याशी व्यवहार टाळले (ज़से की ग्राहकांशी हिंदीतून बोलणाऱ्या लोकांच्या दुकानांत न ज़ाणे, हिंदी बोलणारे वेटर असणाऱ्या हॉटेलांत न ज़ाणे, मराठी बोलणारा रिक्षाचालक असेल तरच ती रिक्षा घेणे, मराठी बोलणारेच सुतार, प्लंबर, रंगारी इ. लोक बोलावणे) आणि हे धोरण ठामपणे अमलात आणले तर बरेच काही साध्य होवू शकेल!
इथे हिंदी भाषक लोकांवर बहिष्कार टाकणे हा उद्देश नाही. पण ते ज़र महाराष्ट्रात राहात असतील, तर त्यांनी मराठ्यांशी मराठीतून बोलावे हा हट्ट आहे. ते ज़ोवर तसे बोलतील, तोवर त्यांनी इथे येण्याला/राहाण्याला विरोधाचे कारण नाही.
एकदा आपले - म्हणजे मराठ्यांचे - आर्थिक/व्यावसायिक हितसंबंध अशा हिंदीभाषक बांधवांसमवेत गुंतले, की नंतर मग या विचारांची अंमलबजावणी करणे कठीण, किंबहुना अशक्य आहे. आज़ मुंबईतल्या मराठी माणसाला मराठी अस्मितेचा झेंडा अभिमानाने खांद्यावर घेवून मिरवायला सांगणे बरेच कठीण जाते, कारण आज़ त्याला तिथल्या उत्तम ज़गण्यासाठी त्याचे तिथले हितसंबंध राखावे लागतात, आणि आता ते हिंदीभाषक लोकांसोबत गुंतलेले आहेत. तीच स्थिती नागपूरची. तशी पाळी उर्वरित महाराष्ट्रावर येण्याच्या आत आपण वेगाने धावपळ करणे गरज़ेचे आहे.
---------------------------------------------------------
हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज़ व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही.
तमिळनाडू व नागालँडमधील लोकांना इंग्रजी ही ज़र परकी भाषा असेल तर हिंदी हीही तितकीच परकी आहे.... अंदमान किंवा मिज़ोराम किंवा तमिळनाडू किंवा प. बंगाल यांच्यासाठी हिंदी अधिक परकी की इंग्रजी? हिंदी अधिक जुन्या परिचयाची की इंग्रजी?
(हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याबाबत) बहुसंख्येचा युक्तिवाद हा इथे लागू करणे योग्य नाही. उद्या अशाच हिशोबाने भारताचा हिंदू हा राष्ट्रीय धर्म बनवा असेही म्हणाल!
महाराष्ट्रासाठी हिंदीला प्रेमाने आलिंगन देत राहाणे हे ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच तोट्याचे ठरत आले आहे.
शिवाजीमहाराज, थोरले बाजीराव, लोकमान्य आणि थोड्याफार प्रमाणात शरद पवार सोडले, तर आमचे सगळे नेते हे शाहू महाराज (सातारचे) किंवा यशवंतरावांच्या पठडीतलेच - दिल्लीपती म्हणजे वैकुंठापतीचा अवतार मानणारे!
दाक्षिणात्य लोकांनीही त्यांची संस्कृती आणली, परंतु ती महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीच्या प्रकृतीशी काही थोडीफार तरी ज़ुळणारी, प्रगतिशील, पुरोगामी व सहिष्णू होती. मुख्य म्हणजे पूर्वीची जी स्थलांतरे झाली, त्यांतून आलेले लोक हे स्थानिक संस्कृतीविषयी काही किमान आदर बाळगणारे होते, तिच्यात सामावून ज़ाण्याचा प्रयत्न करणारे होते. (बटाट्याच्या चाळीतली दक्षिण भारतीय पात्रे परकी का वाटत नाहीत त्याचे हे कारण आहे.)
हिंदी प्रांतांतील लोकांची संस्कृती ही लाठीची आहे. कायद्याविषयी, व्यवस्थेविषयी तुच्छता, पुराणमतवाद, समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील आपल्या खालच्या पायऱ्यांवरील लोकांवर अन्याय करण्याचा हक्क इ. तिची वैशिष्ट्ये आहेत.... तर या अशा मागासलेपणामागची एक संस्कृती हिंदी लोकांच्या प्रभावासोबत महाराष्ट्रात आणली ज़ाते.
महाराष्ट्रात ठोकळ सुबत्ता व स्थैर्य हे भारतातील अन्य बहुतेक राज्यांपेक्षा अधिक आहे, आणि ते मराठी माणसाने निर्माण केले आहे, परक्यांनी नव्हे!
मराठी माणसाने महाराष्ट्रातच अशी व्यवस्था निर्माण केली आहे की त्यात तो प्रगती करू शकतो... मग आम्ही महाराष्ट्र सोडून कुठल्या तरी बुरसटलेल्या भागात ज़ायची गरज़च काय?...जेव्हा गरज़ भासली तेव्हा ती मराठी माणसाला स्वतःला भासली, इतरांनी त्याला उपदेश करायची गरज़ पडली नाही. अमेरिकेत काय किंवा बेंगलोर, हैद्राबादेत काय नव्या अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांत कामे करण्यासाठी ज़ाताना मराठी माणसाने कांकू केले नाही.
परप्रांतांत/परदेशांत राहाणाऱ्या मराठी लोकांनीही तेथील स्थानिक संस्कृतीचा आदर केला पाहिजे, तेथील भाषा शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे... एकूणच स्थानिकांच्या असंतोषाला (backlash) आपण कारणीभूत होवू नये असे वागण्यात शहाणपणा, सुसंस्कृतपणा व ज़बाबदारपणा आहे.
हिंदी मनुष्य भारतभर फक्त त्याचीच भाषा बोलतो, आणि आपण ज्या प्रांतात राहातो तेथील भाषा शिकायची त्याला कधी इच्छा होत नाही, ना त्याला त्याबद्दल काडीची लाज़ वाटते!
कुणी म्हणेल हे फक्त पुणे, मुंबई, नाशिक इथले चित्र आहे, अन्यत्र नाही. - तर लक्षात घ्या, आधी ते फक्त मुंबईत होते, आता इतर शहरांत पसरते आहे. जसे जसे हिंदी भाषक अन्य शहरांत घुसत ज़ातील तसे तसे अन्यत्रही हे वाढेल!
---------------------------------------------------------
भारतासाठी एक व्यवहार करायला समाईक भाषा असणे गरज़ेचे आहेच. पण मग ती हिंदी का म्हणून? म्हणजे आधी हिंदी या समान पायावर सर्व राज्ये आणायची, त्यात एक अर्धे शतक घालवायचे, आणि मग जागतिक व्यवहारांना सोयीचे म्हणून इंग्रजीकडे वळायचे हा द्राविडी प्राणायाम कशाला? जी जागतिक व्यवहाराची आणि प्रगतीची भाषा इंग्रजी तिचाच आधीपासून स्वीकार का नको? आपण हिंदीचा पुरता स्वीकार करेपर्यंत स्पर्धात्मक जग काय स्वस्थ वाट पाहात बसणार आहे काय?
---------------------------------------------------------
इंग्रजीविषयी आपल्या मनात कुठे तरी एक न्यूनगंड असतो! आपण बरोबर बोलू की नाही अशी भीती असते. (दाक्षिणात्यांना तशी असत नाही! ते अन्य भाषिकांशी बिनधास्त इंग्रजीतून बोलतात!) मराठी लोक हिंदीचा प्रथम वापर करतात, कारण त्यांना इंग्रजीची नकळत भीती असते, तिचे आपले अज्ञान झाकणे त्यांना सोयीचे वाटते!
या भयातून सुटका ही अशी पळून ज़ावून होणार नाही. उद्याच्या आपल्या आयुष्यात प्रगतीसाठी, जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी हवी ती इंग्रजी. हिंदी नव्हे! तेव्हा द्वितीय भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार, पुरस्कार करा, हिंदीचा नव्हे. अन्य प्रांतीय लोकांशी महाराष्ट्रात बोलतानाही प्रथम मराठीचा आणि दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करा. याच प्रकारे आपण इंग्रजीचा अधिक उपयोग करून त्यात प्रावीण्य मिळवू शकतो.
---------------------------------------------------------
हा (म्हणजे केवळ मराठी येणाऱ्याला हलके लेखणे आणि इंग्रजी बोलणाऱ्याला आदर मिळणे) एकदम अन्याय आहे हे मान्यच! पण तो सुधारायचा मार्ग हा तथाकथित राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा पुरस्कार करणे हा नसून मातृभाषेचा, स्थानिक भाषेचा ठाम पुरस्कार करून तिचा आदर वाढवणे हा आहे. ... याचे उत्तर साक्षरता वाढवून, स्थानिक भाषांचा कामकाज़ातील वापर वाढवून द्यायला हवे, अन्य कुठल्या तरी प्रांतांतील मिळून चाळीस टक्के लोक बोलू शकतात म्हणून एक परकी भाषा लादून नव्हे! इंग्रजी येवो अगर न येवो, हिंदी येवो अगर न येवो, शेतकऱ्यांना, मज़ुरांना त्यांच्या स्थानिक भाषेच्या वापरातच व्यवस्थित ज़गता यायला हवे.
---------------------------------------------------------
गुजराथेत मुस्लिम समाजही महाराष्ट्राप्रमाणे हिंदी/उर्दू बोलत नाही, तर गुजराथीच बोलतो. हेच केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल इथेही खरे आहे. फक्त आंध्र व महाराष्ट्रातच तेवढे नाही!
शिवाजीसह मराठ्यांची प्रतिमा केवळ दरोडेखोर, लुटारू अशा प्रकारची उत्तरेत आहे - गरज़ूंनी दिल्लीतील ऐतिहासिक स्थलदर्शनाच्या वेळी तेथील मार्गदर्शकांचे साह्य घेवून हे तपासून पाहावे! (आणि ती तशी बनवण्यात पंडितजींचेही मोठे योगदान आहे!)
बाकी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य ज़री स्थापले असले तरी अन्य धर्मांबाबतचा त्यांचा दृष्टीकोण कमालीचा आदर्श, उदार व सहिष्णू होता. त्यांच्या सैन्यात, व्यवस्थापनात मुस्लिम लोकही कसे होते याविषयी इतिहासात पुरेसे लिहिले गेले आहेच. त्यांनी मुस्लिमांचा कधी द्वेष केला नाही. मुस्लिम राज्यकर्ते हे त्यांचे शत्रू होते त्याचे कारण त्या राज्यकर्त्यांच्या अमलाखाली स्वराज्य मिळत नव्हते, ते राज्यकर्ते अन्यायी, जुलमी होते हे आहे, ते राज्यकर्ते मुस्लिम होते हे नव्हे! अर्थात महाराजांमुळे हिंदू धर्म वाचायला बरीच मदत झाली हे खरे.
त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, तेव्हा गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी सख्य केले. 'दख्खन दख्खन्यांचा' ही भूमिका प्रथम आचरणात आणली ती शिवरायांनी! आम्ही त्यांचे ढोंगी पाईक, ती भूमिका कधीचे विसरलो!
(माझी टिप्पणी - मराठाभाऊ, शिवाजी = हिंदुत्ववादी अशा लोकप्रिय परंतु अनैतिहासिक व हलक्या (cheap) सापळ्यात स्वतःला अडकू न दिल्याबद्दल आपले विशेष कौतुक, आभार व अभिनंदन! शिवाजीचा लढा होता तो सामान्यांच्या कल्याणासाठी. त्यातील हिंदू धर्माची छटा ही फक्त incidental होती, त्या काळच्या त्याच्याभोवतालच्या परिस्थितीला आवश्यक होती. तिथे मुस्लिमांच्या ऐवजी हिंदू राज्यकर्ते असते, तरी शिवरायाने स्वराज्यासाठी लढा दिलाच असता! किंबहुना त्यांच्या हयातीत त्यांनी जितक्या लढाया मुस्लिमांशी केल्या, त्याहून अधिक त्यांना हिंदूंशी कराव्या लागल्या!)
भाषेमध्ये धर्माचा प्रश्न मिसळला की विनाकारण, नसती, अनाठायी गुंतागुंत निर्माण होते....
हिंदुसंस्कृती अशी काही एकजिनसी संस्कृती अस्तित्वात आहे असे मानायचे असेल, तर मग भारतातील विविधतांचा आदर करणे वगैरे कचऱ्यातच जाते. आसिंधुसिंधुहिंदुएकता वगैरे म्हणायचे असेल तर भारताच्या वास्तवाकडे आपण सोयीस्कर व स्वप्नील दुर्लक्ष करत आहोत!...
भारताचे स्वरूपच असे आहे की इथे अमुक एकच भाषा, धर्म, संस्कृती असा हट्ट धरणे म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये खीळ घालणे आहे. त्यापेक्षा आहेत त्या विभिन्नतांसह एकत्र राहाणे हे हितावह आहे.
बरे ज़री धर्माचा विचार घेतला, तर आज़ किती मुस्लिम राष्ट्रे अरेबिक (अथवा पर्शियन) बोलतात किंवा किती क्रिश्चन राष्ट्रे लॅटिन (अथवा इंग्रजी) बोलतात? त्यांच्या धर्मावर किंवा धार्मिकतेवर त्याचा काय दुष्परिणाम झाला आहे?
---------------------------------------------------------
आमचा हिंदी भाषेवर बिलकूलच राग नाही, ना इंग्रजीवर!
पण भाषेचा अतिरेकी स्वीकार केल्याने ज़र महाराष्ट्राच्या संस्कृतीचा व प्रगतीच मूळ गाभा ज़र धोक्यात येत असेल, तर तशी भाषा टाळणे अत्यावश्यक आहे. आणि हा प्रश्न हिंदीबाबतच संभवतो, इंग्रजीबाबत नाही. तमिळनाडूत फक्त तमिळचा आग्रह होतो आणि परभाषिकसंपर्कासाठी इंग्रजीचा स्वीकार/पुरस्कार होतो म्हणून काही तिथे इंग्रजी/अमेरिकन लोक गठ्ठ्याने स्थलांतरे करत नाहीत! महाराष्ट्रात हिंदीप्रेम अती असल्याने महाराष्ट्रात मात्र हिंद्यांची अशी स्थलांतरे होतात! विशेषतः मराठीसाठीचा देवनागरी लिपीचा वापर हा याला कमालीचे उत्तेजन देतो. आपण लिपी बदलू शकत नाही, पण किमान परप्रांतीयांशी बोलताना कुठली भाषा वापरायची याची निवड तरी करू शकतो.
---------------------------------------------------------
फैज़