भाषसाहेब,

प्रश्न शेपूट घालण्याचा नाही हो! (मला शेपूट आहे, हे मान्य करूनसुद्धा! :-) )

आपण म्हणता त्याप्रमाणे पठ्ठे, बहाद्दर वगैरे शब्द मला (माहीत असूनसुद्धा) चटकन आठवले नाहीत, हे कबूल. आपल्या पिढीमध्ये (आपली पिढी म्हणजे कोणती याचा अंदाज मी आपल्या व्यक्तिरेखेवरून बांधत आहे) किंवा कदाचित त्याच्या आधीच्या पिढीमध्ये हे शब्द सर्वसामान्य चलनात होते. माझ्या पिढीमध्ये (म्हणजे आज चाळिशीच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तिगटात) किंवा कदाचित आपल्याही पिढीमध्ये (मला नक्की माहीत नाही, तेव्हा चूभूद्याघ्या.) हे शब्द तितकेसे वापरात नसले, तरीसुद्धा ऐकिवात होते - कदाचित वडीलधाऱ्या मंडळींच्या तोंडून ऐकल्यामुळे किंवा जुन्या वाङ्मयातून वाचल्यामुळे असेल, परंतु माहीत होते. (आणि कदाचित म्हणूनच ते प्रचलित आहेत असा मला भास झाला.) आजच्या तरुण पिढीला हे शब्द कितीसे माहीत आहेत याबद्दल शंका आहे, आणि म्हणून हे शब्द लुप्त / नामशेष होत आहेत, हे आपले म्हणणे तंतोतंत पटले.

मात्र हे शब्द "ब्राव्हो" म्हणत राहिल्याने लुप्त होत आहेत, असे मला वाटत नाही. कारण "ब्राव्हो" हा शब्द तरी आजकाल आपण कितीसा ऐकतो? मला वाटते, काळाच्या ओघात इतर शब्दांप्रमाणेच हे शब्द नैसर्गिक मरणाने चलनबाह्य झाले, परंतु त्यांची जागा नवीन शब्दांनी घेतली नाही. (किमानपक्षी घेतली असल्यास मला - या क्षणी तरी - कल्पना नाही.)

आता हे शब्द परत रूढ करण्याबद्दल म्हणाल, तर आपण म्हटल्याप्रमाणे या शब्दांचा वापर पुन्हा सुरू करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आपण (म्हणजे आपण व मी, वैयक्तिकरीत्या) आपल्या परीने निश्चितच करू शकतो. (विशेषतः या शब्दांच्या जागी नैसर्गिकरीत्या दुसरे कोणतेच मराठी शब्द न आल्याने गरज असेल तेव्हा या शब्दांचा वापर करण्यात काहीही कृत्रिम किंवा गैर आहे असे मलातरी वाटत नाही.) आणि तो प्रयत्न आपण करूयाच. परंतु आपल्या हातात केवळ प्रयत्न करणे आहे. या शब्दांचा पुनःस्वीकार करायचा की नाही, की त्या जागी नवीन शब्द आणायचे, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी जनतेच्या हातात आहे. आपण हे शब्द वापरू या. कदाचित आपले पाहून इतर शंभरजण हे शब्द वापरू लागले, तर हे शब्द परत रूढ होतीलही. किंवा नाही झाले तर दुसरे येतील. (किंवा कदाचित येणारही नाहीत.) समाजाच्या गरजेनुसार जे काही व्हायचे असेल ते होईल (आणि ते योग्य आहे, असे मलातरी वाटते.), एवढेच माझे म्हणणे आहे. यात कोठे शेपूट घातली जात आहे असे मलातरी वाटत नाही.

कलोअ.

- टग्या.