आपण सगळे ह्या विषयात रस घेत आहात हे पाहून बरे वाटले. ह्या विषयावर लिहिण्याचे मनात आले तेव्हा मी संभ्रमात होतो. पण मंदारने सांगितले की लिहाच. कुणी नाही वाचले तरी मी वाचेनच.

विनायक,
आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय लिहितांना काही गोष्टी सांगत गेलात. त्याने ती अधिकच भावू लागली होती. संतांच्या लिखाणाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून कसे पाहायचे हे मी आपल्याकडूनच शिकलो.

राधिका,

वैखरी, पश्यंती, परा अभिजात साहित्याच्या बाबतीत वाचल्यासारखं वाटतं. इथे त्यांचा काय अर्थ अपेक्षित आहे ते सांगाल का?

मला अभिजात साहित्याच्या बाबतीत असे काही येते हे माहित नाही.
नामजपाच्या बाबतीत सांगायचे तर..
वैखरी वाणी म्हणजे आपण नामाचा उच्चार करायचा आणि तो कानाने ऐकायचा किंवा जीभेच्या हालचालीकडे लक्ष देवून राहायचे.
मग नाम आपल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेत नाम घेतांना जीभ हालचाल करत नाही. पण कंठपेठीमध्ये स्फुरण किंवा स्पंदन होत असलेले कळते.
मध्यमेत स्थिर झालेले नाम अंतःकरण व्यापते. त्याला मनन आणि निदिध्यासन असेही म्हणतात. ह्यात रमणारा साधक इंद्रियांच्या क्षुद्र आनंदात सुख पहात नाही. त्याचे विकार नकळत क्षीण होत जातात.
येथवरच सामान्य साधक स्वप्रयत्नाने जावू शकतो. परा वाणी शब्दांत सांगणे कठीण आहे. तो अनुभव दिव्यच असतो. "शाब्दे परेच निष्णांत" सद्गुरूच तो अनुभव देवू शकतात. पहिल्या तिघांत जरी साधकाला स्थिर होता आले तर पुढला भार घेण्यास सद्गुरु समर्थ आहेत.      " द्वारकेचा राणा पांडवाघरी"(म्हणजे सद्गुरू) यायला तयारच असतात.
आमचे सद्गुरू आम्हाला सुरुवातीला एकाच जागी बसून २० मिनिटे वैखरी वाणीत जप करायला सांगत असत. प्रामाणिकपणे हे करत राहिलो तर सद्गुरू ते जाणतात आणि पुढील साधना आणि मार्ग स्वतःच साधकाला दाखवतात. पुढला मार्ग हा अनुभवण्याचाच आहे. तेथे शब्दसंपत्ती काही कामाची नाही.
तुझ्यासारखीला हे कठीण जावू नये.
 धन्यवाद!