गणपती-दुर्वासुर यांची लढाई, त्यातून गणपतीच्या अंगाची लाहीलाही होणे व तीपासून सुटका मिळण्यास्तव गणपतीला वाहिलेल्या दुर्वा ! ह्या गोष्टीयोगे सांगण्यात येतं की गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असतात आणि कमीतकमी २१ दुर्वांची जुडी किंवा २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा अशा जुड्यांची माळ गणपतीला वाहण्यात यावी.
पुर्वीच्या काळी निसर्गोपचार वापरला जायचा निरनिराळ्या रोगांच्या उपचारार्थ. दुर्वा ही एक अनमोल औषधी आहे आणि विविध छोट्यामोठ्या आजारांवर रामबाण उपाय आहे. कायमस्वरुपी अशी औषधी घरात असावी, हा या रुढीमागचा मुख्य हेतू असावा.
गणेशोत्सव ऐन पावसाळ्यात येतो. यावेळेस सगळीकडे भरपूर तण माजतं. गणपतीला वहायचं म्हणून एकेक दुर्वा खुडत माळावर बसणं कोण करणार? सगळं तण काढून घरी आणून त्यातून दुर्वा शोधल्या जातात. अनायासे स्वच्छतामोहीम म्हणून सांगितल्यास जेवढे तण काढले जाणार नाही तेवढं २१ दुर्वांच्या २१ जुड्या बनवायच्या म्हटलं की काढलं जायचं.
आताशा या दोन्हीही गोष्टी ( दुर्वेचा औषधी गुण माहित असणे व दुर्वांची जुडी करण्यासाठी तण काढलं जाणे ) दिसत नाहीत. गणपतीला दुर्वा वाहण्यात मग तितकंसं तथ्य नाही असं म्हणायचं का?
( मी तज्ज्ञ नाही त्यामुळे माझ्याकडून इथे काही सांगण्यात चुका झाल्यास जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.)