सुवर्णमयी,

लाल कांदेच वापरावेत.
कांद्याच्या तळताना चार अवस्था असतात.
कच्चेः तेलात अजून ते पांढरेच दिसतात. त्यात अजून कांद्याचा रस असतो (जो गोडसर असतो). त्या मुळे अशा कांद्याची ग्रेव्ही गोडसर होते.

हलके गुलाबीः कच्चे कांदे अजून पुढे तळत राहिल्यास त्यातील रस आटत जाऊन ते शिजतात आणि त्याला गुलबट रंग येतो. रस कमी झाला तरी अशा कांद्यात तेल असते आणि ते मऊसर असतात. हेही तसे गोडसरच असतात.

लालः कच्च्या कांद्यातला रस आटून ते गुलबट झाल्यावरही पुढे तळण्याची कृती चालू ठेवल्यावर कांद्यातील (तळणीतील आत शिरलेले) तेल बाहेर पडते कांद्याचा रंग लाल होऊ लागतो. लाल झालेला कांदा बाहेर काढून रोळीत निथळत ठेवावा. मधून मधून जेवणाच्या काट्याने मोकळा करून थंड करावा. हा कोरडा आणि कुरकुरीत होतो. ग्रेव्हीत किंवा बिर्याणीवर सजावटीसाठी वापरतात.
कांद्यातील रस आणि तळणीतील बहुतांश तेल बाहेर पडल्याने ह्या कांद्याला स्वतःची अशी वेगळी चव राहात नाही. जे मसाले टाकाल त्याची चव ते धारण करतात. म्हणून ग्रेव्हीला योग्य.

कडूः लाल झालेला कांदा तसाच पुढे तळत राहिल्यास जळू लागतो. काळसर होतो. त्याला कडवट चव येते. काही जणांना असा कांदा बिर्याणीवर आवडतो.

तेंव्हा, ग्रेव्ही साठी कांदा लालरंगावर तळून घ्यावा. (मध्यम आंचेवर). त्यातील तेल निथळवून किंचीत पाणी घालून वाटून घ्यावा. कांद्याच्या अर्धे टोमॅटो आणि योग्यप्रमाणात मसाले घातले तर ग्रेव्ही गोड होत नाही. ग्रेव्ही करताना बारीक चिरलेले किंवा मिक्सरमधून प्यूरी करून घेतलेले टोमॅटो घालतात. ते पूर्ण शिजून त्यातलेही पाणी आटले पाहिजे नाहितर त्यानेही ग्रेव्ही गोड होते.
ग्रेव्हीमध्ये प्रमाणा बाहेर काजूपेस्ट किंवा क्रिम असेल तरी ग्रेव्ही गोडसर होते (बटर चिकन, व्हेज माखनी इ.).

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.