लेखी भाषा ही जास्त नियमबद्ध असते. बोली भाषेत खूप जास्त बदल होतात हे सगळ्या भाषांत दिसते. मराठीतही तेच व्हावे. इंग्रजीचे उदाहरण द्यायचे तर ऑस्ट्रेलियन माणूस टुडे ला टुडाय् म्हणतो पण म्हणून ऑस्ट्रेलियात today च्या ऐवजी todie किंवा तत्सम काहीबाही लिहीत नाहीत. अमेरिकेतही अनेक भागात शब्दांचे वेगवेगळे उच्चार होतात पण लेखी एकच नियम वापरला जातो. काही वेळा वातावरण निर्मितीकरता लेखक बोलतात तसे स्पेलिंग करतात पण तो अपवाद नियम नव्हे.

मान्य. पण वातावरणनिर्मितीसाठी बोलल्यासारखे स्पेलिंग करण्याचे जाऊ द्या, अमेरिकन भाषेत सर्वसाधारण स्पेलिंगचे नियम पण बदललेच ना? जसे कलर, फेवर, थिएटर, प्रोग्रॅम, ट्रॅव्हलर*, चेक* (धनादेश अशा अर्थाने) वगैरे शब्दांची स्पेलिंगे...

कुठल्याही भाषेचे नियम गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमाइतके अबाधित नसतात. मग मराठीचे कसे असतील? पण ते पन्नास वर्षांनी बदलणार आहेत म्हणून नियमच नको हे म्हणणे चूक. त्याने अंदाधुंद होईल.

मान्य. संदर्भ म्हणून का होईना, नियम हे पाहिजेतच. त्याशिवाय चुकले हे कसे कळायचे? (हे मी विनोदाने नव्हे, तर अत्यंत गांभीर्याने लिहीत आहे. तरीही एक विनोद आठवलाच. एकदा कोणीतरी असा मुद्दा मांडला, की भारतीय रेल्वेच्या गाड्या जर बहुतांशी उशिरा येतात-जातात, आणि वेळापत्रक अभावानेच पाळतात, तर मग वेळापत्रक हवेच कशाला? तर त्याला दुसऱ्याने उत्तर दिले, की वेळापत्रकच नसेल, तर गाडी उशिरा आली, वेळापत्रक पाळले नाही, हे तुम्ही म्हणणार तरी कशाच्या आधारावर? असो. विनोद जाऊ द्या, गाडी पुन्हा मूळ मुद्द्यावर...) भाषेला काहीतरी प्रमाणन पाहिजे, नाहीतर वृकोदरसाहेब म्हणतात तशी अंदाधुंद माजू शकेल. आणि नियम गरज लागली तर बदलतीलसुद्धा, पण म्हणून आज काही नियम असायला त्यामुळे बाधा येऊ नये.

अर्थात हे नियम बाहेरून लादले जाण्याऐवजी आतून (म्हणजे समाजाच्या वापराच्या पद्धतीमधून) नैसर्गिकरीत्या उद्भवले, तर जास्त चांगले.

अंदाधुंदीचा मुद्दा मात्र ऐतिहासिकदृष्ट्या थोडासा विवादास्पद आहे. (मी तो पूर्णपणे अमान्य करीत नाही, कारण वर्तमान लेखनात वर्तमान नियमांप्रमाणे झालेली शुद्धलेखनाची चूक मलाही - कदाचित सवयीमुळे - खटकते, पण नियमांच्या आवश्यकतेविषयी नसली तरी अनिवार्यतेविषयी मला थोडीशी शंका आहे.) कारण मराठी काय किंवा इंग्रजी काय, पुरातन वाङ्मय पाहिले, तर सर्वप्रथम असे जाणवते, की पूर्वीच्या काळचे शुद्धलेखनाचे / स्पेलिंगचे नियम आजच्या पेक्षा वेगळे तर होतेच (तो मुद्दा नाही.), पण थोडेसे शिथिलसुद्धा असावेत. (मी या विषयात तज्ज्ञ नाही, म्हणून "होते"च्या ऐवजी "असावेत" असे म्हणत आहे. चूभूद्याघ्या.) म्हणजे शुद्धलेखन अथवा स्पेलिंग थोडेसे इकडेतिकडे झाले, तरी फारसे कोणाचे बिघडत नसावे - अर्थात जोपर्यंत शब्द आकलनीय आहे तोपर्यंत. (म्हणजे काही अलिखित नियम आलेच, कारण त्याशिवाय शब्द आकलनीय होण्याची खात्री नाही, परंतु हे नियम हे "अमूकच पर्याय वापरावा"च्या ऐवजी "इतकेइतके पर्याय चालू शकतील" अशा स्वरूपाचे आणि आधी म्हटल्याप्रमाणे कोणी घालून दिलेले नसून अलिखित, कयासावर आधारित (इंट्यूटिव्ह) आणि घटनोत्तर (पोस्ट-फॅक्टो) समाजमान्य असावेत.) इंग्रजीत काय किंवा मराठीत काय, शुद्धलेखनाच्या / स्पेलिंगच्या अनुल्लंघनीय नियमांची घडण बहुधा त्या मानाने अलीकडे झाली असावी. (संस्कृतमध्ये बहुधा पाणिनीच्या व्याकरणाबरोबर झाली असावी का?) अर्थात मला या बाबतीत विशेष गम्य नाही, तरी तज्ज्ञांनी खुलासा करावा.

- टग्या.

* ता.क.: "ट्रॅव्हलर" आणि "चेक" या शब्दांच्या अमेरिकन स्पेलिंगांवरून एक गंमत आठवली. अमेरिकन एक्सप्रेसच्या प्रवासी धनादेशावरील या दोन शब्दांच्या स्पेलिंगांकडे पाहिले असता असे दिसून येते, की "ट्रॅव्हलर" या शब्दाचे स्पेलिंग हे अमेरिकन पद्धतीने (दोनच्याऐवजी एकच "एल्" अक्षर वापरून) केलेले आहे, तर "चेक" या शब्दाचे स्पेलिंग मात्र अमेरिकन पद्धतीने "सी-एच्-ई-सी-के" असे न करता, ब्रिटिश पद्धतीने "सी-एच्-ई-क्यू-यू-ई" असे केलेले आहे. पद्धत कोणतीही वापरावी, पण एकच वापरावी, नाही का?