सुनीताबाईंच्या मताशी मी 'विचारपूर्वक' सहमत आहे. त्यांचे शब्द 'राम म्हणजे सीतेवर अन्याय करणारा इसम' मला एकदम चपखल वाटले म्हणून उद्धृत केले होते.
सचिन पाटील, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, रामायण हे आदर्शांचे वर्णन करणारे काव्य (वाल्मिकींनी लिहिलेले) आहे असे म्हटले जाते. तो इतिहास आहे किंवा नाही या वादात मला पडायचे नाही. कारण दोन्ही बाजूंनी बोलता येईल इतपत 'तज्ञांची' मते मी वाचली आहेत. कुठल्याही प्रसंगात, इतिहास किंवा काव्यात लेखक/कवीच्या काळातल्या समाज परिस्थितीचे, ले/कवीच्या स्वतःच्या विचारांचे प्रतिबिंब पडते.
आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, आदर्श स्वामी कसा असावा .. तर रामासारखा. असे म्हटले जाते. तद्वत आदर्श स्त्री कशी असावी तर सीतेसारखी, हे ओघाने आलेच. म्हणजे, पण जो जिंकेल त्याला बिनबोभाट माळ घालणारी, पतीमागे वनात जाणारी, संकटात प्रसंगावधानी, पतीच्या आभिमानाची जाण ठेवून दूतासोबत येणे नाकारणारी, विनातक्रार अग्निपरीक्षा देणारी वगैरे, जवळपास मानसी म्हणतात तेच मुद्दे. आणि गोष्टींतील संकटांचे कारण काय: कैकेयीची राजमाता होण्याची लालसा, सीतेचा कांचनमृगासाठीचा हट्ट, सीतेचे लक्ष्मणरेषा ओलांडणे वगैरे. म्हणजे सगळे खापर कुणावर?
युद्धातील संहार पाहून दुःखी सीतेला राम म्हणतो 'हे तुझ्यामुळे गे झाले, तुजसाठी नाही केले.' तरीही वेदश्री, तुम्ही रामाला होरपळलेला प्रियकर म्हणता? सीता पळवली गेली तेव्हा वृक्षवेलींना तिचा पत्ता विचारत फिरणार्या रामाचे करुण वर्णन मीही वाचले आहे. पण जसे मी म्हटले, की भारतीय मनाला तिरंगा जसा 'प्यारा' तशी रामाला सीता, असे मला वाटले. म्हणून तिला सोडवून आणून लगेच तिला सोडून द्यायलाही त्याने मागेपुढे पाहिले नाही.
रावणालाही सीतेत पळवण्याव्यतिरिक्त काही रस होता असे वाटत नाही. नाहीतर वालीने जसे सुग्रीवपत्नी तारेला बळाने आपली राणी बनवले होते तसे करणे रावणाला काय अशक्य होते?
सहसा, या सार्या कथांमधे सूड घेण्यासाठी, आव्हान देण्यासाठी किंवा थोडक्यात लढाईचे निमित्त म्हणून स्त्री दिसते!
उदा. शूर्पणखेचा लक्ष्मणाने केलेला अपमान आणि सूड म्हणून रावणाचे सीताहरण. दोष नेहमीच स्त्रीचा; (त्यामुळे) शिक्षाही तिलाच. म्हणून मी म्हटले की रामायण वाल्मिकी नावाच्या पुरुष कवीने लिहिले आहे हे कारण त्यामागे आहे की काय?
आदर्श स्त्रीने आपल्या पतीमागे चालावे, कितीही अन्याय झाला तरी तक्रार करू नये; शिवाय नसते हट्ट करू नयेत, (पुरुषाने घातलेल्या) मर्यादा ओलांडू नयेत, पुरुषानेही आपल्या स्त्रीला नसती वचने देऊ नयेत, नाहीतर पुढे 'रामायण' घडते असे सांगणारे हे पथदर्शक (!?) काव्य आहे असे मला वाटते.
स्त्री-पुरुष परस्परपूरक होण्याचा विचार खरेच स्पृहणीय आहे. पण तडजोड ही सहसा स्त्रियांच्याच पदरात मावणारी गोष्ट असल्याने 'हे व्हावे कसे' ते काही कळत नाही.
जाता जाता, प्रवासी, तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याच्या 'पाश्चात्य' कल्पनांचा उल्लेख केला आहे. या कल्पना कदाचित अमेरीकेत असतील, इथे इंग्लंडमध्ये मात्र स्त्री - घर सांभाळणारी, मुलांना पाहणारी, खरेदी करणारी आणि पुरुष - पैसे कमावणारा, दुरुस्त्या करणारा अशी सरळ विभागणी आहे. माझ्या कार्यालयात ३०० लोकांत फक्त ३ अभियंत्या आहेत, आणि त्यातही एकच ब्रिटिश. त्यातल्या त्यात मुलीबायका स्वागतकक्षात, मनुष्यबळ विकास खात्यात आहेत. तितकेच.
लहानपणापासून मुलींना शिकवण अशी की 'छान छान दिसावे', 'मुलांचे लक्ष वेधून घ्यावे (!)', 'लग्न करावे, पुष्कळ मुलेबाळे व्हावीत', 'नवर्याला चिक्कार पगार असावा', 'खूप खरेदी करता यावी' वगैरे. इथे खरेच लोकांना ४/५ मुले असतात. आणि शॉपिंग ही फक्त बायकांनी करायची गोष्ट समजली जाते. असो. फार विषयांतर नको. मुद्दा असा की त्यामानाने आपल्याकडे बरी परिस्थिती म्हणावी लागेल.