एकदम मस्त विषय आहे. अनेक रूढींवरून मी माझ्या आजीशी त्या न पाळण्याकरता बऱ्याचवेळा भांडले आहे :)  पण कुठल्याही प्रश्नाला तिच्याकडून एकच उत्तर मिळाले आहे. 'आम्ही मोठयांना असे का म्हणून कधी विचारले नाही. तसे धाडसही झाले नाही. ते सांगतील तसे वागलो. तुम्हीही काही विचारू नका'  :-)

नारळ आणि नरबळी याचे समीकरण माहीत नव्ह्ते. वाचल्यावर कसेतरी वाटले. शेंडी ठेवण्याबद्दल बोलायचे झाले तर स्वयंपाकात वापरण्यासाठी फोडतानाही शेंडी ठेवूनच फोडला जातो. त्याचे कारण काय असावे ?? कोयतीने फोडताना / खवताना शेंडीमुळे पकड चांगली राहते म्हणून ?? सोललेले नारळ रचून ठेवतानाही नारळ आडवा ठेवत नाहीत कायम शेंडी वर करून उभा ठेवतात. कारण असे नारळ जास्त दिवस टिकतात. त्यात जास्त दिवस पाणी राहते आणि चांगले ही राहते.  एकमेकांना नारळ देताना शेंडीची बाजू घेणाऱ्याकडे असते कारण शेंडी डोक्याशी तुलना होत असल्याने विरुद्ध बाजू म्हणजे पाय. आपल्या पायाचा दुसऱ्याला स्पर्श झाल्यास आपण दुसऱ्यास नमस्कार करतो (कारण ते लाथ मारल्यासारखे झाले म्हणून ?) त्याप्रमाणे नारळही पायाकडून न देता शेंडीकडून देणे म्हणजे समोरच्याचा मान राखल्याप्रमाणे होते म्हणून ????

नखांबद्दल प्रत्येक वारानिशी  वाचले होते. सापडले की इथे लिहीन. प्रवासाला जायच्या आधी कापू नये : वेळकाढू काम असल्याने प्रवासाला उशीर होऊ शकतो म्हणून ?? घाईघाईत जखम होऊ शकते म्हणून ??

कोणी प्रवासाला गेल्यास इतरांनी का करू नये  :  माणूस घरात नसल्याने असे केल्यास मयतानंतर केल्याप्रमाणे वाटतात म्हणून ???

अजून काही रूढी :

बुधवारी माहेरवाशिणींनी प्रवास करू नये.

भाऊ हयात असलेल्या बहिणींनी सोमवारी न्हाऊ (डोक्यावरून अंघोळ) करू नये.

पपई च्या बियांवर पाय पडल्यास आंधळेपणा येतो .  (बुळबुळीत असल्याने घसरून पडल्यास मार अथवा जखम होऊ शकते म्हणून ??? )

शनिवारी (नक्की वार कोणता ते आठवत नाही) मुगाची खिचडी करू नये.

शनिवारी तेल आणू नये. (असे वाचल्याचे आठवते की पूर्वी पारशी / ज्यू तेली होते आणि त्यांच्या प्रार्थनेचा दिवस असल्याने त्या दिवशी ते तेल विकत नसत. दुसरे असेही ऐकले की मारुतीला वाहण्यासाठी तेल मिळावे म्हणून घरगुती वापरासाठी तेल आणू नये)

 

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादात आलेल्या काही रूढींबद्दल मी ऐकलेली स्पष्टीकरणे ...

दूर्वा : वर वेदश्री ने लिहिल्याप्रमाणे दूर्वांचा गुणधर्म शीतल आहे. त्यामुळे दूर्वा निवडताना अंगातील उष्णता काही प्रमाणात बाहेर पडण्यास मदत होते. दूर्वा त्वचारोगांवर अत्यंत प्रभावी औषध आहे. ऍलर्जी <प्रतिशब्द ??> वर दूर्वा आणि तांदूळ वाटून लावतात. दूर्वांचे तेल भाजलेल्या किंवा काही त्वचेशी संबंधित जखमांवर लावल्यास जखम लवकर बरी होते. (हा स्वानुभव आहे)  

ग्रहण : ग्रहणात अल्ट्रा व्हायोलेट (अतिनील ??)  किरण जास्त प्रमाणात पृथ्वीवर पोहोचतात. (त्यावेळी ओझोन कुठे असतो ?? ) त्यामुळे या काळात शक्यतो घराबाहेर पडत नाहीत. चिरू नये / खिळा ठोकू नये याचा संबंध जखम होऊन रक्तस्त्राव होण्याशी असावा. ग्रहण काळात भरती ओहोटीचे काय समीकरण असते ?? कारण भरती ओहोटीच्या काळात गरोदर स्त्रियांनाच नव्हे तर इतर कोणालाही रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो.

शीळ : मला सांगितले गेले त्याप्रमाणे रात्री शीळ न घालण्याचे कारण शीळ ऐकून कुठलेही जनावर (सर्प) आपण जिथे असू त्या ठिकाणी येऊ नये. आता सर्पाला ऐकू येत नाही असा मुद्दा कोणी उपस्थित केल्यास त्यावर मी काहीच सांगू शकत नाही कारण मी स्वतः त्याची खातरजमा करून घेतेलेली नाही किंवा यापुढेही करून घेण्याची इच्छा नाही ः-) पण सर्पाला ऐकू येते/ सर्प डूख ठेवतो याचे स्वानुभव आई- बाबा आजी आजोबांकडून ऐकल्याने त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. शिवाय (सर्पाची)  शीळ  मी ऐकली आहे. पण सर्प समोर न दिसल्याने शीळ घालणारा सर्प च होता की नाही हे मी सांगू शकत नाही. पण जिथे ऐकली तिथे राहणाऱ्यांना रोजच ऐकायला/पाहायला मिळते असे त्यांचे म्हणणे होते.

चित्राहूती  : लहान मुले-मुली जेवताना इतके सांडतात की त्यांना वेगळे चित्राहूती काढायची गरजच पडत नसेल (हा केवळ विनोद आहे वादाचा मुद्दा नव्हे !!)